Friday 3 March 2017

डिजीधन मेळा उद्घाटन

रोखरहीत व्यवहारांना गती देण्यासाठी डिजीधन मेळा उपयुक्त-डॉ.सुभाष भामरे


        नाशिक दि.3:आर्थिक क्षेत्रात संगणकीय प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने व्यवहाराचा वेग वाढला आहे आणि विशेषत: या प्रक्रीयेत पारदर्शकता येत आहे. डिजीटल व्यवहाराने केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे तर सामान्य माणसाच्या जीवनातही क्रांती आणली आहे. अशा व्यवहारांना गती देण्यासाठी डिजीधन मेळा उपयुक् आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.

          ठक्कर डोम येथे जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित डिजीधन मेळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नीती आयोगाचे सहसचिव विक्रम गौर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमचे उपाध्यक्ष राजेंद्र भालेराव, सौरभ तोमर आदी उपस्थित होते.

          श्री.भामरे म्हणाले, प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. कॅशलेस व्यवहार हे त्यापुढचे महत्वाचे पाऊल आहे. देशाच्या विकासासाठी अशा बदलांचा  स्विकार समाजाकडून होणे आवश्यक असून त्यादिशेने जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी डिजीधन  मेळावा उत्तम संधी  आहे.
ग्राहक आणि व्यायसायिकांना डिजीटल व्यवहाराकडे वळविण्यासाठी शासनाने डिजीटल पेमेंटच्या विविध पद्धतींचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसात जनधन खाते उघडणे, आधार कार्ड अनिवार्य करणे, लाभार्थ्याच्या बँक  खात्यात थेट रक्कम जमा करण्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. देशातील 100 शहरात आयोजित होणाऱ्या मेळ्याद्वारे रोखरहित व्यवहाराला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून त्याचा लाभ सामान्य जनतेच्या विकासासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डिजीटल व्यवहार आता खुप सोपे झाले असून  डेबीट, क्रेडीट, किंवा इतर कार्ड, युएसएसडी, आधार कार्ड, युपीआय, मोबाईल वॅलेट, बँकेचे प्रीपेड कार्ड, पीओएस मशीन, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, रुपे कार्ड असे अनेक पर्याय यासाठी उपलब्ध आहेत. भिम ॲपचे डाऊनलोड 17 लाखावर झाले आहे. डिजीटल अर्थव्यवस्थेकडे वळण्यासाठी ही बाब देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी उपयुक्त आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.


          श्री.अहिर  म्हणाले, प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहे. देशात 95 टक्के जनता रोखीने व्यवहार करणारी असून आयकर भरणाऱ्यांची संख्या कमी आहे. रोखरहीत व्यवहारामुळे करदात्यांची संख्या वाढून त्याचा लाभ जनकल्याणाच्या योजना राबविण्यासाठी होईल. डिजीटल व्यवहार हे सामान्यजनांच्या विकासासाठी उचललेले महत्वाचे पाऊल आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नाशिक जिल्ह्यातील चापडगाव त्यांचे उत्तम उदाहरण आहे. डिजीधन मेळ्याच्या माध्यमातून अशा व्यवहारांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          प्रास्ताविकात जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी मेळ्यात लकी ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजनेच्या सोडतीद्वारे अनेकांना पुरस्कार मिळविण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात डिजीटल व्यवहरांना चालना देण्यात येत असून विविध बँकांच्या 400 पेक्षा जास्त शाखांनी प्रत्येकी एक गाव रोखरहीत व्यवहारासाठी दत्तक घेतले आहे. मेळ्यात विविध 80 कक्षांच्या माध्यमातून डिजीटल व्यवहारांबाबत जनजागृती करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

          यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोडतीद्वारे लकी ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजनेतील भाग्यवंतांची नावे काढण्यात आली. एकूण 14 कोटी व्यवहारांमधून 30 हजार व्यवहारांची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली. आज ग्राहक आणि व्यावसायिकांच्या खात्यावर जमा करण्यात येणाऱ्या एकूण पुरस्काराची रक्कम 9.8 कोटी आहे.

त्यापैकी 15 हजार ग्राहकांना दैनिक सोडतीत एक हजाराचे पारितोषिक तर ग्राहकांसाठी साप्ताहीक सोडतीत 3.8 कोटींची पारितोषिके वितरीत करण्यात आली. व्यावसायिकांमधून 50 हजाराची एकूण 500, पाच हजाराची दीड हजार आणि अडिच हजाराची एकूण पाच हजार भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते मेळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या घोषवाक्य, चित्रकला आणि निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना परितोषिके वितरीत करण्यात आलीकार्यक्रमात ऑलिम्पीक खेळाडू कविता राऊत हीने डिजीटल व्यवहाराद्वारे द्राक्षे खरेदी केली. मान्यवरांच हस्ते जिल्ह्यातील पहिले कॅशलेस गाव चापडगावचा सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी सकाळी कविता राऊत आणि विभागीय आयुक्त डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळ्याचा शुभारंभ झाला. सकाळपासून शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक आणि युवकांनी माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती.
***********

No comments:

Post a Comment