Tuesday 14 March 2017

जलजागृती सप्ताह

जलजागृती सप्ताहाचे 16 मार्चपासून आयोजन


          नाशिक, दि.14 – जागतिक जलदिनाचे  औचित्य साधून पाण्याच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी प्रशासनातर्फे 16 ते 22 मार्च 2017 या कालावधीत  जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत सप्ताहाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन यावेळी म्हणाले, जागतिक हवामान बदलाचा परिणाम पावसाच्या वेळापत्रकावर आणि प्रमाणावरही पडला आहे. त्यामुळे जलसाक्षरतेवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. पावसाचे प्रमाण चांगले असतानाही पाण्याचा काटकसरीने वापर न केल्याने उन्हाळ्यात समस्या निर्माण होतात. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच पाण्याच्या पुर्नवापरासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन त्यांनी केले. जलजागृती सप्ताहात अधिकाधीक नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन 16 मार्च रोजी जिल्हा नियोजन सभागृह येथे होणार असून समारोप 22 मार्च रोजी कालीदास सभागृह येथे होणार आहे. 19 मार्च रोजी ‘वॉटर रन’ चे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना पाणी नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे गावपातळीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फेदेखील विविध उपक्रम राबविण्यात येणार असून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाला नागरिकांना भेट देता येणार आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जुन्या छायाचित्रांचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात येणार आहे. शालेय पातळीवर जलजागृती विषयावरील विविध स्पर्धांचे आयोजनदेखील करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी श्री.मोरे यांनी दिली.
00000



No comments:

Post a Comment