Monday 30 October 2017

जनता दरबार

नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवा
जनता दरबारात पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश

नाशिक, दि.30 :- शासकीय विभागांनी आणि संबंधीत यंत्रणांनी नागरिकांच्या समस्या तत्परेने सोडवाव्यात आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने संवाद साधावा, असे निर्देश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले. यावेळी एकूण 295 अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.
पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जि.प.अध्यक्षा मनिषा सांगळे, महापौर रंजनाताई भानसी,  आमदार अनिल कदम, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नरहरी झिरवाळ, डॉ.राहुल आहेर, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त डॉ.अभिषेक कृष्णा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपायुक्त दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदी उपस्थित होते.

सकाळी अकरा वाजता जनता दरबारला सुरूवात झाल्यानंतर प्रथम नाशिक तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांवर सुनावणी झाली. त्यानंतर जिल्ह्यातील इतर  तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी झाली.  नाशिक 33, दिंडोरी 22, निफाड 65, पेठ 5, सिन्नर 73, त्र्यंबकेश्वर 12, सुरगाणा 7, इगतपुरी 25, देवळा 21, चांदवड 22 आणि कळवण तालुक्यातील 8 नागरिकांच्या समस्यांबाबत सुनावणी झाली. मालेगाव, बागलाण, येवला आणि नांदगाव तालुक्यासाठी 6 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता मालेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील मालू कॉम्प्लेक्स कॉलेज ग्राऊंड येथे ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिक मनपा क्षेत्रातील एक स्वातंत्र्य सैनिकाची समस्या आणि दुसरी अंध-अपंगांना विविध योजनांचा लाभ देण्याबाबतच्या दोन समस्यांवर सुनावणी झाली. इतर अर्जांवर 16 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 2 वाजता राजीव गांधी भवन येथे सुनावणी घेण्यात येणार आहे.

   प्रत्येक नागरिकाची आणि अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेत श्री.महाजन यांनी नागरिकांच्या अर्जावर निर्णय दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कार्यवाही करून संबंधितास त्याबाबत कळविण्यात यावे तसेच तक्रारींबाबत सकारात्मक दखल घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वृद्ध कलावंतांना मानधन देण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  त्वरीत समिती स्थापन करावी आणि निर्णयप्रक्रीया पुर्ण करावी, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषदेने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, निफाड तालुक्यातील शिवरस्त्याबाबत मोजणी करून अतिक्रमणधारकांकडून वसूली करावी, निफाड तालुक्यातील गोरठाण येथील डीपी तातडीने बसवावी, प्रत्येक गावात स्माशनशेड होईल यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, नाशिक-दिंडोरी आणि नाशिक-येवला रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी, ओझरखेड गावातील पर्यटन विकासाबाबत कामे करताना गावातील सुविधांबाबत सुधारीत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री.महाजन यांनी विविध समस्यांबाबत सुनावणी करताना दिले.

ते म्हणाले, गोदावरी नदीत सांडपाणी सोडण्याचा प्रकार गंभीर आहे. नद्यांचे पाणी प्रदुषीत झाल्याने धरणांचे पाणीदेखील प्रदुषीत होत असल्याने शासनस्तरावर ही समस्या दूर करण्यासाठी गांभिर्याने विचार सुरू आहे. केंद्र सरकारनेदेखील यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. नगरपालिकांना याबाबत सुचना देण्यात आल्या असून एसटीपी प्लँटसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

सुरगाणा येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचा प्रश्न तातडीने निकालात काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या वसतीगृहासाठी शासनाने आतापर्यंत अडीच कोटी रुपये खर्च केला आहे. त्र्यंबकेश्वर येथील इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांची तिसऱ्या हप्त्याची रक्कम आठ दिवसात जमा करावी, असेही त्यांनी सांगितले. चणकापूर धरणातून म्हसाड पाणी योजनेच्या माध्यमातून गिरनारे आणि इतर गावांना पाणी पोहोचविण्यासाठी 98 कोटीच्या योजनेस मान्यता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.
जनता दरबारात पालकमंत्र्यांनी महसूल, पोलीस, महावितरण, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आदी विविध विभागांबाबतच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि समस्या दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
         


क्षणचित्रे-
*सकाळी 9 वाजेपासून नागरिकांनी गर्दी करण्यास सुरूवात केली.
*सकाळी ग्रामीण भागातील आणि दुपारून शहरी भागातील नागरिकांची नोंदणी करण्यात आली.
*नोंदणीसाठी प्रशासनातर्फे चोख व्यवस्था
*टोकन क्रमांकानुसार क्रमाने समस्येची सुनावणी
*तालुक्याच्या क्रमांकानुसार नागरिकांना ध्वनीक्षेपकावरून सुचना देण्याची व्यवस्था
*उपक्रमाबाबत नागरिकांकडून पालकमंत्र्यांना धन्यवाद.
*नागरिकांना बसण्यासाठी स्वतंत्र प्रतिक्षा कक्ष
*रात्री नऊ वाजेपर्यंत पालकमंत्री महोदयांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत सुनावणी घेतली.




No comments:

Post a Comment