Wednesday 1 March 2017

बचतगट वस्तुंचे विभागीय प्रदर्शन

 बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंचे नाशिक येथे भव्य विभागीय प्रदर्शन



नाशिक, दि. 1 :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे 4 ते 10 मार्च 2017 या कालावधीत विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समुहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या भव्य वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यास पंचवीस हजार महिला उपस्थित राहणार आहेत.
          प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी आज घेतला. त्याच्यासमवेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे,  प्रकल्प संचालक संदिप माळोदे, उपआयुक्त मित्रगोत्री, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे आदी होते.
          प्रदर्शनासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य मंडपाची श्री.डवले यांनी पाहणी केली. प्रदर्शनाचेवेळी सुरक्षा उपायांवर विशेष लक्ष देण्यात यावे आणि पार्कींगसाठी तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी ,अशा सूचना त्यांनी दिल्या.
          विभागीय प्रदर्शनात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 250 दारिद्र्य रेषेखालील स्वयंसहाय्यता बचतगटांनी उत्पादित केलेले पारंपरिक खाद्यपदार्थ, गारमेंट, कलाकुसरीच्या वस्तु, बांबू आणि पेपरपासून निर्मिती वस्तु, डाळी, तांदूळ, गहू, नाचणीपासून तयार केलेले पदार्थ, इमिटेशन ज्वेलरी, हर्बल उत्पादने, वनौषधी आदी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे 25 कक्ष असणार आहेत. बचतगटांना विविध व्यवसायांची माहिती एलसीडी प्रोजेक्टरद्वारे देण्यात येणार आहे.
          प्रदर्शनात अस्सल ग्रामीण खाद्यासंस्कृतीचा आनंद घेता येणार आहे. खानदेशी मांडे, वांगे भरीत, कळण्याची भाकरी, ठेचा ज्वारी भाकरी, तांदुळाची भाकरी, भज्याची आमटी, वडे रस्सी, मटन, चिकन भाजी, बिर्याणी, सुके मासे, कुरडई, पापड, कुळथाची जिलेबी, गव्हाची लापसी अशा पदार्थांची चव खवय्यांना चाखता येणार आहे.
          प्रदर्शन विनामुल्यअसून विविध वस्तू खरेदी करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी आणि बचतगटातील महिलांना प्रोत्साहन द्यावे,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

--*---

No comments:

Post a Comment