Saturday 4 March 2017

बचतगटांच्या वस्तुंचे प्रदर्शन

-पोर्टलच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांना
 ऑनलाईन विक्रीची सुविधा-ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे


        नाशिक दि.4:-पोर्टलच्या माध्यमातून महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच बचतगटांसाठी विभागीय आणि फिरत्या विक्रीकेंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी दिली.

           महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित  विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समुहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या भव्य वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सव तसेच विभागीय महिला मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे,जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे आदी उपस्थित होते.

          श्रीमती मुंडे म्हणाल्या,  प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री होते आणि त्याचा फायदा बचतगटातील सदस्यांना होतो. बचतगटांद्वारे अनेक चांगली उत्पादने केली जातात. अशा उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ऑनलाईन विक्री प्रक्रीया आपले सरकारवेब पोर्टलला जोडून बचतगटाच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महिला संकटाच्यावेळी कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. तीला सक्षम केल्यास समाजाचा विकास वेगाने होतो. म्हणूनच शासनाने बचतगट चळवळीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमीका आहे. सुमतीबाई सुकळीकर यांच्या नावाने शुन्य टक्के व्याजदराने बचतगटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्पादनाचे चांगले मार्केटींग आणि पॅकेजींग केले तर बचतगटाच्या माध्यमातून महिलांना अधिक लाभ मिळविता येईल, असे त्यांनी सांगितले.

शासनाने दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य अभियानाच्या माध्यमातून 58 हजार युवकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देत ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न आहे.’अस्मिताउपक्रमाचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्यात  आला आहे. त्याद्वारे बचतगटांना सॅनीटरी नॅपकीन व्यवसायासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सवलतीच्या दरात सॅनीटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाद्वारे अनेक महिलांनी प्रेरणा घेऊन आर्थिक प्रगती साधली आहे. महिलांनी न्यूनगंड बाजूला सारून कुटुंबाला  आधार देण्यासाठी आत्मविश्वासाने व्यवसायासाठी पुढे यावे, शासनातर्फे सर्व सहकार्य महिलांना करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
येत्या तीन वर्षात प्रत्येक गावात एका कुटुंबात किमान एक महिला बचतगटाशी जोडली जाईल असे प्रयत्न ग्रामविकास विभागातर्फे करण्यात येतील, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

श्री.भुसे म्हणाले, बचतगट प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचतात. प्रदर्शनानंतर उत्पादन विक्रीसाठी अडचण येत असल्याने बचतगटांना कायमस्वरुपी गाळे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच बचतगटांना व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.डवले यांनी नाशिक विभागात वीस हजारापेक्षा जास्त बचतगट असल्याचे सांगितले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सक्षमीकरणासाठी बचतगट चळवळीला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न विभागात अनेक स्तरावर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रदर्शनाद्वारे बचतगटाच्या महिलांना आर्थिक लाभ होत असल्याने नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या लता बुंगे, शांता जगताप, जयश्री माळी, नुतन सुर्यवंशी, उज्वला पवार, पुनम जगताप यांचा ग्रामविकासमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच  स्तनदा माता सिंधुकला बेंडकुळे यांना मानव विकास कार्यक्रमांतर्गत बुडालेल्या मजुरी लाभाचा धनादेश आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत वैष्णवी घुंबरे यांना आर्थिक लाभाचा धनादेश देण्यात आला.

चांगली कामगिरी करणाऱ्या बचतगटांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात संतोषी माता बचतगट गोलदरी ता.त्र्यंबकेश्वर, संतोषी माता बचतगट बोर्डींगपाडा ता.पेठजय तुळजा भवानी महिला बचत गट गंगाव्हरे सावरगाव ता.नाशिक आणि संजीवनी महिला बचत गट खडकेत ता.इगतपुरी आदींचा गौरव करण्यात आला. देना बँक देवळा शाखेतर्फे एकाच दिवशी 24 महिला बचतगटांना 1.5 लक्ष याप्रमाणे 34 लक्ष पतपुरवठा करण्यात आला. त्याचे  पिंपळगाव येथील एकलव्य बचतगटाला कर्ज मंजूरी आदेशाचे  प्रातिनिधीक वितरण करण्यात आले.

तत्पूर्वी ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्या हस्ते बचतगट प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी प्रदर्शनातील विविध कक्षांना भेट देऊन माहिती घेतली. प्रदर्शनात 250 स्टॉल्स असून 500 महिलांचा सहभाग आहे. आलीयाबाग ता.बागलण येथील चमूच्या आदिवासी नृत्याचा अप्रतिम अविष्कार  उपस्थितांना कार्यक्रमात पहायला मिळाला.



***********

No comments:

Post a Comment