Sunday 1 April 2018

मोसम चौपाटी लोकार्पण


मोसम नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज- दादाजी भुसे


  मालेगाव दि. 1- मोसम नदी चौपाटीचे सौंदर्य कायम ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असून नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
मोसम नदी चौपाटीचे लोकार्पण  श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला  आमदार आसिफ शेख, मनपा आयुक्त संगिता धायगुडे, उपमहापौर सखाराम घोडके,  मनपा सभापती सलिम अन्वर, जयप्रकाश बच्छाव आदी उपस्थित होते.
श्री. भुसे म्हणाले,  गेल्या दीड महिन्यापासून महसूल, मनपा, पोलीस, वनकर्मचारी, विविध संघटना व परिसरातील नागरिकांनी मोसम नदी स्च्छता अभियानात सहभाग  घेतल्याने हा सोहळा शक्य झाला आहे. मालेगावच्या सौंदर्यात यामुळे भर पडणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी आणि चौपाटीचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नदी सुशोभिकरणासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. येत्या काळात मोसम नदी शंभर टक्के स्वच्छ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार शेख यांनी चौपाटीच्या सुशोभिकरणासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मनपा आयुक्त धायगुडे यांनी नदीत दुषित पाणी आणि कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई  करण्यात येईल, असे सांगितले.
मोसम नदी  सुशोभित करण्याकरिता  प्रयत्न करणाऱ्या  ईश्वर पवार, मनोज जगताप, उमेश अहिरे, जिभाऊ रौदंळ डॉ. जतीन कापडणीस, अजिक्य भुसे, अविष्कार भुसे  यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  
चौपाटी  सायंकाळी 4 ते 8 वाजे पर्यंत खुली राहणार असून या चौपाटीमध्ये विविध प्रतिकृती,  खाद्य पदार्थाचे स्टॉल, मनोरंजाचे साहित्य, रोप वाटिका, वाचन कट्टा आदी मनोरंजनाची साधने विद्युत रोषणाई करुन  लावण्यात आले आहेत.
                                                                    0000000


No comments:

Post a Comment