Thursday 12 April 2018

अधिसभा सदस्य सत्कार


युवाशक्तीला विधायक वळण देण्याची शिक्षकांची जबाबदारी- पंकजा मुंडे
         

          नाशिक दि.12- पुढील काळात देशातील युवावर्गाची संख्या वाढणार असून या युवाशक्तीला विधायक वळण देण्याची महत्वाची जबाबदारी शिक्षक, विचारवंत व शासनाची आहे, असे प्रतिपादन राज्याच्या  ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री  पंकजा मुंडे यांनी केले.
          सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद व अधिसभेवर निवड झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आदी उपस्थित होते.

          श्रीमती मुंडे म्हणाल्या, शिक्षण व्यवस्थेमध्ये वेगाने बदल होत असून या बदलांना जाणून घेत शिक्षण प्रक्रियेचा विचार होणे आवश्यक आहे. युवाशक्तीस विधायक वळण देण्यात आपण कमी पडलो तर विध्वंसाच्या मार्गाने ती जाऊ शकते. याचा विचार एकूणच समाजाला करावा लागेल. हीच बाब लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात 'स्कील इंडिया' उपक्रमाच्या माध्यमातून  युवकांमधील कौशल्याला  प्रोत्साहन देण्याचे  काम सुरु केले आहे.
          देशातील विकासाचे चित्र आश्वासक असले तरीही विविध क्षेत्रांमधील समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची  गरज आहे. शाहु महाराजांच्या राजवैभव हे थोर असते पण  रयतेप्रती वचनबद्धता महत्वाची असते या विचारांनुसार शासन काम करीत आहे. बहुजन वंचितांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून घेतली आहे,असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.

          कुलगुरु डॉ.करमळकर म्हणाले, नवा विद्यापीठ कायदा मागच्या वर्षी लागू झाला असून यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या समवेत काम करण्यासाठी चांगली टीम तयार झाली आहे. विद्यापीठाला अंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
          यावेळी  श्रीमती पवार, श्री. आव्हाड, श्री. हेमंत धात्रक आदींनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य राजेश पांडे, प्रसोनजित फडणवीस, डॉ.व्ही.बी.आव्हाड, कोंडाजी पाटील, विजय सोनवणे, डॉ.महेश आबाळे, डॉ.विलास उगले, डॉ.तानाजी वाघ, विश्वनाथ पाडवी, डॉ.मोतीराम देशमुख, प्राचार्य दिनेश नाईक, डॉ.कल्पना अहिरे, अमित पाटील, गिरीश भवाळकर आदींचा सत्कार करण्यात आला.
          कार्यक्रमास पुणे व नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संस्थेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

---




No comments:

Post a Comment