Saturday 25 March 2017

अर्थसंकल्प राज्याचा

अर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न
                                                                        


नाशिक, दि.25- राज्याच्या अर्थसंकल्पाद्वारे कृषीक्षेत्राच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करताना पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे रोजगार निर्मितीवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय आणि महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थसंकल्प राज्याचा…संकल्प विकासाचा’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, उपप्राचार्य डॉ.डी.व्ही.ठाकोर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.पी.देवरे, प्रा.व्ही.एस.मिस्त्री, माहिती सहायक मोहिनी राणे आदी उपस्थित होते.
डॉ.निकम म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पातून विविध भागातील विकासाचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. मानव विकास निर्देशांकात प्रगती करण्यासाठी अशी विकास प्रक्रीया महत्वाची आहे. अर्थसंकल्प या प्रक्रीयेतील महत्वाचा आणि आधारभूत घटक आहे. राज्याच्या विकासाचे प्रतिबींब अर्थसंकल्पात पहायला मिळते. विविध स्वरुपात शासनाकडे एकत्र होणाऱ्या निधीचा लाभ सामान्य जनतेला व्हावा, असे प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात येतात.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. कृषी क्षेत्र सक्षम करण्यासाठी सिंचनावर विशेष भर देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठीदेखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि कोल्ड व्हॅन, संत शिरोमणी आठवडे बाजाराची व्याप्ती वाढविणे आदी अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
कौशल्य विकास आणि रोजगार क्षेत्रासाठी अनेक तरतूदींचा समावेश अर्थसंकल्पात आहे. याशिवाय रस्ते विकास, रेल्वे प्रकल्पांना गती देणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान तसेच सामाजिक क्षेत्रातील योजनांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदींची त्यांनी माहिती दिली.
डॉ.मोघे यांनी अर्थसंकल्पाच्या विवीध पैलूंची माहिती दिली. अल्पसंख्याक बहुल नागरी आणि ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविध उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी जबाबदार नागरिक म्हणून अर्थसंकल्पाच्या विविध पैलूंचा आणि शासकीय योजनांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगून शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

*************

No comments:

Post a Comment