Thursday 16 March 2017

जलजागृती सप्ताह उद्घाटन

पाण्याचा काटकसरीने आणि पुर्नवापर करणे गरजेचे - सी.ए.बिराजदार


          नाशिक दि. 16- राज्यातील विविध भागात पावसाचे असंतुलित प्रमाण आणि मर्यादीत कालावधीतील पावसाळा लक्षात घेता वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर आणि पुर्नवापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘मेरी’चे महासंचालक सी.एम. बिराजदार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित जलजागृती सप्ताह उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर,  मुख्य अभियंता आर.एम. उपासनी,  ईश्वर चौधरी , अधीक्षक अभियंता च.ना.माळी, राजेश मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एन. जगताप आदी उपस्थित होते.
                    श्री. बिराजदार म्हणाले, पाण्याच्या अतिवापरामुळे पाण्याची उपलब्धता असूनही पाणीटंचाईला सामारे जावे लागते. दरवर्षी पडणाऱ्या पावसाचे साधारण सरासरी प्रमाण सारखेच असून वाढत्या लोकसंख्येच्या गरजेमुळे पाण्याची कमतरता भासते. अशावेळी भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत वाढविणे आणि पाण्याच्या वापरावर मर्यादा घालणे गरजेचे आहे. विशेषत: शेती क्षेत्रात सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केल्यास वाढत्या लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज भागू शकेल. मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी पाणी महत्वाचा घटक असल्याने जलजागृती सप्ताहाच्यानिमित्ताने त्याचे महत्व घरोघरी पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले.
वाघाड प्रकल्पावरील पाणी वापर संस्थेने उत्तम काम केल्याने सिंचन क्षेत्रात तिप्पट वाढ झाली आहे. अशा चांगल्या प्रयोगांचे अनुकरण इतर प्रकल्पक्षेत्रात व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री.बगाटे म्हणाले,  भूपृष्टावरील केवळ 2 टक्के पाणी पिण्यायोग्य असून त्यातील बहुतांशी भागाचा पाणी व्यवस्थापनाअभावी उपयोग केला जात नाही. पाण्याचा काटकसरीने उपयोग करण्याबरोबरच पाण्याचे स्त्रोत प्रदुषीत होऊ न देणे आणि पाण्याची सर्व प्रकारची नासाडी टाळणे महत्वाचे आहे. शहरीकरणामुळे पाण्याचा उपयोगदेखील वाढला आहे. प्रत्येकाने पाणी बचतीचे महत्व लक्षात घेतल्यास भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येकाने जलदूत बनून जलजागृतीचे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पाण्याचे प्रदूषण मानवी जीवनाला घातक असल्याने ते टाळणे गरजेचे आहे. पूर, टंचाई याबाबत आपत्ती व्यवस्थापन आराखडा गावपातळीवर तयार असणेदेखील तेवढेच महत्वाचे असल्याचे श्री.चौधरी यांनी सांगितले.
श्री.उपासनी यांनी भारतीय संस्कृतीत पाण्याला असलेले महत्व सांगून सप्ताहाच्या निमित्ताने हे महत्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न जलसंपदा आणि कृषी विभागाने करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात श्री.मोरे  यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कायद्यान्वये ठिबक सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले. गतवर्षापासून पाण्याचे महत्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनातर्फे जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
श्री.जगताप यांनी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचे मोठे काम जिल्ह्यात झाल्याचे सांगितले. त्यातील लोकसहभाग महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी जिल्ह्यातील गोदावरी, मोसम, गिरणा, पुनद, उनंदा, कादवा, बाणगंगा, दारणा, वैतरणा, काश्यपी, दारणा, कडवा अशा 11 नद्यांच्या कलशातील जलाचे पुजन करण्यात आले आणि जलबचतीची प्रतिज्ञा घेण्यात आली.
जलजागृती सप्ताहानिमित्त 22 मार्च पर्यंत जलसंपदा विभागातर्फे विविध प्रकल्पक्षेत्रात 200 पेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन आणि जलबचतीविषयी माहिती देण्यात येणार आहे.

-----

No comments:

Post a Comment