Tuesday 24 April 2018

विधान परिषद निवडणूक


निवडणुक प्रक्रीयेसाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष- राधाकृष्णन बी.

नाशिक,24: जिल्ह्यात विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक प्रक्रीयेसाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात यावी. या कक्षात स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समोवश असावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या  बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधिक्षक संजय दराडे, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, शशीकांत मंगरुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात यावे.  नियमित विकासकामे करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. निवडणूक प्रक्रीयेत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसमवेत कोणत्याही बैठकीत सहभागी होऊ नये. महत्वाच्या बैठकीबाबत पूर्वपरवानगी घेण्यात यावी. निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत धोरणात्मक निर्णय जाहीर करू नये.
मतदानाच्या दिवसापर्यंत विशेष गस्ती पथकाद्वारे वाहन तपासणी करण्यात यावी. मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जाणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत माहिती देण्यात यावी. तालुका स्तरावरील शासकीय विश्रामगृहात नोंदणी असलेल्या व्यक्तिव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये,असे निर्देश त्यांनी दिले. मतदान प्रक्रीया मतपत्रिकेद्वारे आणि पसंतीक्रमानुसार होणार आहे, अशी माहिती त्यांनी  दिली.
श्री.दराडे यांनी जिल्ह्यात येणाऱ्या विविध मार्गावर गस्ती पथकांच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याच्या सुचना दिल्या. वाहनातून रोख रक्कम अथवा मद्याची वाहतूक होणार नाही याविषयी दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
----

No comments:

Post a Comment