Saturday 7 April 2018

पथदर्शी प्रकल्प


       गर्भधारणा पूर्व काळजी देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प नाशिकमध्ये

          नाशिक, दि. 7 : गर्भधारणा पूर्व घ्यावयाच्या काळजीबाबत पथदर्शी प्रकल्प राबविणारा नाशिक हा देशातील पहिला जिल्हा असून सिन्नर व पेठ तालुक्यात याची अंमलबजावणी सुरु करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या अतिरिक्त संचालक आरोग्यसेवा डॉ.अर्चना पाटील यांनी केले.
          जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी डॉ. पाटील बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे यांच्या हस्ते पथदर्शी प्रकल्पाच्या शुभारंभ झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, आरोग्य सभापती यतिन पगारे, सभापती सुनिता चारोस्कर, भारती पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.
          डॉ. पाटील म्हणाल्या, सर्वापर्यंत महत्वाच्या आरोग्य सेवा पूरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजच्या मानांकनातील अनेक सेवा दिल्या जात आहेत. पण जन्मानंतर होणारे बालमृत्यु रोखण्यासाठी अधिक उपाययोजनांची गरज आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागात पावसाळ्यामध्ये याबाबत समस्या वाढतात त्यासाठी पावसाळापूर्व कालावधीत कार्यवाही सुरु करण्यावर भर देण्यात येत आहे. आदिवासी भागातील अर्भक मृत्यु रोखण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

          श्रीमती सांगळे म्हणाल्या, जिल्ह्यात कुपोषण निर्मुलन अभियान राबवण्यात येणार असून याद्वारे 100 टक्के बालकांचे सर्वेक्षण करण्यात येईल. सॅम, मॅम  असणाऱ्या तीव्र कुपाषित बालकांवर बाल उपचार केंद्र, ग्राम बालविकास केंद्र व राष्ट्रीय पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून पोषक आहार, उपचार व आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. देशातील कुपोषित बालके, किशोरवयीन मुली व महिला यांच्या पोषणासाठी राष्ट्रीय पोषण मिशन 8 मार्च 2018 पासून सुरु झाले असून त्या अंतर्गत नाशिकसह राज्यातील 4 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
          त्या म्हणाल्या, गावपातळीवर आरोग्य अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी जिल्हा पातळीवर होणाऱ्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेतल्या जाव्यात. बालकांची  काळजी व माता मृत्यु रोखण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
          डॉ. गिते म्हणाले, बालकांच्या आरोग्याची काळजी घेऊन बालमृत्यु रोखण्याची क्षमता वैद्यकीय  अधिकाऱ्यांमध्ये आहे. विशेषत: ग्रामीण भागातील बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आरोग्यसेविका, एएनएम, वैद्यकिय अधिकारी आदींना  प्रशिक्षण दिले जाईल. पथदर्शी उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणेने उत्कृष्ट  काम करावे, असे त्यांनी आवाहन केले.   
          याप्रसंगी सभापती श्री. पगार, डॉ. पी. पी.डोके आदींनी मार्गदर्शन केले. डॉ. वाकचौरे यांनी सादरीकरणाद्वारे जागतिक आरोग्य दिन व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची माहिती दिली. कार्यक्रमास युनिसेफ, आरोग्य संचालनालय, जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, वैद्यकिय, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
                                                          00000   

No comments:

Post a Comment