Monday 20 March 2017

जलजागृती सप्ताह

                               जलबचतीबाबत विविध स्तरावर मंथन होणे गरजेचे
श्रीमंत माने

नाशिक, दि. 20 :-  पाण्याची उपलब्धता हे येत्या काळातील मोठे आव्हान असून  पाणी बचतीवर सर्वांनी मंथन करणे  आणि विषयाचे पैलू समजावून घेणे गरजेचे  आहे, असे प्रतिपादन दै.सकाळचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी केले.
जलजागृती सप्ताहानिमित्त  जलसंपदा विभागातर्फे आयोजित  कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, अधिक्षक अभियंता राजेश मोरे उपस्थित होते.
श्री.माने म्हणाले, पाण्याच्या अमर्याद नासाडीला प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. कालव्याने येणाऱ्या पाण्याचा उपयोग ठिबक सिंचनाद्वारे होणे आवश्यक आहे. इस्राईलसारख्या देशात सरासरी 400 ते 450 मिमी पर्जन्यमान असताना सिंचनाच्या आधुनिक पद्धती आणि पुनर्वापराच्या सहाय्याने  या देशाने कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आपल्याकडे तुलनेने पर्जन्यमान अधिक असतानादेखील गेल्यावर्षी टंचाईचा अनुभव नाशिकच्या अनेक गावांनी घेतला. पाण्याची मुबलक उपलब्धता कायम राहणार नाही हे ओळखून त्याचे उत्तम व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
जागतिक पाणी अहवालात येत्या काही वर्षात वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करताना समस्या निर्माण होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाण्याचा अमर्याद वापर चिंताजनक आहे. जगातील आरोग्य, बेरोजगारी, औद्योगिकरण यापेक्षादेखील वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा हे मोठे आव्हान आहे. जगातील दहा टक्के जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. पाण्याचे महत्व जाणलेले देश समृद्ध झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणालेवाढत्या नागरिकरणामुळे जलप्रदुषणासारख्या नव्या समस्या निर्माण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापनासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि जलव्यवस्थापनाशी संबंधीत विविध घटकांनी  एकत्र येणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात सुक्ष्म सिंचनाचे महत्व पटवून देणे आणि शहरी भागातील पाण्याचे प्रदूषण तसेच नासाडी थांबविणे अशा दोन पातळ्यावर जागृती होणे आवश्यक आहे. पाण्याबाबत चर्चा घडवून आणताना जलबचतीसाठी चांगली वातावरणनिर्मिती करणे शक्य आहे, असे श्री. माने यांनी सांगितले.


श्री.वाघमारे म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी न वापरता मी पीकासाठी पाणी वापरेल असे धोरण ठेवून उत्तम जलव्यवस्थापन केल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत शक्य आहेऔद्योगिक, शेती व दैनंदिन पाण्याच्या वापरामध्ये  सर्वांनीच बचत करणे गरजेचे आहे. पाणी बचत करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे.
अधिक्षक अभियंता मोरे  यांनी जलजागृती सप्ताहानिमित्त   आयोजित विविध उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.  
----


No comments:

Post a Comment