Tuesday 30 May 2017

‘मेक इन नाशिक’

मेक इन नाशिकचा ब्रँड विकसित करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





मुंबई, दि. 30 : नाशिकमधील कृषी प्रक्रिया उद्योग व अन्य उद्योगांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येतील.मेक इन महाराष्ट्रच्या बरोबर मेक इन नाशिकचा ब्रँड विकसित करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

‘निमा’ (नाशिक औद्योगिक आणि उत्पादक असोसिएशन) संस्थेतर्फेवरळी येथील नेहरु सेंटरमध्ये आयोजित केलेल्या मेक इन नाशिककार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार श्रीमती देवयानी फंरादे, सीमा हिरे, महापौर श्रीमती रंजना भानसी, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंघल, निमाचे अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी, नाशिकचे जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले की, नाशिकमध्ये कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगाला आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा देण्यात येतील.यातूनच शेतकऱ्यांच्या विकासाला चालना मिळेल. नाशिक शहर व नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसायालाही खुप मोठी संधी आहे. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असणारी सर्व मदत दिली जाईल. मुंबई-पुणे नंतर नाशिकमध्ये उद्योग गुंतवणूकीला खूप मोठी संधी आहे. नाशिकला मोठे उद्योग प्रकल्प मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. मालेगाव येथे औद्योगिक विकास होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लवकरच जागा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवणुक ही महाराष्ट्रात होते. परकीय गुंतवणुकीमध्ये देशात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र हे देशाचे पॉवर इंजिन आहे. जगातील सर्वात तरुण लोकसंख्या भारतात आहे. या तरुणाईच्या कौशल्याच्या बळावर मेक इन इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना यशस्वी करु, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
‘निमा’ने आयोजित केलेल्या मेक इन नाशिकच्या दोन दिवसाच्या चर्चासत्रातून नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी जे जे मुद्दे येतील त्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन ‘मेक इन नाशिक’च्या यशस्वीततेसाठी प्रयत्न करु, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
००००



No comments:

Post a Comment