Wednesday 31 May 2017

नाशिक जिल्ह्याचा गौरव

‘लाख’मोलाची कामगिरी

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झालेल्या ‘दरवाजा बंद माध्यम अभियाना'च्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षभरात एक लाखापेक्षा अधिक शौचालय बांधल्याबद्दल  नाशिक जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.
 या सोहळ्याला केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंह तोमर, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, राज्याचे पाणीपुरवठा सचिव राजेशकुमार आदी उपस्थित होते.
'स्वच्छ भारत' अभियानात जिल्ह्याने भरीव कामगिरी केली  आहे. ग्रामीण भागात एकूण 3 लाख 36 हजार 998 शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट असून आतापर्यंत एक लाख 76 हजार 937  शौचालय बांधण्यात आली आहेत.  एकूण 1368 पैकी 808 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यापैकी 508 ग्रामपंचायती याच वर्षात हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
वर्षभरात जिल्ह्यात एक लाख 4 हजार 319 शौचालये बांधण्यात आलीत.  2016-17 या वर्षात सर्वाधिक शौचालय बांधण्यात पुण्यानंतर नाशिक जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. जिल्ह्यातील देवळा, कळवण आणि नाशिक हे तीन तालुकेदेखील हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
शौचालय बांधकामाचे सुक्ष्म नियोजन, प्रभावी संनियंत्रण, ग्रामस्थांशी थेट संवाद,  लोकसहभाग आणि अभियानातील सांघिक भावना ही या यशामागची मुख्य कारणे आहेत. सुक्ष्म नियोजनांतर्गत प्रत्येक आठवड्यात आढावा बैठक घेण्याबरोबरच सोशल मिडियाचा दैनंदिन कामकाजात प्रभावी वापर करण्यात आला. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर  आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुड मॉर्निंग पथक, टमरेल मुक्त गाव अभियानात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यानी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
 टमरेल मुक्त गाव अभियान विशेष प्रभावी ठरले. या अभियानांतर्गत पहाटेच्यावेळी गावात फिरून बाहेर टांगलेले टमरेल तसेच बाहेर शौचालयास जाणाऱ्या ग्रामस्थांचे टमरेल जप्त करण्यात आले. या टमरेलांची गावातून फेरी काढण्यात येऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. ही बाब ग्रामस्थांना शरमेची वाटू लागल्याने चांगली जनजागृती होण्यास मदत मिळाली.
कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आयोजित गवंडी प्रशिक्षणामुळे गावात रोजगारही उपलब्ध झाला. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता चळवळीला गती देण्यात आली. स्वत: अधिकारी-कर्मचारी श्रमदानात सहभागी झाले. अनेक ठिकाणी महिलांनी पुढाकार घेऊन गाव हागणदारीमुक्त केले.
जिल्ह्याची वाटचाल आता संपुर्ण हागणदारीमुक्तीकडे सुरू आहे. उर्वरीत 560 ग्रामपंचायतीतील एक लाख 55 हजार 915 शौचालय बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. प्रत्येक महिन्यात किमान दोन तालुके हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणर आहे. फेब्रुवारी 2018 अखरे संपुर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरस्कार स्विकारला. सामुहिक कामगिरीच्या बळावर जिल्ह्याचा हा गौरव जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. 'स्वच्छ भारत ' अभियानातील जिल्ह्याची ही कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे. यात सातत्य ठेवीत हागणदारीमुक्तीचे उद्दीष्ट नागरिकांच्या सहकार्याने निश्चितपणे पुर्ण केले जाईल यात शंका नाही.

-----

Tuesday 30 May 2017

‘मेक इन नाशिक’

मेक इन नाशिकचा ब्रँड विकसित करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





मुंबई, दि. 30 : नाशिकमधील कृषी प्रक्रिया उद्योग व अन्य उद्योगांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येतील.मेक इन महाराष्ट्रच्या बरोबर मेक इन नाशिकचा ब्रँड विकसित करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

‘निमा’ (नाशिक औद्योगिक आणि उत्पादक असोसिएशन) संस्थेतर्फेवरळी येथील नेहरु सेंटरमध्ये आयोजित केलेल्या मेक इन नाशिककार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार श्रीमती देवयानी फंरादे, सीमा हिरे, महापौर श्रीमती रंजना भानसी, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंघल, निमाचे अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी, नाशिकचे जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले की, नाशिकमध्ये कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगाला आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा देण्यात येतील.यातूनच शेतकऱ्यांच्या विकासाला चालना मिळेल. नाशिक शहर व नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसायालाही खुप मोठी संधी आहे. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असणारी सर्व मदत दिली जाईल. मुंबई-पुणे नंतर नाशिकमध्ये उद्योग गुंतवणूकीला खूप मोठी संधी आहे. नाशिकला मोठे उद्योग प्रकल्प मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. मालेगाव येथे औद्योगिक विकास होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लवकरच जागा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवणुक ही महाराष्ट्रात होते. परकीय गुंतवणुकीमध्ये देशात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र हे देशाचे पॉवर इंजिन आहे. जगातील सर्वात तरुण लोकसंख्या भारतात आहे. या तरुणाईच्या कौशल्याच्या बळावर मेक इन इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना यशस्वी करु, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
‘निमा’ने आयोजित केलेल्या मेक इन नाशिकच्या दोन दिवसाच्या चर्चासत्रातून नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी जे जे मुद्दे येतील त्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन ‘मेक इन नाशिक’च्या यशस्वीततेसाठी प्रयत्न करु, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
००००



Sunday 28 May 2017

नाशिक महानगरपालिका बैठक

विकास प्रक्रीयेला गती देण्यासाठी महापालीकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा
                                                                                                    - मुख्यमंत्री


नाशिक, दि. 28शहरातील विकास प्रक्रीयेला गती देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा,  असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
          नाशिक महानगरपालिकेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, संभाजी मोरुसकर, लक्ष्मण सावजी,  आदी उपस्थित होते.

          मुख्यमंत्री म्हणाले, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक वाहतूक या चार मूलभूत बाबींवर महापालिकेने लक्ष केंद्रीत करावे. ओला आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण आणि त्यावर प्रक्रीया करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या संदर्भात विद्यामान क्षमता वाढविण्याचा महापालिकेने प्रयत्न करावा.
 सार्वजनिक वाहतूकीसाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करून ‘ॲपबेस’ बससेवा सुरू करण्याचा विचार करावा. त्यासाठी आवश्यक असल्यास शासनातर्फे जमीन विनामूल्य देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात शहर बससेवा सुरळीत झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात मेट्रोचा विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.

          शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देताना श्री.फडणवीस म्हणाले, महापालिकेचे अस्तित्वात असलेले उत्पन्नाचे स्त्रोत आणि वाढविता येण्यासारखे स्त्रोत वगळता विकासाचे नियोजन करण्यासाठी कमी पडणाऱ्या निधीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. महापालिकेची तांत्रिक पदे भरण्यासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
          मुख्यमंत्री म्हणाले, गोदावरी संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तज्ज्ञ संस्थांची मदत घेण्यात यावी. महापालिकेला विकासावर अधिक खर्च करणे शक्य व्हावे यासाठी आऊटसोर्सिंग आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा.  महापालिकेने  माहिती तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग सुरू केला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शहर विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे, राज्य शासनाशी संबधीत विषयांच्या बाबतीत महापालिकेस सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
          यावेळी आयुक्त कृष्णा यांनी सादरीकरणाद्वारे शहरातील विकास योजना आणि समस्यांची माहिती दिली.

----

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ शतक महोत्सव

शाश्वत विकासासाठी ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज-   देवेंद्र फडणवीस             


नाशिक दि.28 –शाश्वत विकासासाठी सर्वांना समानता देणाऱ्या आणि सर्व प्रकारच्या भेदभावाला बाजूला सारणाऱ्या ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज आहे, , असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिक शिक्षण  प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेच्या धामणकर सभागृहाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाभक, विनायक गोविलकर, देणगीदार गंगूताई धामणकर आणि सिंधूताई धामणकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 21 व्या शतकामध्ये पैसा नव्हे तर गुणवत्ता ही संपत्ती ठरेल. शिक्षणात सर्वसमावेशकता आहे. समाज घडवणारी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न शिक्षणाच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळेच शिक्षणाला गुणवत्तेकडे नेण्याची गरज असून हे काम शासन, शिक्षण संस्था, शिक्षक आणि पालकांचे आहे.
शिक्षणाबाबत पूर्वी राज्याचा देशात पंधरावा क्रमांक होता, पण सरकारने प्रगत शिक्षण अभियानाची अंमलबजावणी केली. 40 हजार शाळा उन्नत केल्या. याद्वारे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. शैक्षणिक सुधारणांच्या या प्रयत्नांमुळे राज्य लवकरच देशात पहिल्या क्रमांकावर जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज ही गरज असून येथून पुढे भव्यतेपेक्षा आवश्यकता, नीटनेटकेपणा यांना महत्वाचे ठरणार आहे. ‘मोबाईल फोन’ हा या बदलाचा निदर्शक असून आपल्या हातामध्ये आपले ऑफिस, बँक, स्टोअर सामावले गेले आहे.  तंत्रज्ञानाचा अशा उपयोगामुळे विकासाचा मार्ग अधिक विस्तारणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 44 हजार शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही होत, तंत्रज्ञानाचे दूत होण्याची घोषणा केली आहे ही महत्वाची घटना आहे. ज्ञानाची सर्वांसाठी दारे उघडी होण्यासाठी ज्ञान-युगात तंत्रज्ञानाचे योगदान आहे. या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन जगभरातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाविद्यालये, शाळा व शैक्षणिक संस्थांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वाटचालीतील आव्हाने पेलताना शिक्षणाच्या या वटवृक्षाखाली अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञान घेतले आहे, अभिमान वाटावा असे असंख्य नामवंत विद्यार्थी निर्माण झाले आहेत. हे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा चांगले काम झाले आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 100 वर्षे पूर्ण करणारी ही संस्था इतर शिक्षण संस्थांच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावेल. शतक महोत्सवी वर्षांत संस्थेने ज्ञान, विचार व संकल्पनांची देवाण घेवाण करणारे संमेलन आयोजित करुन चांगले कार्य हाती घेतले आहे. संस्थेने विद्यार्थ्यांच्या 1 कोटी सुर्य नमस्कारांचा उपक्रम हा ‘प्रिव्हेंटीव्ह मेडीसीन’चा उत्तम मार्ग आहे.  सुर्याच्या उर्जेचा हा स्त्रोत तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
समाजव्यवस्थेच्या संवर्धनामध्ये विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींनी आपण समाजाला काय देऊ शकतो हे विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना त्यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाला एक कोटी रुपये दान करुन धामणकर भगिनींनी दातृत्वाचे मोठे उदाहरण उभे केले आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले .

पालकमंत्री महाजन म्हणाले, नाशिक हे विविध शिक्षणाचे हब असून येथे अनेक चांगल्या संस्था आहेत. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विद्यार्थीं  घडवले यामुळे संस्थेचा नावलौकिक वाढतो आहे. ही संस्था अनेकांच्या ध्येय व त्यागातून उभी राहीली आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देणगीदार धामणकर भगिनींचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वाटचालीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीची त्यांनी पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. काकतकर आणि कार्याध्यक्ष दाभक यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याची व उपक्रमांची माहिती दिली. कुसुमाग्रज, दत्ता भट, डॉ गिरीष ओक, शरद जोशी यासारख्या असंख्य नामवंतांनी संस्थेमध्ये शिक्षण घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
000000

स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव

स्वा.सावरकरांना अभिप्रेत समाजविचार जपण्याचा प्रयत्न करु या
-        देवेंद्र फडणवीस

नाशिक दि.28- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातीभेद, विषमता याबरोरच समाजातील  अनिष्ट रुढी, परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. समाजातील या विषमता दूर करुन स्वा.सावरकरांना अभिप्रेत असलेला समाजविचार जपण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करु या, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

        स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मोत्सावानिमित्त त्यांचे जन्मगाव भगूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव समितीचे निमंत्रक प्रसाद लाड, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, सहायक जिल्हाधिकारी अमोल एडके, भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, नाशिकचे उपमहापौर प्रथमेश गीते आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, भारतभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सावरकरांनी आपले जीवन मातृभूमीला अर्पण केले. ते क्रांतीकारकांचे  प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या तेजाने क्रांतीकारकांची पिढी निर्माण करण्याचे कार्य केले. अनेकदा अपमान आणि अन्याय सहन करून ही देशसेवेचा विचार सावरकरांनी कधीच ढळू दिला नाही. हे त्यांच्या जीवनातील मोठेपण होते.
अंदमान येथे काळ्यापाण्याची शिक्षा भोगतांना भारतमातेच्या उज्वल भवितव्यासाठी सावरकर सतत कार्यरत राहिले. इंग्रजांनी क्रांतीकारकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अनेकदा त्यांचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी परिस्थितीला शरण न जाता तरुण पिढीत देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले. त्यांच्या तेजाने क्रांतीकारकांची वसाहत निर्माण करण्याचे कार्य केले. अंदमानच्या कारागृहातही त्यांनी कैदांना एकत्र करुन देशभक्तीचे धडे दिले. देशात जोपर्यंत जातीव्यवस्था, रुढी व परंपरा आहे. तोपर्यंत भारत गुलाम राहील हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी  या परंपरा तोडण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन  त्यांना अभिप्रेत असलेले विचार अनुसरण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करून त्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, असे श्री.फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरदेखील सावरकरांच्या महान कार्याची दखल पाहिजे तशी घेतली गेली नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री. महाजन म्हणाले, स्वा. सावरकरांनी त्याग, देशप्रेम आणि सहनशीलतेची शिकवण दिली. त्यांचा जीवनलेख सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. सावरकारांसारखे राष्ट्रप्रेमी भगूरच्या मातीतून घडले याचा जिल्हावासियांना अभिमान आहे. त्याग आणि सहनशीलतेची शिकवण देण्याऱ्या सावरकरांच्या स्मारकाचे जतन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच 65 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली.
तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर स्मारकामधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

स्मारकस्थळी अभिप्राय नोंदवहीत त्यांनी अभिप्राय नोंदविला. तेजस्वीता, तपस्वीता आणि त्यागाचे मुर्तीमंत उदाहरण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षावधी क्रांतीकारकांचे प्रेरणास्त्रोत होते. बारा वर्षापेक्षा अधीक काळ अंदमानच्या शिक्षेची तमा न बाळगता प्रखर तेजाने इंग्रजी साम्राज्याविरोधातील मशाल तेवत ठेवणारे देशभक्त, कवी, समाजसुधारक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या भारतमातेच्या तेजस्वी सुपुत्राच्या घराचे दर्शन मंदिराच्या दर्शनापेक्षा जास्त पवित्र आहेअसे श्री. फडणवीस यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वा. सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत दुर्मिळ पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ‘संस्कार भारतीने काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. नंदेश उमप यांनी सादर केलेल्याशतजन्म शोधीतांनाया स्वा. सावरकर यांच्या गीतांच्या कार्यक्रमाचादेखील त्यांनी आस्वाद घेतला. श्री.लाड यांनी जन्मोत्सव समितीच्यावतीने मुख्यमंत्री महोदयांना स्वा.सावरकर यांचे समग्र साहित्याचा संच भेट दिला. भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर येथे स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा दौऱ्यावर ओझर विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत पालकमंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर होते.
पालकमंत्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्याच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, अनिल कदम, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त महेश झगडेविशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.
------


Saturday 27 May 2017

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’

रोजगार आणि शिक्षण विषयावर
रविवारी मी मुख्यमंत्री बोलतोयमध्ये मुख्यमंत्र्यांची विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे

नाशिक दि.27 : शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा, नवीन विद्यापीठ कायद्यातील सुधारणा, ॲप्रेंटिशीप कायद्यातील बदलामुळे रोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी अशा विविध विषयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पष्ट, निर्भिड आणि प्रामाणिक उत्तरे देणार आहेत.

मी मुख्यमंत्री बोलतोयकार्यक्रमाचा पहिला भाग रविवारी म्हणजेच दिनांक 21 मे रोजी प्रसारित झाला होता. आता याच कार्यक्रमाचा दुसरा भाग येत्या रविवारी म्हणजेच 28 मे रोजी सकाळी 10.00 वाजता झी 24 तास या वाहिनीवर, सकाळी 10.30 वाजता झी मराठी आणि सह्याद्री वाहिनीवर तर साम मराठी या वाहिनीवर सकाळी 11.00 प्रक्षेपित होणार आहे. सह्याद्री दूरदर्शनवर या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवारी 29 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या दिलखुलास या कार्यक्रमातही मी मुख्यमंत्री बोलतोयकार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सोमवार आणि मंगळवार म्हणजेच दिनांक 29 मे आणि 30 मे असे दोन दिवस सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी शालेय/महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील सुधारणा या‍ विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर दुसऱ्या भागात शिक्षण व्यवस्थेतील वेगवेगळे प्रश्न, शिक्षण पद्धतीतले 10+2+3 हे असलेले सूत्र, आगामी काळात शिक्षणामध्ये होणारे बदल याबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत निर्मित मी मुख्यमंत्री बोलतोयया कार्यक्रमाच्या मालिकेत विषय निवडून त्या विषयाशी संबंधित निमंत्रिताशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधतात. दर महिन्याला या कार्यक्रमाचे ध्वनीचित्रमुद्रण करून दोन भागात प्रसारित करण्यात येते.
-----

Friday 26 May 2017

शेततळ्यामुळे फळबाग बहरली

शेततळ्यामुळे दातली गावच्या शेळके यांची फळबाग बहरली

नाशिक दि.26- उन्हाळ्यात टंचाईचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातल दातली गावात शरद शेळके या सुशिक्षित शेतकऱ्याने शेततळ्याच्या सहाय्याने टंचाईवर मात करून फळबाग लागवड केली आहे. शाश्वत सिंचनसुविधा उपलब्ध झाल्याने त्यांनी डाळींबाची लागवड करून उत्पन्न वाढविले आहे.
शेळके यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. त्यात खरीपाबरोबर भाजीपाला पिकविला जात असे. अनेकदा पाणी टंचाईमुळे उत्पन्न कमी झाल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागे. शेतातली विहिर नोव्हेंबरमध्ये अटत असल्याने दुसऱ्या पिकासाठी तीचा उपयोग मर्यादीतच होता. त्यामुळे विहिरीच्या पाण्यावर अर्ध्या एकर क्षेत्रात लावलेली डाळींबाच्या बागेद्वारे त्यांना काहीच लाभ झाला नाही. डाळींबाला पाणी देण्यासाठी टँकरचा खर्च करावा लागत असल्याने खर्च वाढून उत्पन्न कमी मिळत होते.

कृषी सहाय्यक रुपाली लावरे यांच्याकडूनमागेल त्याला शेततळेया योजनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी डाळींबाच्या बागेसाठी शेततळे घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्याचबरोबर शेततळ्याला लागणारा खोदकाम खर्च आणि कुंपण असे मिळून त्यांना 50 हजाराचे अनुदान मिळाले. फेब्रुवारी 2016 महिन्यात शेततळे तयार झाले.
पावसाळ्यात विहिरीच्या पाण्यातून शेततळे भरल्यानंतर त्यांनी डाळींबाच्या बागेचे क्षेत्र साडेतीन एकरावर नेले आहे. सोबतच भाजीपाला लागवडही अधिक प्रमाणात केली आहे. शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाल्याने त्यांनी शेतात ठिबक सिंचनाची सुविधा केली आहे. त्यासाठीदेखील कृषी विभागाकडून अनुदान मिळालेत्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेणे शक्य झाले आहे.
शेळके यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळपिकांसाठी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टरसाठी एक लाखचे अनुदान घेतले. त्यामुळे शेतातील कामांनादेखील गती येण्याबरोबरच मजूरांची कमतरतादेखील भासत नाही.
शाश्वत सिंचन आणि यांत्रिकीकरणामुळे उत्पनात वाढ  झाल्याचे शेळके सांगतात. पूर्वी वर्षाला 1 लाख असणारे उत्पन्न आता 3 लाखावर पोहोचले आहे. शेततळ्याच्या माध्यमातून शेळके यांची वाटचाल आर्थिक समृद्धीच्या दिशेने सुरू आहे.

शरद शेळके- शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्याने जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. जुने कौलारू घर पाडून नवे घर उभारण्याचा विचार आहे. शेततळ्यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने हा सर्व बदल शक्य झाला. नवे तंत्रज्ञान शेतीसाठी खरोखर उपयुक्त आहे.


हक्काचे ‘घरकूल’


मांगोणे ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांनी गरजूंना मिळाले हक्काचे ‘घरकूल’

नाशिक दि.25- पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याने इंदिरा आवास योजनेअंतर्गत 64 कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे.
नाशिक-पेठ मार्गावरील करंजाळीपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासी गावात एकूण 330 कुटुंब राहतात. गावात 65 टक्के कुटुंब भूमीहीन असल्याने तुटपुंज्या कमाईतून घराचे स्वप्न साकार करणे त्यांना शक्य नव्हते.
 खरीपाचा हंगाम संपल्यावर मजूरीसाठी भटकंती ठरलेली आणि त्यामुळे स्वप्नातले घर प्रत्यक्षात आणणे त्यांना शक्य  नव्हते. अशावेळी तरुण ग्रामसेवक दिपक कोतवाल यांनी गटविकास अधिकारी बी.बी.बहिरम यांच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या मनात घराविषयी आशा निर्माण केली आणि अनेकांचे घराचे स्वप्न इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून पुर्णदेखील केले.

गावातील गरीब नागरिकांची घरे मातीची, प्लास्टीकचे आच्छादन असलेली आणि काही ठिकीणी जुन्या कौलांची होती. पावसाळा आला की त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागे. तात्पुरती डागडुजी करून दिवस पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. शासकीय योजना तर होती मात्र अंमलबजावणीत अडचणी होत्या. कोतवाल यांनी पुढाकार घेऊन ग्रामसभेत अडचणींवर चर्चा केली.
वीटांची समस्या दूर करण्यासाठी काही लाभार्थ्यांनी शेतात वीटभट्टी तयार केली. सरपंच उषाताई गवळी यांनी दुकानदारांना विनंती करून उधारीवर सिमेंट मिळवून दिले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने मजूरी केल्यास त्याला 18 हजारापर्यंत मजूरी देण्यात आली. त्यामुळे मजूरी आणि घर असा दुहेरी लाभ त्याला झाला. गावातील अकुशल मजूरांना रोजगार मिळण्याबरोबर रोहयो अंतर्गत 5 हजार 660 मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला.

गावात शबरी आवास योजनेअंतर्गत तीन घरांचे बांधकाम सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक घराचे बांधकाम सुरू आहे. गावात पक्की घरे आणि समोर सिमेंटचे रस्ते यामुळे गावातील राहणीमानही बदललेले चटकन जाणवते ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान या योजनेचे महत्व अधोरेखित करणारे आहे.
इंदिरा आवास योजनेअंतर्गत काम सुरू करताना 35 हजार, पायाचे बांधकाम झाल्यावर 35 हजार, आणि काम पुर्ण झाल्यावर 25 हजार असे तीन टप्प्यात अनुदानाची रक्कम देण्यात आली. लाभार्थ्याचा हिस्सा केवळ 5 हजार होता. त्याला साधारण मिळालेली मजूरी लक्षात घेता एक लाख 18 हजारात पक्के घर तयार झाले.

दिपक कोतवाल, ग्रामसेवक-ग्रामस्थांनी समन्वयाने काम केल्याने योजना प्रभावीपणे राबविता आली. लोकांना घर मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून कामासाठी ऊर्जा मिळते. आणखी गरजूंनी योजनेचा लाभ देण्याबरोबर गाव  कचरामुक्त करण्याचाही प्रयत्न आहे.

हनमंत गाढवे, ग्रामस्थ- जुने घर गळायचे, त्यामुळे पावसाळ्यात खुप त्रास होत असे. आता शौचालय असलेले नवे घर मिळाल्याने खुप समाधान आहे. जागादेखील मोठी आहे. एवढे चांगले घर मिळाले याचा घरातील प्रत्येकाला आनंद आहे.

000000