Thursday 30 March 2017

सर्वसमावेशक प्रगत कुशल योजना

एकलहरे प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अभिनव योजना
पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या पाठपुराव्याला यश


नाशिक, दि.30- महानिर्मिती कंपनी अंतर्गत एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रकाकरिता ज्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून  घेण्याबाबत सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यात आले असून महानिर्मिती कंपनीने ‘सर्वसमावेशक प्रगत कुशल योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री गिरीष महाजन यांनी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री.महाजन यांना पत्राद्वारे सदर योजनेची माहिती कळविली आहे. तसेच योजनेच्या कार्यक्षम अंमलबजावणीद्वारे सदर औष्णिक प्रकल्पांतील अधिकाधीक प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याकरिता प्रकल्पग्रस्त आणि संबंधीत अधिकारी यांचेसोबत समन्वय बैठक आयोजित करण्याविषयी कळविले आहे.
महानिर्मिती कंपनीमध्ये आयटीआय अर्हताधरक असलेल्या तथापि कंपनीच्या खुल्या भरतीत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेनुसार अद्यापही सामावून  न घेतलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी प्रगतकुशल योजना राबविण्यात येते.
या योजनेत आय.टी.आय.शिक्षण असणाऱ्या प्रगतकुशल उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून गुणवत्तेनुसार महानिर्मिती कंपनीच्या सेवेत सामावून घेईपर्यंत अथवा वयाची 45 वर्षे होईपर्यंत दरमहा 10 हजार रुपयापर्यंत विद्यावेतन दिले जाते. वयाची 45 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 58 वर्षे पर्यंत दरमहा 10 हजार रुपये निर्वाहभत्ता किंवा कंपनीकडून व्यवसायाकरीता एक रकमी 5 लाख रुपये अनुदान दिले जाते.
आय. टी.आय. शैक्षणिक पात्रता नसलेल्या पण कंपनीत नोकरी करण्याची इच्छिणाऱ्या अशा प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरीता सर्व समावेशक प्रगत कुशल योजना राबविण्यात येणार आहे. योजनेत उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार निर्वाहभत्ता दिला जाणार आहे. पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण असणाऱ्या अकुशल उमेदवारांना 6000 रुपये दरमहा, नववी ते बारावी च्या अर्धकुशल उमेदवारांना 6500 रु. दरमहा, वाहनचालक, नर्स, फार्मासिस्ट, पदवी, आयटीआय, पदव्युत्तर शिक्षण असणाऱ्या कुशल उमेदवारांना 7500 रु. दरमहा आणि अभियांत्रिकीतील डिप्लोमा व बी.ई असणाऱ्या कुशल उमेदवारांना 10 हजार रु. दरमहा निर्वाहभत्ता दिला जाईल.
प्रशिक्षणार्थींना मानधनात प्रतिवर्षी 500 रु. वाढ देण्यात येईल. ही योजना फक्त महानिर्मिती कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांकरीता लागू राहील.प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रतिवर्षी 5 प्रमाणे कमाल 25 गुण देण्यात येणार आहेत याचा लाभ महानिर्मितीद्वारे होणाऱ्या खुल्या भरतीच्या वेळी वाढीव गुण म्हणून केला जाईल. योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींना रुजू झाल्याच्या दिनांकापासून ते कंपनीच्या विविध पदांवर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेनुसार सेवेत दाखल  होईपर्यंत किंवा वयाची 58 वर्षे पुर्ण करेपर्यंत निर्वाह भत्ता दिला जाईल.  योजनेविषयी अधिक माहिती संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी
पालकमंत्री महाजन यांच्या प्रयत्नांमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. दिनदयाळ ग्राम ज्योती योजनेअंतर्गत नाशिकसाठी 39.54 कोटी आणि जळगावसाठी 71.63 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. तर एकात्मि ऊर्जा विकास योजनेअंतर्गत नाशिकसाठी 96.25 कोटी आणि जळगावसाठी 100.65 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्युतीकरणाला व वीजपुरवठ्या  संदर्भात पायाभूत सुविधांच्या विकासात मदत होणार आहे.
----



Tuesday 28 March 2017

‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’

राज्यात उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानास आजपासून प्रारंभ
·       2 लाख शेतकऱ्यांना विविध पिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार
·       1 कोटी सहा लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप
·       5 वर्षाचा बियाणे पुरवठ्याचा आराखडा
·       ठिबक सिंचनासाठी तातडीने पूर्वसंमती
·       आठ हजार कांदा चाळींच्या उभारणीचे नियोजन
·       शेतकऱ्यांना प्राथमिक प्रक्रिया युनिट उभारण्याकरीता अर्थसहाय्य

मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचा शुभारंभ केल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. आकाशवाणीवरूनशेतकऱ्यांना संदेश प्रसारीत करून कृषिमंत्र्यांनी अभियानाची सुरूवात केली.
या अभियाना विषयी अधिक माहिती देताना श्री. फुंडकर यांनी सांगितले की, शेतकरी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पुढील वर्षाच्या शेतीचे नियोजन सुरु करतो. त्याप्रमाणे शासनाने देखील खरीप हंगामाच्या शेतीचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा आणि घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न मिळावे हा या नियोजनाचा मुख्य हेतू आहे.
तालुका हा विकास घटक
5 वर्षाचा बियाणे पुरवठ्याचा आराखडा
या वर्षीपासून कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी तालुका हा विकास घटक ठरवून नियोजन करण्यात आले आहे. शासनाने खरीप हंगामामध्ये लागणारे उत्तम प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पुढील 5 वर्षाचा बियाणे पुरवठ्याचा आराखडा देखील तयार केलेला आहे.  खतांचाशेतकऱ्यांनामुबलकपुरवठावेळेतहोईलयाबाबतही नियोजन केलेले आहे. दर्जेदार कंपन्यांच कीटक नाशके, शासकीय प्रयोगशाळेतून जैविक द्रवरूप खते व जैविक कीटक नाशकांच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे. कृषी विभागासह सर्व कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, आणि सर्व संशोधन संस्था यांनी त्यांच्याकडील कामाचे नियोजन केलेले आहे.

कृषी यांत्रिकीकरणाची मोहीम
शेतकरी बांधवाना खरीप पूर्व मशागतीची व पेरणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी, शेतीतील बैलांची कमी झालेली संख्या व ऐन हंगामात निर्माण होणारी मजुरांची टंचाई यावर मात करून पिकांच्या काढणी पर्यंतची कामे सुकरपणे करणे शक्य व्हावे यासाठी कृषी यांत्रिकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांना 4 बैलांचे काम करू शकणारे छोटे ट्रॅक्टर, पॅावर टिलर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, थ्रेशर, तसेच भातासाठी ट्रान्सप्लांटर, रिपर, ऊसासाठी पाचट कुट्टी यंत्र, फळबागेसाठी स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर इ. यंत्र खरेदी साठी वर्षाच्या सुरुवातीपासून शासन अनुदान उपलब्ध करून देणार आहे. ही यंत्रे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीने खरेदी करण्याची मुभा शासन देणार आहे आणि त्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
उन्नत शेती - समृद्ध शेतकरी पंधरवडा
या वर्षी संपूर्ण रोहिणीनक्षत्रातील 15 दिवस कृषी विभाग “उन्नत शेती - समृद्ध शेतकरी पंधरवडासाजरा करणार आहे. या पंधरवड्यात सर्व कृषी शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी गावोगावी जावून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहेत.  शेतकऱ्यांसाठीअसलेल्याविविधयोजनांचीमाहितीदेतील. यावर्षातराज्यातीलसुमारे2 लाख शेतकऱ्यांना विविध पिकांच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येईल.
1 कोटी सहा लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप
शासनाने राज्यातील शेत मिनींची आरोग्य पत्रिका तयार करून 1 कोटी सहा लाख शेतकऱ्यांना वितरीत केल्या आहेत. सदर आरोग्य पत्रिकांच्या आधारे शेतकऱ्याने आपल्या जमिनीत घेणाऱ्या पिकांकरीता आवश्यक मात्रेतच खते द्यावीत व उत्पादन खर्चामध्ये बचत करावी. याकामी शेतकऱ्यांना गावातील कृषी सहाय्यकांचे सहाय्य मिळणार आहे.
श्री. फुंडकर पुढे म्हणाले की, कृषी विभाग नवीन वर्षामध्ये गाव पातळीवर 10 हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहे. यामध्ये शेतकरी गटास प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण शास्त्रज्ञांमार्फत देण्यात येणार आहे. या प्रात्यक्षिकांसाठी लागणारे खते, बियाणे, औषधे याची खरेदी शेतकऱ्यांनीच करावयाची आहे आणि त्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येईल.
 ठिबक सिंचनासाठी तातडीने पूर्वसंमती
 नविन वर्षात ठिबक सिंचन योजनेच्या निधीमध्ये भरीव वाढ केली जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून ते डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा दिली जाईल. पात्र लाभार्थ्यांना तातडीने पूर्वसंमती देण्यात येईल जेणेकरून शेतकऱ्यांना पिक लागवडी पासूनच ठिबक सिंचन संच बसविणे शक्य होईल. शासन ठिबक सिंचन संचाच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करेल.
आठ हजार कांदा चाळींच्या उभारणीचे नियोजन
राज्यातील शेतकऱ्यांची कांदा चाळ उभारणी करीता  असलेली मोठी मागणी लक्षात घेता कांदा चाळीसाठी भरीव तरतूद केली आहे. या माध्यमातून दोन लाख मेट्रीक टन कांदा साठवणूक क्षमता निर्माण करण्यासाठी आठ हजार चाळींच्या उभारणीचे नियोजन आहे व त्याकरीता  शासन शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान देईल.
राज्यातील ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी ऊसाच्या सुधारित वाणांची लागवड करण्याच्या दृष्टीने रोपांपासून ऊसाची लागवड करण्याच्या तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर शेडनेट मध्ये ऊसाची रोपवाटिका तयार करण्याकरिता अनुदान देण्यात येईल.
शेतकऱ्यांना कमी नैसर्गिक साधन सामुग्रीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य व्हावे म्हणून शेड नेट व हरित गृह उभारण्याकरीता शासन यावर्षी प्रमाणेच नवीन वर्षात देखील भरीव निधी उपलब्ध करून देईल. त्याचप्रमाणे शासन फलोत्पादनासाठी देखील भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना प्राथमिक प्रक्रिया युनिट उभारण्याकरीता अर्थसहाय्याची योजना
शेतकऱ्यांना शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करून मूल्यवर्धित माल बाजारपेठेत विक्रीस नेणे शक्य व्हावे म्हणून शेतकऱ्यांना प्राथमिक प्रक्रिया युनिट उभारण्याकरीता  अर्थसहाय्य करण्याची नवीन योजना कृषी विभागामार्फत ह्या वर्षापासून सुरु करणार आहे.  
शेतकऱ्यांच्या शेतावर ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, आधुनिक औजारे, कांदा चाळी, शेड नेट, विहिरी, पंप इ. पायाभूत सुविधा निर्माण करून शेतकऱ्यांना आधुनिक शेती करता यावी व त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ व्हावी ही शासनाची भूमिका आहे. त्याकरीता नवीन वर्षात शेतकऱ्यांना शासन मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य पुरविणार आहे. शासनाचे सदर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर देण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याकरिता  शेतकरीबांधवांनीआपल्याबँकेशीसंपर्कसाधूनआपलेबँकखातेआधारक्रमांकाशीसंलग्नकरूनघ्यावेतसेच, ज्यांच्या आधार क्रमांक नसतील त्यांनी तातडीने नजीकच्या सेवा केंद्रातून आपले आधार कार्ड काढून घ्यावे. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारीत फळ पीक योजनेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. फुंडकर यांनी यानिमित्ताने केले.
०००


Monday 27 March 2017

आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार

विकास योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उन्नतीचे प्रयत्न
                                                             -विष्णु सवरा

नाशिक, दि.27- वन हक्क जमीन कायदा , पेसा कायदा आणि शासनाच्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उन्नतीचे प्रयत्न करण्यात येत असून  अडचणींवर मात करुन हे आव्हान शासन पूर्ण करेल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु  सवरा यांनी व्यक्त केला.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित सन 2015-16 व 2016-17 सालच्या राज्यस्तरीय आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,  आमदार जे.पी.गावित, निर्मला गावित, महापौर रंजना भानसी, आदिवासी विकास सचिव मनिषा वर्मा, आयुक्त राजीव जाधव, आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, किसन तडवी आदी उपस्थित होते.

श्री.सवरा म्हणाले, विभागातील योजनांचा हेतू आदिवासींचा विकास हा असून शासन त्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करीत आहे . अनेक स्वयंसेवी संस्थांचादेखील यात सहभाग आहे. स्वत:हून प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्या अशा व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा शासन नेहमी प्रयत्न करते. या प्रयत्नांमध्ये सगळ्यांचेच योगदान गरजेचे आहे. ‘देशको दे जो दान रे, वो सच्चा इन्सान रे’ ही प्रार्थना आपल्याला अशा कामासाठी सदैव प्रोत्साहित करते, असे ते म्हणाले.

शासनाच्या प्रयत्नांबद्दल बोलताना मंत्री सवरा म्हणाले, दर्जेदार शिक्षण आदिवासी मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी 48 हजार मुलांना आतापर्यंत नामांकित इंग्रजी शाळात प्रवेश देण्यात आला आहे. शहरातील वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळू न शिकलेल्या विद्यार्थ्यांना निवासव्यवस्थेसाठी आर्थिक सहाय्य करण्यात येत असून त्यासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना आदिवासी विकास विभागात चांगल्या पदावर नियूक्ती दिली जाईल, असेही श्री.सवरा यावेळी म्हणाले.

राज्यमंत्री भुसे म्हणाले,आदिवासींसाठी असलेल्या योजनांचे अतिशय सुंदर नियोजन मंत्रालय स्तरावर होते. या योजना आदिवासी भागाच्या विकासासाठी उपयुक्त आहेत. विविध संस्था आणि व्यक्ती शासनाच्या खांद्याला खांदा लावून या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या कार्यातून इतरांनही प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महापौर श्रीमती भानसी यांनी आदिवासी महिलांच्या बचत गटांना व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांना जागा देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
 सचिव श्रीमती वर्मा यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन करताना डीबीटीएल, वनहक्क जमीन व पेसा कायद्याचा चांगला फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल, असे सांगितले.
श्री.सवरा यांच्या हस्ते आदिवासी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आदिवासी सेवक आणि सेवा संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती
प्रमोद गोपाळराव गायकवाड(नाशिक), रमेश एकनाथ रावले(कळवण), बजरंग बापुराव साळवे(पिंपळगाव, अहमदनगर), डॉ.कांतीलाल टाटीया(शहादा, नंदूरबार), श्रीमती सरस्वती गंगाराम भोये(विक्रमगड, पालघर), लक्ष्मण सोमा डोके(जव्हार, पालघर), हरेश्रर नथू वनगा(डहाणू, पालघर), मनोहर गणू पादीर(लोभेवाडी, कर्जत, रायगड), रामेश्रर सिताराम नरे(करंजाडी, महाड, रायगड), भगवान माणिकराव देशमुख(नांदेड), श्रीमती पौर्णिमा शोभानाथ उपाध्ये(गारखेडा, अमरावती), सुनिल गुणवंत देशपांडे(लवदा, धारणी, अमरावती), सदाशिव डोमा घोटेकर (सरपधरी, कळंब, यवतमाळ), सुखदेव नारायण नवले(कारकिन, पैठण, औरंगाबाद), राजाराम नवलुजी सलामे( म्हैसुली, देवरी, गोंदिया) व प्रमोद शंकरराव पिंपरे(गडचिरोली)   
पूरस्कार मिळालेल्या सेवा संस्था

शाश्वत संस्था (मंचर पुणे),विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचलित राष्ट्र सेवा समिती(वसई, पालघर), डॉ.हेडगेवार सेवा समिती (नंदुरबार), आम्ही आमच्या आरोग्यासाठी (कुरखेडा, गडचिरोली),वनवासी कल्याण आश्रम (नाशिक), सुयश चॅरिटेबल ट्रस्ट( पुणे), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा (कासार आंबावली, मुळशी,पुणे).

अधिकाऱ्यांचे श्रमदान

निराधार महिलेच्या घरचे शौचालय बांधण्यासाठी अधिकाऱ्यांचे श्रमदान


नाशिक, दि.27- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावच्या निराधार महिला मंदाबाई जाधव यांच्या घरी शौचालय बांधण्यासाठी  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर यांनी श्रमदान केले. ग्रामस्थांमध्ये यामुळे उत्साह निर्माण झाला असून येत्या महिन्याभरात गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प नागरिकांनी केला.

जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष प्रयत्न सुरू केले आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रमदान केले. पालघर आणि नाशिकच्या सीमेवरील आदिवासी गाव असलेल्या या गावात एकूण 307 कुटुंबांपैकी 100 कुटुंबांनी शौचालय बांधले आहे. मजूरांची उपलब्धता नसल्याने आणि साधनसामुग्री तालुका स्तरावरून आणावी लागत असल्याने शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद कमी होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर श्रमदानाद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सकाळी गावात आले.

शौचालयासाठी आवश्यक चार फूट खोलीचे दोन खड्डे खोदण्याचे काम दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. त्यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, तहसीलदार महेंद्र पवार,  गट विकास अधिकारी एम.बी.मुरकुटे , सरपंच कल्पना जाधव यांनीदेखील  श्रमदानात सहभाग घेतला. श्री.शंभरकर आणि श्रीमती संगमनेरे हे शौचालय बांधण्यासाठी खर्च करणार असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून विधवा असलेल्या मंदाबाईंना आर्थिक मदत होणार आहे.

शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनी श्रमदानाद्वारे पुढाकार घ्यावा, असे आवाहन राधाकृष्णन यांनी केले. प्रत्येकाला शौचालयाचा हक्क मिळूवन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यात साधनसामुग्री आणि मनुष्यबळाच्या समस्या येतात. मात्र श्रमदानाच्या माध्यमातून त्यावर मात करता येते हे नागरिकांना पटवून देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे  त्यांनी सांगितले.

श्री.शंभरकर म्हणाले, शौचालय बांधणी हा जनतेचा कार्यक्रम वाटायला हवा. विविध शासकीय यंत्रणांचा यात सहभाग आवश्यक आहे. हा सहभाग वाढावा आणि जनतेलाही प्रोत्साहीत करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रातिनिधीक स्वरुपात अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दुर्गम भागात गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे शौचालय बांधण्यास गती देताना युवकांना रोजगारही या माध्यमातून उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी 2018 पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा निश्चयही त्यांनी बोलून दाखविला.
राज्यात पुण्याखालोखाल नाशिक जिल्ह्याने शौचालय बांधण्यात चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी जिल्ह्याला 75 हजार शौचालय उभारण्याचे उद्दीष्ट असताना 95 हजार 893 शौचालय उभारण्यात आली आहेत. 400 गावांचे उद्दीष्ट असताना 451 गाव हागणदारीमुक्त झाले आहेत. पुढीलवर्षी 640 गावाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहितीदेखील श्री.शंभरकर यांनी दिली.
जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी गावात श्रमदानासाठी आल्याने नागरिकांचा उत्साह वाढला असून येत्या महिन्याभरात उर्वरीत घरात शौचालय बांधले जाईल. गरज असेल त्याठिकाणी ग्रामस्थ श्रमदान करतील, असे सरपंच  श्रीमती जाधव यांनी सांगितले. गावातील इतर नागरिकदेखील श्रमदानात सहभागी झाले होते. विशेषत: यात महिलांचादेखील सहभाग होता.

*************

Saturday 25 March 2017

अर्थसंकल्प राज्याचा

अर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न
                                                                        


नाशिक, दि.25- राज्याच्या अर्थसंकल्पाद्वारे कृषीक्षेत्राच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करताना पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे रोजगार निर्मितीवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय आणि महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थसंकल्प राज्याचा…संकल्प विकासाचा’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, उपप्राचार्य डॉ.डी.व्ही.ठाकोर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.पी.देवरे, प्रा.व्ही.एस.मिस्त्री, माहिती सहायक मोहिनी राणे आदी उपस्थित होते.
डॉ.निकम म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पातून विविध भागातील विकासाचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. मानव विकास निर्देशांकात प्रगती करण्यासाठी अशी विकास प्रक्रीया महत्वाची आहे. अर्थसंकल्प या प्रक्रीयेतील महत्वाचा आणि आधारभूत घटक आहे. राज्याच्या विकासाचे प्रतिबींब अर्थसंकल्पात पहायला मिळते. विविध स्वरुपात शासनाकडे एकत्र होणाऱ्या निधीचा लाभ सामान्य जनतेला व्हावा, असे प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात येतात.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. कृषी क्षेत्र सक्षम करण्यासाठी सिंचनावर विशेष भर देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठीदेखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि कोल्ड व्हॅन, संत शिरोमणी आठवडे बाजाराची व्याप्ती वाढविणे आदी अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
कौशल्य विकास आणि रोजगार क्षेत्रासाठी अनेक तरतूदींचा समावेश अर्थसंकल्पात आहे. याशिवाय रस्ते विकास, रेल्वे प्रकल्पांना गती देणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान तसेच सामाजिक क्षेत्रातील योजनांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदींची त्यांनी माहिती दिली.
डॉ.मोघे यांनी अर्थसंकल्पाच्या विवीध पैलूंची माहिती दिली. अल्पसंख्याक बहुल नागरी आणि ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविध उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी जबाबदार नागरिक म्हणून अर्थसंकल्पाच्या विविध पैलूंचा आणि शासकीय योजनांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगून शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

*************

Friday 24 March 2017

शतदा प्रेम करावे

….. शतदा प्रेम करावे!

          कवीवर्य मंगे पाडगावकर यांच्या  शब्दांतून गाण्याला जीवन जगण्याची उभारी मिळते. कारण प्राणीमात्रांमध्ये माणूस हा केवळ प्राणी म्हणून जगत नाही, तर त्याला निसर्गाकडून लाभलेल्या  विचारक्ती आणि तल्लख बुद्धीच्या बळामुळे त्याचे वेगळेपण स्पष्टपणे जाणवते.  डार्विनच्या उत्क्रांती वादानुसार विकासाच्या अनेक टप्प्यानंतर विकसीत जीव म्हणून माणूस भाव-भावना, जगण्यातील संवेदनशीलता, निरागस प्रेम, दया-करूणा अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याची  समृध्द जीवन जगण्याची धडपड सतत सुरू असते, आणि यातच त्याचे श्रेष्ठत्व आहे.
असे असताना अविकसित प्राण्यांमध्येदेखील न आढळणारी आत्महत्या करण्याची अनैसर्गिक प्रवृत्ती अलौकिक विचारक्तीचे वरदान लाभलेल्या माणसात का आढळते, हा व्यथीत करणारा प्रश्न आहे.  माणुस अकाली जीवन संपवणारी आत्महत्या का करतो ? हे अद्याप न उलगडलेल कोड आहे. काल-परवा कौवाघ या 29र्षीय संगणक तंत्रज्ञाने केलेली आत्महत्या अशीच मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यामुळे मन क्षणभर सुन्न झाले. पोलीस विभागाला उत्स्फुर्तपणे वेळोवेळी, निष्काम सेवा देणाऱ्या  या बुद्धीमान तरुणाने अचानक आपले जीवन का संपवावे ? हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे.
                आधुनिक धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीवर समाज म्हणून आपल्याला उपाय शोधलाच पाहिजे. भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते, त्याचा आपण अभिमानही बाळगतो.  मात्र त्याचवेळी बेरोजगारी, गरीबी, व्यसनाधिनता, गुन्हेगारी अशा विविध कारणांमुळे युवक हताश किंवा वैफल्यग्रस्त होतात. एकीकडे जगभर उच्चशिक्षित तंत्रज्ञ म्हणून भारतीय तरुण आपली ओळख निर्माण करीत असताना  कौशलसारख्या तरुणाचा अकाली मृत्यु निश्चिपणे हृदयाल चटका लावून जातो.
 दरवर्षी जगभरात 8 लाख लोक विविध कारणांसाठी आत्महत्या करतात, पैकी एकट्या भारतात ही संख्या दोन लाखाच्या घरात आहे. खरेतरं मानवी जीवन इतके कठोर आणि जगण्यास असह्य मानण्याचे कारण नाही. कारण एका निकोप दृष्टीकोनातुन आपण सभोवताली नजर टाकली तर, मानवी जीवन निखळ आनंद देणारी आणि जगाच्या समृद्धीमध्ये भर घालण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी असल्याचे दिसून येते. निक वुजिसीक नावाचा  हाता-पायांनी संपुर्ण अपंग असलेला ऑस्ट्रेलियनरुण परंतु मनाने अभंग असून, मागील 10 वर्षापासुन संपुर्ण जगाला, जीवन भरभरून जगण्याची प्रेरणा देत आहे. दोन्ही पाय गमावलेला न्युझिलंडचा एव्हरेस्ट विजेता असलेला, 56 वर्ष वयाचा, मार्क इंग्लीस असो किंवा रेल्वे अपघातात पाय गमावलेली, एव्हरेस्ट शिखर विजेती अर्निमा यांनी अनेक संकटावर मात करून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना दिली आहे.
                स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे, ‘मनाचा दुबळेपणा हा एकप्रकारे मृत्युच आहे. आणि आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जाणे ही एकप्रकारीची ताकद आहे.’  जन्माला येणे आणि मृत्यु या दोन गोष्टींवर आमचे नियंत्रण नसले तरी या दोन बिंदुंमधील आयुष्य कसे जगावे, हे संपुर्णपणे माणसाच्याच हातात असते. आजदेखील सीमेवरिल सैनिक मृत्युची कोणतीही भिती न बाळगता, देशासाठी आत्मसमर्पण करण्यास तयार असतात. त्याचप्रमाणे अनेक सामान्य माणसे आंधळी, अपंग, परिस्थितीने गरीब असतांना  किंवा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावून परिस्थितीवर मात करतात आणि आपली वेगळी ओळख प्रस्थापित करतात.
समस्या आणि अडचणी यांना समोरे जावे लागत असतांना आपल्यातील तेज, सुप्त क्षमता बाहेर येत असतात. माणसाला अडचणी आणि समस्या असणे हे त्याच्या जिवंतपणाचे प्रतिक असते. मेलेल्या माणसाला कोणत्याही समस्या किंवा अडचणी नसतात. जर्मन तत्वज्ञ फ्रेड्रिक नित्षे असे म्हणाला होता की, ‘जीवन का जगावे हे ज्याला कळले तो जीवन कसे जगावे हेदेखीशोधून काढतो.’  डॉ. व्हिक्टर फ्रॅंन्कल या यहुदी मानसोपचारतज्ज्ञाने  दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात  अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीतदेखील जीवनाला अर्थ देता येतो.हा संदेश ‘अर्थपुर्ण जीवनाचा शोया पुस्तकांद्वारे जगाला दिला.
                 ‘जगण्यात मौज आहे’ असे कोणीतरी म्हटलयं. ‘संघर्ष हाच जगण्याचा मुलमंत्र असे ब्रीद घेवून जणू शेकडो बालके फुटपाथवर दिवस-रात्र काढत जगत असतात. कोणी अंध, कोणी अपंग रेल्वेमध्ये मरणयातना सोसतं पण जगण्याच गाणं गातच असतोच की. सभोवतालचे हे जीवन जाणिवेने पाहिले की आत्महत्येची कल्पना मनात येणार नाही.
 कोळसा खाणीत काम करणारे मजुर, रूग्णालयांमध्ये दिवस-रात्र रूग्णसेवा देणारे कर्मचारी, गटारी उपसणारे हात, भट्टीत आयुष्य होरपळुन घेणारे हात पाहिले की, जगण्यात मौज आहे हेच सत्य असल्याचं जाणवत. आम्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यां व कर्मचाऱ्यांना तर नेहमीच भाव-भावना बाजूला ठेवून, सगळ्या कौटूंबीक सुखांना दूर सारीत, रोजचं जीवन जगावं लागतं.  आमच्यासाठी रोज एक नवा दिवस असतो, एक नवे आव्हानं असत, लोकांच्या, समाजाच्या सुख-दुःखांशी समरस व्हायला आम्हाला आवडत. एक जीगर अंतरात असते, एक तळमळ असते. काम, मोहिम फत्ते झाली की पुन्हा रिलॅक्स नव्हे तर रिचार्ज होत असतो.
 आम्ही पोलीस दलाचे शूर सैनिक पण, आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून जगणारा, काम करणारा जवान एकदम असा टोकाचा निर्णय घेतो तेव्हा काहीच सुचेनासे होत. वाटत त्यानं आपल्याजवळ मनं मोकळ केल नाही, त्याच्या सुरक्षेची आम्ही काळजी वाहण्यास कमी होतो काय ? निदान याची जाणीव तरी त्याला होती किंवा नाही ? असे अनेक प्रश्न मनात रूंजी घालतात, सतावतात. मन मोकळे करण्यासाठीच मग अशी भावनांना वाट करून द्यावी लागते.
यामुळे थोडे हलके वाटेलही पण एक युवक, जो देशासाठी काहीतरी करू शकला असता तो कायमचा दूर गेला त्याचे काय?  जेव्हा एखादा तरुण आत्महत्या करतो त्यावेळी तो त्याच्या संपुर्ण कुटूंबाला दुःखाच्या खाईत ढकलुन देतो. ज्या आई-वडिलांनी लहानपणापासुन त्याच्या संपुर्ण जडण-घडणीमध्ये आपले आयुष्य पणाला लावलेले असते, त्यांची कोणतीही जाणीव आणि जबाबदारी न ठेवता आई-वडिलांना आयुष्यभरासाठी दुःखी करून जातात. याचा आत्महत्येस प्रवृत्त होणारी मुले अजिबात विचार करित नाहीत असे लक्षात येते. त्यावरून एकप्रकारे आई-वडिलांच्या प्रति ही कृतघ्नता आहे हे तरूण मुलांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
            नुकत्याच 10 वी 12 वी च्या परिक्षा सुरू असुन त्यांच्या निकालावर आधारित काही मुले/मुली जीवनाची अखेरची परीक्षा समजता. आई-वडील आपल्या अतृप्त इच्छा आणि अतिमहत्वाकां पाल्याचा नैसर्गिक कल न पाहता आपल्या मुलांवर लादतात. त्यामुळे कोवळ्या वयाच्या मुलांवर आई-वडिलांच्या लादलेल्या इच्छांमुळे अनावश्यक ताण येतो आणि त्यामुळे पौगंडावस्थेतील मुले/मुली अविचारास प्रवृत्त होतात. याचा आई-वडिलांनी साकल्याने विचार केला पाहिजे.
खलील जिब्रान म्हणतो, ‘आपल्या मुलांचे आयुष्य म्हणजे आई-वडिलांना दुसऱ्यांदा जगण्याची संधी मिळालेली नसुन मुलांना त्यांचे आयुष्य त्यांच्या आवडी-निवडी, क्षमता, कल यानुसार घडवु देण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांना नैसर्गिकपणे उमलु दिले पाहिजे’ हे भान पालकांनी ठेवले तर समस्येची तीव्रता कमी होऊ शकेल.
 त्याचप्रमाणे अलिकडे टिव्ही, मोबाईल, सोल मिडीया या भासमान साधनांवर कुटूंबातील सर्वच घटक अडकून पडल्यामुळे कौटूंबिक जिव्हाळ्याचा संवाद संपलेला आहे. त्यामुळे पालकांनी किमान दिवसातुन एकदा तरी कुटूंबासोबत जेवण घेण्याची सवय लावुन मुला/मुलींशी, त्यांच्या दिवसभरच्या प्रगतीवियी संवाद साधला पाहिजे. पालकांच्या निरोगी सुसंवादातुन मुला/मुलींची निकोप मानसिक जडण-घडण होते. त्यामुळे मुलांच्या मनावरील ताण-तणावाचा निचरा होतो. त्याचवेळी मुलांना चांगल्या साहित्याच्या वाचनाची सवय लावुन त्यांच्याशी त्यातील जीवन मुल्यांबाबत चर्चा केली पाहिजे. मुलांच्या मनावर निरोगी, निकोप जीवन मुल्यांचे महत्व बिंबवले पाहिजे.
            खुप काही विचारायला शिका, खुप काही बघायला शिका, खुप काही करायला शिका, खुप काही अनुभवायला शिका तर जग तुमचेच आहे. इतरांना सुख अन दुःख आपलं मानायला शिका जग तुमचेच होईल तुम्ही जगाचे व्हाल. जगण्यासाठी, या जगण्यावर, या जन्मावर तदाः काय हजार वेळा प्रेम करण्यासाठी तर आपला जन्म झाला आहे.
             जीवनात एखादया प्रसंगात अपय आले किंवा आपली महत्वकांक्षा आणि स्वप्न पुर्ण करतांना अपेक्षित य मिळाले नाही किंवा एकतर्फी प्रेमभंगातुन अथवा अन्य कोणत्यातरी कारणामुळे कोणी आपल्यास नाकारले याचा अर्थ जीवन संपले असा होत नसुन इतर व्यक्तीमत्वांच्या अस्तित्वाचा आणि अधिकाराचा आदर करी, संपुर्ण जीवनावर प्रेम करित आपण राखेतुन उठुन उभ्या राहिलेल्या फिनीक्स पक्षाप्रमाणे नवीन उमेदीने आणि उभारीने अर्थपुर्ण आयुष्य जगु कतो. हे तरुण वर्गाने कधीही विसरू नये. जीवन कष्टमय असले तरी निरोगी आणि निकोप, सकारात्मक, शावादी दृष्टीकोनातून जीवनाकडे बघितले तर जीवन खरोखर सुंदर असुन आपल्याला प्रत्येकक्षण भरभरून जगतांना जीवनाचा उत्सव साजरा करता आला पाहिजे.

-डॉ.रविंद्र कुमार सिंगल,  पोलीस आयुक्त नाशिक