Monday 30 April 2018

महाराष्ट्र दिन


महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक,1: महाराष्ट्र राज्याच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त  पोलीस संचलन मैदान येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे,  पोलीस अधिक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री महाजन यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शानदार संचलनाने राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. संचलनाचे नेतृत्व  सहायक पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांनी केले. संचलनात महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी, पोलीस आुयक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, गृहरक्षक दल, वन विभाग, अग्निशमन दल, शहर वाहतूक शाखेच्या पथकांनी सहभाग घेतला.

जलद प्रतिसाद पथक, पर्यटन पोलीस, दंगा नियंत्रण पथक, वज्र, वरुण, वन्य प्राणी बचाव पथक, आपत्ती व्यवस्थापनाचे देवदूत, 108 रुग्णवाहिका आदी वाहनांचाही संचलनात सहभाग होता. चित्ररथांच्या माध्यमातून मतदार नोंदणी आणि रस्ता सुरक्षेचा संदेश यावेळी देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नाशिक उपविभागातील तलाठी व्ही.एस.काळे यांना उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने गौरविण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीर सन्मान योजनेअंतर्गत वीरपत्नी कमल वसंत लहाने, कांचन सुरेंद्र नवगिरे, रेखा एकनाथ खैरनार आणि सुरेखा सुरेश सोनवणे यांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर,  निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, विभाग नियंत्रक नितीन मैंद, विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिया, तहसीलदार सी.एस. देशमुख आदी उपस्थित होते.
0000


Sunday 29 April 2018

ॲडवेंचर अवेअरनेस प्रोग्राम


साहसी उपक्रमातील सुरक्षिततेबाबत शिबीराचे आयोजन
           

          नाशिक दि.29- जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सवंगडी संस्था आणि कर्मवीर शांताराम कोंडाजी वावरे महाविद्यालय सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने ॲडवेंचर ट्रेनिंग इन्स्टिट्युट अंजनेरी येथे पहिल्याॲडवेंचर अवेअरनेस प्रोग्रामचे (साहसी उपक्रमातील सुरक्षितता व सावधगिरी) आयोजन करण्यात आले.

          सकाळी 6.30 वाजता प्रशिक्षणाला सुरवात करण्यात आली. एकूण 90 प्रशिक्षणार्थी या उपक्रमात सहभागी झाले. उत्तर काशी येथील नेहरु इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनिअरींग संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या सुजीत पंडीत यांनी रॅपलींग, ट्रेकींग, हायकींग करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. गंभीर परिस्थितीत सुरक्षितता व सावधगिरी कशी बाळगावी याबाबत त्यांनी माहिती दिली.

          डॉ.मिनाक्षी गवळी यांनी प्राणायम आणि योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले. यावेळी जिल्हा क्रीडाअधिकारी रविंद्र नाईक, सुनिल आहेर, क्रीडा शिक्षक/संघटक संजय पाटील, अरविंद चौधरी, रेखा परदेशी , डॉ. सचिन पाटील, सिमाली नाईकआदी उपस्थीत होते.

          जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे अंजनेरीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या संस्थेत अशा स्वरुपाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून इच्छुक संस्थांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी नाईक यांनी केले आहे.
           
---

Tuesday 24 April 2018

विधान परिषद निवडणूक


निवडणुक प्रक्रीयेसाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष- राधाकृष्णन बी.

नाशिक,24: जिल्ह्यात विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक प्रक्रीयेसाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात यावी. या कक्षात स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समोवश असावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या  बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधिक्षक संजय दराडे, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, शशीकांत मंगरुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात यावे.  नियमित विकासकामे करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. निवडणूक प्रक्रीयेत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसमवेत कोणत्याही बैठकीत सहभागी होऊ नये. महत्वाच्या बैठकीबाबत पूर्वपरवानगी घेण्यात यावी. निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत धोरणात्मक निर्णय जाहीर करू नये.
मतदानाच्या दिवसापर्यंत विशेष गस्ती पथकाद्वारे वाहन तपासणी करण्यात यावी. मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जाणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत माहिती देण्यात यावी. तालुका स्तरावरील शासकीय विश्रामगृहात नोंदणी असलेल्या व्यक्तिव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये,असे निर्देश त्यांनी दिले. मतदान प्रक्रीया मतपत्रिकेद्वारे आणि पसंतीक्रमानुसार होणार आहे, अशी माहिती त्यांनी  दिली.
श्री.दराडे यांनी जिल्ह्यात येणाऱ्या विविध मार्गावर गस्ती पथकांच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याच्या सुचना दिल्या. वाहनातून रोख रक्कम अथवा मद्याची वाहतूक होणार नाही याविषयी दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
----

Monday 23 April 2018

रस्ता सुरक्षा अभियान


रस्ता सुरक्षेबाबत जागृतीसाठी लोकसहभाग आवश्यक-राधाकृष्णन बी.

नाशिक, 23 : रस्ता सुरक्षेच्या नियमांबाबत जनजागृती घडवून अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान ही लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान’ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलिस अधिक्षक संजय दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपअधिक्षक विशाल गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त अजय देवरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे, शिक्षण विभागाचे  उपसंचालक एस.एस.गोविंद आदी उपस्थित होते.


श्री. राधाकृष्णन म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियान पंधरवडापुरते मर्यादीत न ठेवता त्यामध्ये सातत्य ठेवुन जनजागृतीसाठी नवनवीन उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यासोबतच नागरिकांनीदेखील आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. सुरक्षा विषयक नियमांचे पालन प्रत्येक घटकाद्वारे झाल्यास वाहतुक सुरक्षेसाठी मोठी मदत होईल. नाशिकच्या स्मार्ट सिटीच्या दृष्टिने वाहतुक व्यवस्थापन करणे देखिल तितकेच गरजेचे आहे. अनावश्यक स्पिडब्रेकर काढणे गरजेचे असल्याचे सांगून  ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सुचना त्यांनी केली.


श्री. दराडे यांनी  शाळा-महाविद्यालयांना व स्वयंसेवी संस्थाना अशा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.  रस्त्यावरून पायी अथवा वाहनाने जाणाऱ्या नागरिकाच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे व शिक्षण, तंत्र आणि अंमलबजावणी या त्रिसुत्रीचे पालन करावे,असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागात होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत मागील वर्षी 80 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियानात शाळा-महाविद्यालयांचा मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेवून रस्ता सुरक्षेच्या नियमांकडे लक्ष दिले पाहिजे. अपघात टाळण्यासाठी  नियमांचे पालन करुन चालविणारा वाहनचालक, रस्ते निर्माण करणारे अभियंते, नियमांची अंमलबजावणी आणि अपघात घडल्यानंतर कमी कमी कालावधीत मिळणारे उपचार या चार  घटकाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. कळसकर यांनी रस्ता अपघातांच्या कारणांचे विश्लेषण केले. रस्ता अपघात रोखणेसाठी सर्व संबंधीत घटकांची जबाबादारी असून नाशिक परिवहन विभागामार्फत जिल्हा रस्ता सुरक्षा अंतर्गत सर्वकष उपायोजना सातत्यपूर्ण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहनचालकासाठी समुपदेशन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.आहिरे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल माहिती सांगितली.   यावेळी  सडक सुरक्षा, जीवन रक्षा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
---

Friday 13 April 2018

झिरो पेंडन्सी कार्यशाळा


शून्य प्रलंबिततेसाठी निर्णय प्रक्रिया वेगाने राबवावी-राजाराम माने

       नाशिक दि. 13 : शून्य प्रलंबितता व दैनंदिन कामकाजाचा निपटारा विहित मुदतीत होण्यासाठी अधिकाऱ्यांनी निर्णय प्रक्रिया वेगाने राबवावी, तसेच कागदपत्रांचे जतन योग्य पद्धतीने करण्यात यावे, असे निर्देश  विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, सुखदेव बनकर, प्रविण पुरी आदी उपस्थित होते.

          श्री. माने म्हणाले, नागरिकांची व प्रशासकीय कामे जलदगतीने होण्यासाठी ‘झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ या कार्यपद्धतीचा अवलंब प्रत्येक विभागाने काटेकोरपणे करावा. कामकाज गतिमान करण्यासाठी संगणक प्रणालीचा वापर अधिक प्रमाणात करण्यात यावा. याअनुषंगाने कार्यालयीन अभिलेख्यांसोबतच संगणकीय माहितीचे व्यवस्थापन आणि जतन योग्यपद्धतीने करण्यात यावे. अधिक डेटा उपयोग करणाऱ्या विभागांनी त्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देशही विभागीय आयुक्त यांनी दिले.
          सदरची कार्यवाही हे एक अभियान किंवा मोहीम म्हणून न राबविता एक स्थायी स्वरूपाची व्यवस्था म्हणून कायमस्वरूपी राबविण्यात यावी. यासाठी कार्यालयात सामुहिकरित्या जबाबदारी पार पाडतांना विभाग प्रमुखांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असेही श्री. माने यांनी सांगितले.

          श्री. स्वामी म्हणाले, ‘झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ या कार्यपद्धतीच्या अमंलबजावणीमुळे कार्यक्षमता वाढून प्रशासकीय कामात पारदर्शकता व सुटसुटीतपणा येईल. याचसोबत जुन्या अभिलेख्यांचे निंदणीकरण, वर्गीकरण व अद्ययावतीकरण करण्यासाठी सहा गठ्ठे पद्धती, अभिलेख्याचे  वर्गीकरण व अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण याबाबींवर लक्ष देण्यात यावे. प्रत्येक प्रकरण विहित मुदतीत पूर्ण करून त्याचा अहवाल वेळेवर सादर करावा. याप्रक्रियेमुळे कार्यालयीन कामकाजात सोपेपणा येण्याबरोबर जनतेच्या समस्या वेळेत सुटणार असल्याने कार्यालय प्रमुखांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. स्वामी यांनी केले.
प्रास्ताविकात श्री. गावडे यांनी शासन निर्णयाविषयी माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे विभागीय अधिकारी उपस्थित होते.
00000

Thursday 12 April 2018

अधिसभा सदस्य सत्कार


युवाशक्तीला विधायक वळण देण्याची शिक्षकांची जबाबदारी- पंकजा मुंडे
         

          नाशिक दि.12- पुढील काळात देशातील युवावर्गाची संख्या वाढणार असून या युवाशक्तीला विधायक वळण देण्याची महत्वाची जबाबदारी शिक्षक, विचारवंत व शासनाची आहे, असे प्रतिपादन राज्याच्या  ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री  पंकजा मुंडे यांनी केले.
          सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद व अधिसभेवर निवड झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आदी उपस्थित होते.

          श्रीमती मुंडे म्हणाल्या, शिक्षण व्यवस्थेमध्ये वेगाने बदल होत असून या बदलांना जाणून घेत शिक्षण प्रक्रियेचा विचार होणे आवश्यक आहे. युवाशक्तीस विधायक वळण देण्यात आपण कमी पडलो तर विध्वंसाच्या मार्गाने ती जाऊ शकते. याचा विचार एकूणच समाजाला करावा लागेल. हीच बाब लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात 'स्कील इंडिया' उपक्रमाच्या माध्यमातून  युवकांमधील कौशल्याला  प्रोत्साहन देण्याचे  काम सुरु केले आहे.
          देशातील विकासाचे चित्र आश्वासक असले तरीही विविध क्षेत्रांमधील समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची  गरज आहे. शाहु महाराजांच्या राजवैभव हे थोर असते पण  रयतेप्रती वचनबद्धता महत्वाची असते या विचारांनुसार शासन काम करीत आहे. बहुजन वंचितांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून घेतली आहे,असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.

          कुलगुरु डॉ.करमळकर म्हणाले, नवा विद्यापीठ कायदा मागच्या वर्षी लागू झाला असून यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या समवेत काम करण्यासाठी चांगली टीम तयार झाली आहे. विद्यापीठाला अंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
          यावेळी  श्रीमती पवार, श्री. आव्हाड, श्री. हेमंत धात्रक आदींनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य राजेश पांडे, प्रसोनजित फडणवीस, डॉ.व्ही.बी.आव्हाड, कोंडाजी पाटील, विजय सोनवणे, डॉ.महेश आबाळे, डॉ.विलास उगले, डॉ.तानाजी वाघ, विश्वनाथ पाडवी, डॉ.मोतीराम देशमुख, प्राचार्य दिनेश नाईक, डॉ.कल्पना अहिरे, अमित पाटील, गिरीश भवाळकर आदींचा सत्कार करण्यात आला.
          कार्यक्रमास पुणे व नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संस्थेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

---




‘अस्मिता’ महिला मेळावा


अस्मितायोजना शहरी भागातही राबविण्यात येईल-पंकजा मुंडे


            नाशिक दि.12- ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील शाळांमध्येदेखील अस्मिता योजना राबविण्यात येईल आणि यासाठी नगरविकास विभागाशी चर्चा करण्यात येईल. तसेच योजनेअंतर्गत सॅनीटरी पॅडची किंमत शुन्यापर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ईदगाह मैदान येथे आयोजित ‘अस्मिता’ महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला ग्रामविकास राज्य मंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जि.प. सभापती मनीषा पवार, अपर्णा खोसकर, मनीषा पवार, सुनिता चारोस्कर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार आदी उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या,  स्विकारार्हता, परवडणारी किंमत आणि उपलब्धता या तीन तत्वांवर ही योजना राबविण्यात येणार आहे. सॅनिटरी पॅडचे एकाच ठिकाणी उत्पादन करून बचत गटांच्या माध्यमातून ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. बचत गटांना सुमतीबाई सुकळीकर योजनेच्या माध्यमातून शुन्य टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल आणि बचतगटाच्या माध्यमातून अशिक्षित महिलादेखील सक्षम आणि संघटीत होतील.

मुलींचे पोषण आणि चांगले आरोग्य राहिल्याशिवाय सशक्त पिढी जन्माला येऊ शकत नाही. त्यामुळे ही योजना शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचविण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी जनजागृती  आणि सॅनीटरी पॅडच्या उपलब्धतेवर भर देण्यात येत आहे. उपलब्धता अधिक असल्यास किंमतदेखील कमी होऊ शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अक्षय कुमार यांनी ‘अस्मिता फंड’ ला योगदान दिले आहे. असे समाजातून योगदान मिळाल्यास संपुर्ण राज्य ‘अस्मिता राज्य’ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

अस्मिता योजनेमुळे आदिवासी पाड्यावरील मुलीदेखील आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जगू शकतील आणि याच मुली अस्मितेचा दूत बनून गावागावात माहिती पोहोचवतील, असे त्यांनी सांगितले. त्यांनी योजनेविषयी मोकळेपणाने आणि धीटपणे विचार मांडणाऱ्या मुक्ता बेंडकुळे हिचे कौतुक केले. तसेच नाशिक जिल्ह्याने अस्मिता योजनेअंतर्गत चांगली कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले.

श्री.भुसे म्हणाले, अत्यंत कमी खर्चात महिलांच्या आरोग्याची समस्या सोडविणारी योजना शासनाने सुरू केली आहे. अस्मिता योजनेअंतर्गत बचत गटांची नोंदणी करण्यात येत आहे. बचत गटांच्या माध्यमातून ही योजना ग्रामीण भागात पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. इंटेन्सिव्ह जिल्हा म्हणून शासनाने घोषित केल्याने कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या बचत गटांकडून व्याजाची रक्कम घेण्यात येणार नाही.
ग्रामविकास विभागातर्फे 2011 च्या पूर्वीचे गावठाणावरील अतिक्रम नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घराच्या उतराऱ्यावर पुरुषासोबत घरातील महिलेचेही नाव लावण्याचा निर्णयदेखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती सांगळे यांनी सॅनिटरी नॅपकीन कमी दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी त्याची किंमत जिल्हा परिषदेतर्फे अदा करण्यात येईल, असे सांगितले.

श्रीमती फरांदे यांनी अस्मिता योजनेमुळे मुली आणि महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती झाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, महिलांना या योजनेमुळे त्यांचा हक्क मिळाला आहे. राज्यात केवळ 17 टक्के महिला सॅनिटरी नॅपकीनचा उपयोग करत असल्याने महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने शासनाने ही क्रांतीकारी योजना सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री.गुप्ता यांनी राज्यात अस्मिता नोंदणी तीन कोटीपर्यंत नेण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले. प्रत्येक घरापर्यंत ही माहिती पोहाचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात श्री.गिते यांनी  अस्मिता योजनेअंतर्गत जिल्ह्यात 650 बचत गट आणि 25 हजार मुलींची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती दिली. नोंदणीत नाशिक जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते दहा मुलींना प्रातिनिधीक स्वरुपात अस्मिता कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते ‘अस्मिता-स्वच्छता व आरोग्याचा आयाम’  आणि ‘विकास प्रेरणा’ या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यमस्थळी जिल्हा परिषदेच्यावतीने एचएलएल महालॅबच्या सहकार्याने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

यावेळी स्वच्छ भारत अभियानांतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या  दिंडोरी, चांदवड, बागलाण, सुरगाणा, सिन्नर, नांदगाव, येवला, मालेगाव आणि इगतपुरी तालुक्यांचा सत्कार श्रीमती मुंडे व श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विविध पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात आले.
आशा स्वयंसेविका जिल्हास्तरीय पुरस्कार (2016-17) प्रथम- नसिम शेख, माणी (सुरगाणा), द्वितीय- सीता जाधव, कोहोर (पेठ)  2016-17 चे नाविन्यपुर्ण जिल्हास्तरीय पुरस्कार- प्रथम, भारती साळवे प्रा.आ.केंद्र शिंदे (नाशिक), द्वितीय-  मनिषा डहाळे प्रा.आ.केंद्र काननवाडी (इगतपुरी), 2016-17 चे आशा गटप्रवर्तक जिल्हास्तरीय पुरस्कार- प्रथम- स्वाती जाधव प्रा.आ.केंद्र खामखेडा (देवळा), द्वितीय- संगिता सदगीर काननवाडी (इगतपुरी), तृतीय- ज्योती जाधव तळेगाव दि.(दिंडोरी)

          डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार 2017-18 (उपकेंद्र) प्रथम- प्रा.आ.केंद्र कळवाडी ता.मालेगांव, उपकेंद्र पाडळदे, द्वितीय- प्रा.आ.केंद्र खेड ता.इगतपुरी  उपकेंद्र वासाळी, तृतीय- प्रा.आ.केंद्र वावी ता.सिन्नर उपकेंद्र वावी. 2017-18 (प्राथमिक आरोग्य केंद्र) प्रथम- प्रा.आ.केंद्र लोहोणेर ता.देवळा, द्वितीय- प्रा.आ.केंद्र मोहाडी ता.दिंडोरी, तृतीय-प्रा.आ.केंद्र दळवट ता.कळवण
          डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारांतर्गत 2017-18  ग्रामीण रुग्णालयासाठीचा प्रथम पुरस्कार ग्रामीण रुग्णालय नांदगावला मिळाला. फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्रथम- मीना जाधव अधिपरीचारीका (नांदगांव), प्रथम- इस्टर राठोड एल.एच.व्ही. (नांदगांव) द्वितीय- ए.बी.जाधव एल.एच.व्ही. (सटाणा), तृतीय- रत्ना पवार एल.एच.व्ही. (कळवण), आरोग्यसेविका प्रथम- मनिषा भांगे (सुरगाणा), द्वितीय- शामल अहीरे (इगतुपुरी), तृतीय- सविता सानप (मालेगांव)
----

जिल्हा रुग्णालय भेट

          मंत्री पंकजा मुंडे यांची जिल्हा रुग्णालयास भेट

            नाशिक दि.12- राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी जिल्हा शासकिय रुग्णालयास भेट दिली.
 त्यांनी कुपोषित बालकांच्या राष्ट्रीय पुनर्वसन केंद्र, कांगारु माता कक्ष, विशेष न्यूबॉर्न केअर यूनिट (एस.एन.सी.यू) आणि प्रसुती कक्षाची पाहाणी केली तसेच या कक्षांद्वारे कुपोषित बालकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. या कक्षांमध्ये बालकांवर उपचारासाठी 30 बेड, 36 इन्क्युबरेटर व्यवस्था करण्यात आली आहे. 

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनीता सिंगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी होते.
000000