Thursday 5 April 2018

त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय


आदीवासी भागातील रुग्णाला चांगली आरोग्य सेवा द्यावी-डॉ.दिपक सावंत


नाशिक, दि.5:- दूर्गम, ग्रामीण व आदीवासी भागातील रुग्ण हा पूर्णपणे शासनाच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असल्याने  या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी केले. 
          त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या 50 खाटांच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, आमदार निर्मला गावीत, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.

       डॉ. सावंत म्हणाले, कुपोषित बालकांवर उपचारांच्यादृष्टीने पालघर जिल्ह्यात यशस्वी प्रयत्न झाले असून त्यानुसार इतर ठिकाणी कार्यवाही व्हावी. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या भागाबरोबरच मेळघाट, अक्कलकुवा, धडगाव आदी  ठिकाणांवर अशा पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. कुपोषण दूर करण्यासाठी  महिला व बालकल्याण, आदिवासी विभाग, ग्रामविकास आदी विभागांचे सहकार्यही महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

          ते म्हणाले, माता सुदृढ नसल्याने ही बालके जन्मत: अतिशय कमी वजनाची असतात. त्यामुळे बालमृत्यु होतात. बालमृत्यु रोखण्यासाठी सॅम- मॅम व कमी वजनाच्या बालकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व सरंपच आदींनी लक्षपूर्वक काम करणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयामध्ये लवकरच बाल अतिदक्षता विभाग सुरु करण्यात येईल, यादृष्टीने संबंधितांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.

          डॉ. जगदाळे म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. कुंभमेळ्यामध्ये देशभरातून आलेल्या भाविकांना येथे चांगली आरोग्य सेवा दिली आहे. पूर्वीच्या ग्रामिण रुग्णालयाची श्रेणीवाढ करुन उपजिल्हा रुग्णालय झाल्याने अधिक वैद्यकिय सुविधा व  विशेष तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 
          श्रीमती सांगळे यांनी समाजातल्या शेवटच्या दूर्बल घटकापर्यंत आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी यंत्रणेने पार पाडण्याची गरज असून त्यासाठी चांगले काम करावे, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
          यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी उप जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची पाहाणी करुन संबंधितांना विविध सूचना केल्या.
             
                                                                        0000000

No comments:

Post a Comment