Wednesday 8 March 2017

बचतगट प्रदर्शनात प्रबोधनपर कार्यक्रम

महिला दिनानिमित्त बचतगट प्रदर्शनात प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन

        नाशिक दि.8:-  जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समुहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या भव्य वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सवात प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम  आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे आणि डॉ.जया एकनाथ डवले यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

महिलांनी कामातील थकवा घालविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग घेतला. महिलांसाठी चमचा लिंबू, संगीत खुर्ची, पथनाट्य आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेत महिलांनी महिला दिनाचा मनमुराद आनंद लुटला. पारंपरिक भाषेतील गीतेदेखील  महिलांनी सादर केली.

जळगाव जिल्ह्यातील बचतगटाच्या महिलांनी  ‘बेटी  बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘स्त्री भ्रृणहत्या’ या विषयावर पथनाट्य सादर केले. यावेळी महिलांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी, तसेच मार्केटींगचे तंत्र अवगत करून घेण्यासाठी प्रदर्शनाचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन श्रीमती चुंबळे यांनी  व्यक्त केले. डॉ.डवले यांनी महिलांनी परस्परांचा सन्मान राखला तर एकमेकांच्या सहकार्याने उन्नती साधता येईल, असे मत व्यक्त केले.

प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत 70 लाखापेक्षा अधिकची विक्री प्रदर्शनात झाली आहे. घरगुती उत्पादनांना विशेष मागणी आहे, असे सहाय्यक प्रकल्प संचालक संजय माळी यांनी सांगितले.

----

No comments:

Post a Comment