Friday 29 June 2018

औद्योगिक धोरण चर्चासत्र


उद्योगस्नेही धोरण तयार करणार- सुभाष देसाई

          नाशिक, 29 : नवीन औद्योगि‍क धोरण ठरवताना औद्योगिक क्षेत्राला चालना देणारे उद्योगस्नेही धोरण तयार करण्यात येईल,  असे प्रतिपादन उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
          उद्योग संचलनालयातर्फे प्रस्तावित औद्योगिक धोरणावर चर्चा करण्यासाठी  आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव सतिश गवई, महाराष्ट्र औद्योगिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, सहसचिव संजय देगावकर, सहसंचालक संजय कोरबू, उपसंचालक अजय पाटील, नाशिक  एमआयडीसीच्या विभागीय व्यवस्थापक हेमांगी पाटील आदी उपस्थित होते.

   श्री. देसाई म्हणाले, नवीन औद्योगिक धोरण निश्चित करण्यासाठी सर्वांना सोबत घेवून येणाऱ्या सुचनांवर विचार करण्यात येईल. या प्रक्रीयेत विविध विभागांना सहभागी करून घेण्यात येईल. नव्या धोरणाचा लाभ एकूणच सर्व औद्योगिक क्षेत्राला होईल. औद्योगिक धोरण ठरविताना महिला उद्योजकांच्या समस्या सोडविण्यात येणार असून अधिकाधीक महिलांनी उद्योगक्षेत्राकडे वळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
          औद्योगिक क्षेत्राशी निगडीत प्रश्नांचे निरसन करून औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यसासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   राज्य अधिकाधिक प्रगतिशील करण्यासाठी येणाऱ्या सुचनांचा सविस्तर अभ्यास करुन औद्योगिक धोरण अधिकाधीक अचूक आणि उपयुक्त तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे श्री.देसाई म्हणाले.

          यावेळी विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि उद्योजकांनी औद्योगिक विकासासाठी आपल्या सूचना मांडल्या. बैठकीत उद्योग संचालनालयाच्यावतीने औद्योगिक धोरणाची रुपरेषा मांडण्यासाठी सादरीकरण करण्यात आले.
          बैठकिस नाशिक निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे,महाउद्योग मित्र औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, रमेश पवार, नामकर्ण आवारे यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी  उपस्थित होते.
00000

Wednesday 27 June 2018

मतमोजणी


नाशिक विभाग शिक्षक मतदासंघ द्विवार्षिक निवडणूक 2018
मतमोजणीसाठी तयारी पूर्ण
           

       


       नाशिक, 27 : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2018 अंतर्गत अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन येथे मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.  विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने आणि निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयम यांनी मतमोजणीच्या तयारीचा आढावा घतला. त्यांच्या उपस्थितीत मतमोजणीचे प्रशिक्षण घेण्यात आले.          
       यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., किशोरराजे निंबाळकर, मल्लिनाथ कलशेट्टी, राहुल द्विवेदी, राहुल रेखावार, उपायुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते.

श्री.माने यांनी मतमोजणीविषयी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. गुरुवारी सकाळी 7 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रशिक्षणात 125 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
           श्री. गावडे यांनी यावेळी मतमोजणी प्रक्रीयेची माहिती दिली. मतमोजणीसाठी वीस टेबल ठेवण्यात आले असून प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी असतील. मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधी व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश असणार नाही, तसेच मोबाईल वापरावर बंदी असल्याची माहिती त्यांनी दिली. 
        मतमोजणी स्थळाच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
----

सामाजिक न्याय दिन


सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा
समता दिंडी, व्याख्यानाचे आयोजन


          नाशिक, 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने समता दिंडी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
            राज्य शासनाच्यावतीने 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांच्या हस्ते समता दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राजेंद्र कलाल, सहायक आयुक्त प्राची वाजे, विशेष अधिकारी देविदास नांदगांवकर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीधर त्रिभुवन,  प्राचार्य विवेक गायकवाड, विलास देशमुख आदी उपस्थित होते.

          मेहर सिग्नल, अशोक स्तंभमार्गे गंगापूर रोड येथील रावसाहेब सभागृह येथे दिंडीचा समारोप झाला. दिंडीत केटीएचएम महाविद्यालय, मराठा विद्यालय, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ सोशल वर्क, वाय.डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रमाबाई आंबेडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या महाविद्यालयातील विद्याथी-विद्यार्थींनींनी सहभाग घेतला.
          रावसाहेब सभागृह येथे केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक गायकवाड, प्राचार्य संजय साळवे, विलास देशमुख यांचे राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक समता, शैक्षणिक योगदान याविषयावर व्याख्यान झाले.

          यावेळी प्राचार्य गायकवाड म्हणाले, 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे सूत्र ध्यानात घेऊन शाहू महाराजांनी राज्यकारभार पाहिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्वे समाजात रुजविण्याचे प्रयत्न केलेत. अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्र्यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी शाहू महाराजांनी अविरत मेहनत घेतली असे त्यांनी सांगितले.
          यावेळी प्राचार्य साळवे म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासासाठी वर्णभेद विसरुन एकरुपता दाखविणे गरजेचे आहे. शाहू महराजांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शैक्षणिक सुधारणेवर तसेच प्रशासकीय धोरणावर  विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले.    

          प्राचार्य देशमुख म्हणाले, मानवजातीच्या कल्याणासाठी शाहू महाराजांचे योगदान मोठे आहे. वैचारीक श्रृंखलांमधून वैचारीक समृद्धी घडत असते. त्यामुळे विचाराचे आदान प्रदान होणे गरजेचे आहे.  युवा वर्गाने शाहू महारांजाचे विचार आचारणात आणुन तसेच विचार आणि मंथन यांची सांगड घालून सामाजिक परिवर्तन घडवून आणने हे युवापिढीसमोरचे मोठे आव्हान त्यांनी सांगितले.
          यावेळी समाज कल्याण विभागामार्फत शासकीय आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

00000

Thursday 21 June 2018

मतमोजणी प्रशिक्षण


नाशिक विभाग शिक्षक मतदासंघ द्विवार्षिक निवडणूक 2018
मतमोजणी संदर्भात प्रशिक्षण संपन्न


       नाशिक दि. 21-नाशिक विभाग शिक्षक मतदासंघ द्विवार्षिक निवडणूक 2018 अंतर्गत मतमोजणीचे प्रशिक्षण विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने आणि निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयम यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न झाले.
          यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., किशोरराजे निंबाळकर, मल्लिनाथ कलशेट्टी, राहुल द्विवेदी, राहुल रेखावार, उपायुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त ज्ञानेश्वर खिल्लारे आदी उपस्थित होते.

 मतमोजणीची प्रक्रिया समजावून घेत अचूक पद्धतीने आपली जबाबदारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडावी, असे श्री माने यांनी यावेळी सांगितले.
     श्री.खिलारे यांनी सादरीकरणाद्वारे मतमोजणीची माहिती दिली. एकल संक्रमण पद्धतीने मतदान होणार असून मतदाराला जास्तीत जास्त 17 पसंतीक्रम देता येणार आहे. एकूण 20 टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यासह एक पर्यवेक्षक एक सहाय्यक आणि एक शिपाई असणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश असणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. मतमोजणीच्या प्रक्रियेविषयी त्यांनी सविस्तर सादरीकरण केले.
         
                         
0000

वनमित्र मोहिम

वनहक्क दावे तीन महिन्याच्या आत निकाली काढावेत-राधाकृष्णन बी.

नाशिक दि.21- मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार वनहक्क दावे व अपील तीन महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम, 2006 व नियम 2008 उपविभागस्तरीय समिती सदस्य व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची वनमित्र मोहिम व  प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, सहाय्यक जिल्हाधिकारी अमन मित्तल, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील  प्रशिक्षक राकेश पाटील, कविता गायकवाड आदी उपस्थित होते.  
श्री.राधाकृष्णन म्हणालेअपिलांच्या कालबद्ध सुनावणीसाठी वनमित्र मोहीम शासनातर्फे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून वनहक्क दावे निकाली काढण्याबाबत येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात यावी. सकारात्मक दृष्टीकोनातून दावे व अपिले कालबद्ध मुदतीत निकालीकाढून वनमित्र मोहीम यशस्वी करावी.

 उपविभागीयस्तरीय व वनहक्क समितीने  प्रकरणे निकाली काढतांना त्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. वनविभागाने पीओआर रिपोर्टचा आधार न घेता इतर विभागाच्या पुरव्यांचाही विचार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 नाशिक जिल्ह्यात  प्राप्त 50 हजार 443 दाव्यांपैकी 21 हजार 165 दावे मान्य झाले आहे. 9 हजार 551 दावे अमान्य आहेत. जिल्हा समितीकडे प्रलंबित दावे 6 हजार 550 असून उपविभागस्तरीय समितीकडे 12 हजार 503 दावे  प्रलंबित आहेत.  प्रलंबित दाव्यांबाबत तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
कार्यशाळेत श्री.पाटील यांनी वनमित्र मोहिमेचा उद्देश, प्रलंबित राहणारे दावे व अपिले यांचे कारणांबाबत उपाययोजनांची चर्चा, नाकारण्यात येणाऱ्या दावे व अपिलांच्या कारणांबाबत व उपाययोजनांची, वनहक्क अधिनियम व नियमातील तरतुदी, वैयक्तिक वनहक्क दावे हाताळणी कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.
श्रीमती गायकवाड यांनी, सामुहिक वनहक्क दावे हाताळणी, सामुहिक वनहक्क मार्गदर्शिका, सामुहिक वनहक्क वन व्यवस्थापन, नियोजन आराखडे, वैयक्तिक व सामुहिक वनहक्क धारकांना पट्टे देणे, जमीन मोजणी व सीमाकंन, अधिकार अभिलेख अद्यावतीकरण याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सहाय्यक वनसरंक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.
**********

आंतरराष्ट्रीय योगदिन


भारतपर्यटनतर्फे योगदिनानिमित्त प्रात्यक्षिकांचे आयोजन

          नाशिक, 21 : त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुकूल येथे भारतपर्यटनतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत केटीएचएम महाविद्यालयात योगदिन साजरा करण्यात आला.

          त्र्यंबकेश्वर येथील कार्यक्रमात  पर्यटन विभागाचे महाव्यस्थापक नितीन मुंडावरे, तहसिहलदार महेंद्र पवार, मुख्याधिकारी चेतना केरुरे, नाशिक सायकलिस्टचे प्रविण खाबिया आणि योग अभ्यासक प्रज्ञा पाटील आदि उपस्थित होते.

          यावेळी प्रज्ञा पाटील यांनी शारीरिक जिवनाचे महत्व सांगून ताडासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, वक्रासन, भुजंगासन यासारखे योग अभ्यासाचे प्रात्याक्षिक करुन घेतले. शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत भुवनेश्वर येथील कलाकारांनी ओरीसा राज्यातील ‘गोटीपुआ’ नृत्यप्रकार सादर केला.
                        योग भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी-जिल्हाधिकारी

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, मराठा विद्या प्रसारक समाजाच्यावतीने केटीएचएम महाविद्यालय येथे योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.

योगविद्या ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असे यावेळी श्री.राधाकृष्णन यांनी सांगितले. योगसाधनेमुळे मानवाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास होतो. योग साधनेमुळे शरीरिक समतोल साधला जाण्याबरोबर व्यक्ति परिसर आणि निसर्गाशी जोडला जातो. निरामय आयुष्य जगण्यासाठी दिवसातला एक तास योगासनांसाठी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोलीस कवायत मैदानावरदेखील योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
00000

Friday 15 June 2018

शाळा प्रवेशोत्सव


जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सवाचा उत्साह


ना‍शिक दि.15- विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर काढलेली आकर्षक रांगोळी... विद्यार्थ्यांचे औक्षण आणि गुलाब पुष्प देवून केलेले स्वागत....शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण म्हणून घेतले जाणारे ‘पहिल्या पावला’चे ठसे...सजवलेल्या बैलगाडीतून काढलेली मिरवणूक....चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह....अशा वातावरणात जिल्ह्यात जिल्हा परिषदेतील शाळांमधून मुलांचा शाळा प्रवेश सोहळा साजरा करण्यात आला.


ओझर येथे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला तहसिलदार विनोद भामरे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर, गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप, शिक्षण विभाग प्रमुख कैलास बोरसे, मुख्याध्यापिका नुतन पवार आदि उपस्थित होते.

शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमधून घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी इगतपुरी तालुक्यातील रामरावनगर येथे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पिंप्री सैय्यद, जिल्हा सत्र न्यायाधिश सुर्यकांत शिंदे  यांनी खंबाळे येथील शाळेतील उत्सवात सहभाग घेऊन चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.


 शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मुलभूत हक्क असल्याने त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे श्री.राधाकृष्णन यांनी याप्रसंगी सांगितले. मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांना शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावे यासाठी पालक आणि शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.


शाळा प्रवेशोत्सवांतर्गत मुलांच्या पायांचे ठसे घेण्यात आले असून हे ठसे जतन करून ठेवण्यात येणार आहेत. मुले शाळा सोडतील तेव्हा शाळेची आठवण म्हणून त्यांना ते भेट म्हणून दिले जातील.


          यावेळी शाळेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. श्री.राधाकृष्णन यांनी मुलांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थदेखील सहभागी झाले.


00000

Thursday 14 June 2018

13 कोटी वृक्ष लागवड


वृक्ष लागवड उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करा-सुधीर मुनगंटीवार
             

       नाशिक दि. 14- वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची जागतिक स्तरावर ओळख प्रस्थापित व्हावी म्हणून वृक्ष लागवड उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक प्रयत्न करा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे 13 कोटी  वृक्ष लागवडीसंदर्भात आयोजित नाशिक विभागीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, मुख्य वनसंरक्षक टी.रामाराव, उपायुक्त अर्जुन चिखले, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
          श्री.मुनगंटीवार म्हणाले, वृक्ष लागवडीसाठी लोकसहभाग वाढवणे महत्वाचे आहे. जनतेचा या अभियानावरील विश्वास वाढावा यासाठी पारदर्शकतेवर अधिक भर देण्यात येत आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय 50 कोटीचे उद्दीष्ट गाठणे अशक्य आहे. त्यामुळे उत्तम नियोजन  आणि लोकसहभागावर अधिक भर देण्यात यावा. त्यासाठी हरितसेना सदस्य नोंदणीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. मानवी जिवनाच्या अस्तित्वासाठी वृक्ष संवर्धन महत्वाचे असल्याची जाणीव नागरिकांच्या मनात निर्माण होणेदेखील महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

          वनमंत्री म्हणाले, 2016 मध्ये 2 कोटी 82 लक्ष आणि 2017 मध्ये 5 कोटी 43 लाख वृक्ष लागवड करण्यात आली असून त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. यावर्षी 13 कोटी वृक्ष लावण्यात येणार असल्याने अधिकाऱ्यांनी अधिक परिश्रम घेणे गरजेचे आहे. वन संरक्षणासाठी शासनाने 1926 या टोल फ्री क्रमांकावर हेल्पलाईन सुरू केली असून आतापर्यंत 45 हजार तक्रारींची नोंद झाली आहे. तक्रारी तातडीने सोडविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या वनस्थिती अहवालात महराष्ट्र चार घटकात  प्रथम क्रमांकावर आहे. वनेत्तर क्षेत्रात वृक्षाच्छादन 273  चौ.किमीने वाढले आहे.  कांदळवनाच्या क्षेत्रात 82  चौ.किमीने वाढ झाली आहे. शासनाने बांबू टी.पी.  फ्री असून त्यामुळे बांबूचे क्षेत्र 4462 चौकिमीने वाढले आहे. वनक्षेत्रातील जलसाठे 432 चौ.किमीने विस्तारले आहे. वनाचे महत्व लक्षात घेऊन अभियानात लोकप्रतिनिधी, विविध शासकीय व अशासकीय संस्था आणि समाजातील विविध घटकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

वणवा रोखण्यासाठी विविधि प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत असून वणवा प्रतिबंधाचे प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज अकादमी उभारण्यात येत आहे. तसेच त्यासाठी आवश्यक आधुनिक साहित्यदेखील उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती श्री.मुनगंटीवार यांनी दिली.
श्री.खारगे म्हणाले, वृक्ष लगावड  उपक्रमात कृषी विभागाचे महत्व अधिक आहे. पडीक जमीनीवर फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावे. नागरिकांनी विविध प्रसंगी वृक्ष भेट द्यावी यासाठी जागरुकता निर्माण करण्यात यावी. वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी यासाठी पारदर्शकतेवर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
          वृक्ष लागवड अभियानांतर्गत चालू वर्षी नाशिक जिल्ह्याला 72 लाख 26 हजार, अहमदनगर 49 लाख 94 हजार, धुळे 43 लाख 39 हजार, नंदुरबार 45 लाख 28 हजार आणि जळगाव 42 लाख 41 हजार  वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले असून 96 टक्के खड्डे खोदण्याचे काम पुर्ण झाले आहे. नाशिक वन विभागाच्या अधिनस्त 283 रोपवाटिकांमध्ये 440 लक्ष रोपे उपलब्ध आहेत. विभागात 6 लाख 82 हजार हरित सेना सदस्यांची नोद करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीपूर्वी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते विभागातील विविध जिल्ह्यांनी तयार केलेल्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. बैठकीला विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---