Saturday 4 March 2017

महिलांना आर्थिक प्रगती संधी

विभागीय प्रदर्शनाच्या माध्यमातून
बचतगट महिलांना आर्थिक प्रगती संधी


नाशिक, दि.4: बँकामध्ये स्वत:ची आर्थिक पत निर्माण करतानाच रोखरहीत व्यवहारासारख्या आधुनिकतेचा अंगिकार करणाऱ्या बचतगटांमध्ये आता महाविद्यालयीन मुली देखील सहभाग घेऊ लागल्या आहेत. दैनंदिन वापरामधील पदार्थ आणि वस्तूंना विक्रीसाठी ठेवताना गुणात्मक दर्जा आणि कलाकुसरीद्वारे हे  प्रदर्शनात सहभागी बचतगट ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. विभागीय प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक प्रगतीची संधी उपलब्ध झाली आहे.

 राज्य ग्रमीण जीवनोन्नती अभियानांतर्गत डोंगरे वसतीगृह मैदान येथे 10 मार्चपर्यंत विभागीय बचतगट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी आलेल्या बचतगटांमधील महिला सदस्यांमध्ये दिसणारा आत्मविश्वास त्यांचा आर्थिक प्रगतीचा आलेख दर्शवणारा होता. उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या महिलांनी बनवून विक्रीसाठी आणलेल्या वस्तू महत्वपूर्ण होत्या. प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्यांना दैनंदिन वस्तू, विविध पदार्थ, कपड्यांनी पहिल्याच दिवशी भूरळ घातली.

उत्तर महाराष्ट्रातल्या विभागाच्या पाचही जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या महिलांनी विक्रीसाठी अनेक वस्तू ठेवल्या आहेत. पाच मोठ्या मंडपात  विभागलेल्या या प्रदर्शनात 250 स्टॉल्सची जिल्हानिहाय उभारणी  करण्यात आली आहे. लोणचे, पापड, ढोकळा, डोसा आदी पीठं, हातसडीचे तांदूळ, मूग, मटकीसारखे कडधान्यच नव्हे तर कपडे, पर्स, चपला आदी साहित्य देखील इथे विक्रीला आहे. स्वयंपाकासाठी लागणऱ्या लाकडी वस्तू, दैनंदिन विविध पदार्थ, कपडे आदी खरेदी करण्याची संधीदेखील नागरिकांना आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी शासकीय विभागाच्या स्टॉल्सद्वारे विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.


सेंद्रीय गुळामुळे बचतगटाला मोठे आर्थिक उत्पन्न मिळत असल्याचे  लखमापूर दिंडोरी येथील अन्नपूर्णा महिला बचतगटाच्या सीमा किरण देशमुख यांनी सांगीतले. एका एका प्रदर्शनात 10 ते 15 क्विंटल गुळ देखील विकला जातोदुधाची साय, एरंड तेल यांचा गुळ बनवण्यासाठी वापर केला जातो पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे  या प्रक्रियेमध्ये कोणत्याही केमिकलचा वापर  होत नसल्याने लोक मोठ्या आवडीने हा गुळ घेतात असे त्या मोठ्या अभिमानाने सांगत होत्या. अकरा सदस्य असलेल्या या गटाच्या मंदाबाई वडजे अध्यक्ष आहेत 10 वर्षांपेक्षा जुना बचतगट असून आम्ही यापूर्वी घेतलेले 3 लाख रुपये कर्ज वेळेत फेड केले आहे. बँक आणखी 6 लाख रुपये कर्ज द्यायला तयार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. स्वत:च्या हिमतीवर गटाने निर्माण केलेली ही आर्थिक पत यशाची मोठी पावती आहे.

   खरेदीदारांसाठीपॉसमशीन सुविधा, पेटीएमचा वापर करणाऱ्या अडीच ते तीन लाख रुपये आर्थिक असलेल्या उत्पन्न सप्तश्रुंगी महिला बचतगटाची 20 वर्ष वयाची कुमारी दिपाली अध्यक्ष आहे. बेळगाव ढगा या गावातील महिला मुंबई, नागपूर, पुणे, नंदूरबार , अहमदनगर अशा ठिकाणच्या सरस , महालक्ष्मी  अशा मोठ्या प्रदर्शनांमध्ये भाग घेतात. येथे मसाले, चटणी, हळद, नागली पापड यांची मोठी विक्री झाली आहे. दिपालीच्या आई शोभा सोनवणे यांनी बचतगटाच्या प्रयत्नांमध्ये अशिक्षीत असल्याचा अडथळा येऊ नये यासाठी 12 वीत शिकणाऱ्या दिपालीच्या हातात बचतगटाची सुत्रे सोपवली आहेत. आपल्या बरोबरच गावातल्या अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या बचतगटाची वाटचाल प्रेरणादायी आहे. चटण्यांचे विविध प्रकार बनवताना त्यांनी पापड, कुरडई असे पदार्थ ठेवले आहेत. तर खुरसणी, शेंगादाणे, लसून, खोबरे अशा अनेक प्रकारच्या चटण्या घेतात.

सूनगाव ता. जळगांव( जामोद ) बुलढाणा येथील महिला बचतगटांनी येथे लावलेल्या स्टॉल्स मध्ये मुसली  पावडर, मुसली, हळदीचे कंद विक्रीस ठेवलेले दिसले. या गावातील भिमाई महिला बचतगटाच्या उज्ज्वला बाळू हिवराळे यांनी सांगीतले की 4 ते 5 वर्षांपासून मुसली पावडरची विक्री चालू केली आहे. विविध प्रदर्शनांमध्ये यासाठी चांगली विक्री होत असल्याने आम्ही प्रामुख्याने हे ठेवतोच. याचे उत्पादनदेखील गावातील शेतामध्ये होत असल्याने गावातील अनेकांना याचा फायदा होतो आहे. याच्या लागवडीचे क्षेत्र वाढते आहे. या आधी शेतामध्ये कामासाठी 50 ते 60 रुपये दररोज मिळायचे पण आता प्रदर्शनांमधून होणाऱ्या विक्रीने उत्पन्न वाढले आहे. मुसली पावडर चे 100 ग्रॅमचे पॅकींग 150 रुपयांना विकले जाते. प्रदर्शनासाठी दिल्ली, मुंबई, पंजाब, जम्मू काश्मीर पर्यंत गेल्याचे त्यांनी अभिमानाने सांगीतले.   याच गावातील सावित्रीबाई फूले बचतगटाच्या कल्पना दामोदर यांनी देखील प्रदर्शनात मुसली पावडर विक्रीचा स्टॉल असल्याचे दिसून आले. याबरोबरच आवळा पावडर, मुगवडे आदी इतर पदार्थ या दोन्ही स्टॉलवर दिसून आले.

0000

No comments:

Post a Comment