Monday 20 March 2017

स्वाईन फ्लु आढावा बैठक

स्वाईन फ्लुबाबत जनजागृतीवर भर द्या-गिरीष महाजन


नाशिक, दि.20: स्वाईन फ्लुच्या उपचारासाठी  सर्व शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधसाठा ठेवण्यात यावा. तसेच या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असल्याने नागरिकांना याबाबत माहिती देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
          शासकीय विश्रामगृह येथे स्वाईन फ्लुचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, अपुर्व हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमहापौर प्रथमेश गिते आदी उपस्थित होते.
           

श्री.महाजन यांनी  स्वाईन फ्लु रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची आणि शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षांची माहिती घेतली. स्वाईन फ्लु आजारावर प्राथमिक लक्षणे दिसताच उपचार करणे गरजेचे असल्याने याबाबत खाजगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना रुग्णांची माहिती देण्याबाबत आवाहन करण्यात यावे. आठवडा बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी आणि औषधोपचार सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी स्वाईन फ्लु नियंत्रणासाठी प्रशासनामतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच रुग्णालय तपासणी धडक मोहिमेबाबत माहिती दिली.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एस.पी.जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाकचौरे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी स्वाईन फ्लु रुग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांची माहिती दिली.
जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत 21 रुग्णांना स्वाईन फ्लुची लागण झाली असून त्यातील 4 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात 4 संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इतर रुग्णांना उचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.
ताप, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी,  तीव्र घसादुखी, आदी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत जवळील रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
---



No comments:

Post a Comment