Sunday 5 March 2017

महिला मतदार नोंदणी

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मतदार नोंदणी कार्यक्रम
नाशिक दि.5-आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम राबवून अधिकाधिक  महिलांना लोकशाही प्रक्रीयेत सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
          मतदार नोंदणी अद्याप न केलेल्या महिलांनी जवळच्या तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय अथवा विधानसभा मतदारसंघ कार्यालयात जावून नवीन मतदार नोंदणीचा अर्ज क्र.6 भरून सादर करावा. अर्जासोबत अलिकडच्या काळातील दोन छायाचित्र, आधार कार्डाची छायांकीत प्रत, विद्युत देयक अथवा दूरध्वनी देयकाची छायांकीत प्रत  आणि अठरा वर्ष पुर्ण झाल्याबाबत पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माच्या दाखल्याची छायांकीत प्रत जोडावी.
          विवाह झालेल्या महिलांनी मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी विवाह प्रमाणपत्राची छायांकीत प्रत नमुना क्र.7 सोबत सादर करावी. विवाह झाल्याने महिला मतदाराचे यादीतील नाव बदलण्यासाठी विवाह प्रमाणपत्राची छायांकीत प्रत नमुना क्र.8 सोबत सादर करावी. विवाह झाल्याने मतदारसंघांतर्गत पत्ता बदलण्यासाठी विवाह प्रमाणपत्र आणि नवीन पत्त्याच्या रहिवास पुराव्याची छायांकीत प्रत नमुना क्र.8 अ सोबत सादर करावी.
          सदर विशेष नोंदणी कार्यक्रम 10 मार्च 2017 पर्यंत सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत राबविण्यात येईल. महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी केले आहे.

-----

No comments:

Post a Comment