Saturday 20 May 2017

मालेगाव महानगरपालिका निवडणूक

सहजतेने मतदानासाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात
                                                     - जे.एस.सहारिया


मालेगाव, दि. 20 - आदर्श आचार संहितेची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच मतदानाच्या दिवशी मतदारांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज दिले.
मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी  मुख्य निवडणूक निरीक्षक राधेश्याम मोपलवार, राज्य  निवडणूक आयोगाचे  सचिव  शेखर चन्ने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त रविंद्र जगताप, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,  अप्पर पोलीस अधिक्षक राकेश ओला, उपविभागीय अधिकारी अजय मोरे,तहसिलदार डॉ. सुरेश कोळी, आदी उपस्थित होते.

श्री. सहारिया म्हणाले, आदर्श आचार संहितेची कडक अंमलबजावणी करतांना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत दक्षता घ्यावी. उमेदवाराकडून करण्यात येणारा प्रत्यक्ष खर्च विहित मर्यादेच्या बाहेर जाणार नाही यासाठी प्रचाराची वाहने, सभा आदी खर्चाची बारकाईने पडताळणी केली जावी.  आचार संहितेच्या भंग करणाऱ्यावर तातडीने  कारवाई  करावी .   
मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, उन्हाच्या वेळी सावलीची व्यवस्था, मदत कक्ष, प्रसाधनगृह आदी सुविधा असाव्यात. दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, रुग्णवाहिकेची उपलब्धता, मतदान कक्षापर्यंत रॅंपची व्यवस्था करावी. त्याचबरोबर त्यांची वहाने मतदान केंद्रापर्यंत येण्याची सोय करावी जेणेकरुन त्यांनाही आपण या प्रकियेचा एक भाग असल्याचा जाणीव होईल, अशा सुचना श्री. सहारिया यांनी दिल्या.

 सर्व मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप व्हावे यासाठी प्रयत्न केले जावेत तसेच मतदान केंद्राच्या जवळ हेल्प डेस्कद्वारे त्यांचे मतदार यादीतील नाव कळावे यासाठी संबंधितांना मतदार यादी व ट्रु- व्होटर ॲप्सची उपलब्धता करुन द्यावी, ते म्हणाले.
याप्रसंगी सचिव श्री.चन्ने यांनी सांगितले की मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाव्यात. उमेदवारांनी   निवडणूकीचा खर्च आयोगास सादर करणे बंधनकारक असून   उमेदवारी माघारी घेणाऱ्यांनीदेखील  वेळेत खर्चाचा तपशिल द्यावा. आवश्यक प्रक्रीया योग्य कालावधीत पूर्ण करण्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
 जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्णन, पोलीस अधिक्षक श्री.शिंदे यांनी निवडणूकीसाठीच्या तयारीबाबत माहिती दिली. मतदानासाठी 115 इमारतीमध्ये 569 मतदान केंद्र सज्ज करण्यात येत  असून 3 लाख 91 हजार 320 मतदार मतदान करतील. यासाठी 3 हजार 355 कर्मचारी नियुक्त करणत आले आहेत, अशी माहिती श्री.जगताप यांनी दिली.
श्री. राकेश ओला यांनी  मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात 1,110  पोलीस कर्मचारी , 114 अधिकारी व 8 वरिष्ठ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असून त्यांच्या मदतीला 572 गृहरक्षक दलाचे जवान असतील, असे सांगितले.

************

No comments:

Post a Comment