Sunday 8 April 2018

महामानवास अभिवादन


महामानवास अभिवादनलोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन

नाशिक,दि.8 :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणाऱ्या ‘महामानवास अभिवादन’ या एप्रिल 2018 च्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते यावेळी  करण्यात आले.
सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला महापौर रंजनाताई भानसी, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, समाज कल्याण उपायुक्त राजेंद्र कलाल, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सहाय्यक आयुक्त प्राची वाजे आदी उपस्थित होते.
            या विशेषांकात डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विविध सामाजिक पैलूंवरती मान्यवरांनी विचार व्यक्त केले आहेत. छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सलोख्याचे बंध वर्णिलेला भावस्पर्शी लेख तसेच डॉ.बाबासाहेबांनी विद्युत आणि जल क्षेत्राच्या विकासासंदर्भात मांडलेल्या महत्त्वपूर्ण धोरणांबद्दलची माहिती, त्यांच्या अलौकिक ग्रंथप्रेमाचे दर्शन करणारा लेख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या अंतर्गत व बाह्यसुरक्षा विषयीचे चिंतन आदी लेखांचा समावेश या विशेषांकात करण्यात आला आहे.
तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाची संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती या विशेषांकात देण्यात आली आहे.
            याचबरोबर वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा, तर राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत मांडलेला सन 2018-19 अर्थसंकल्पाची माहिती व त्या अंतर्गत कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, युवकांसाठी विविध उपक्रम अशा अनेक बाबींसाठी अर्थसंकल्पीय तरतुदी याबाबत सविस्तर माहितीचा समावेश करण्यात आला आहे.यासोबतच महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्याच्या निर्णयावर अधारित महत्त्वपूर्ण लेखाचा समावेश आहे.
            लोकराज्य एप्रिल 2018चा अंक 92 पानांचा असून त्याची किंमत फक्त दहा रुपये आहे.  जिल्हा माहिती कार्यालय, प्रमुख बुक स्टॉल, शासकीय ग्रंथालय येथे हा अंक सहज उपलब्ध होईल.
००००

No comments:

Post a Comment