Wednesday 11 April 2018

मुख्यमंत्री सडक योजना


रस्त्याच्या माध्यमातून गावात विकास पोहोचविला जाईल-पंकजा मुंडे


          नाशिक दि.11- मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या माध्यमातून गावतांड्यापर्यंत विकास पोहाचविला जाईल, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.  
सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या भूमीपुजन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा ‍शितल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, मुख्य कार्यकारी अधिकार नरेश गिते, पं.स. सभापती सुमनताई बर्डे, सदस्य शोभा बरके, सरपंच गोपाळ शेळके आदी उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, रस्त्याच्या माध्यमातून गावातील भाजीपाला शहरातील बाजारापर्यंत पोहोचविता येणे शक्य होईल. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक लाभ मिळेल. रस्ते तयार झाल्यामुळे गावात एसटीची सुविधा होऊन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरात जाता येईल.
 वाडीवस्तीवर रस्ते पोहोचविण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 30 हजार किलोमीटर लांबीच्या  रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात योजनेअंतर्गत 1200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार असून 640 किमीच्या कामांसाठी 350 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, राज्यातील पंचायत समित्यांना स्वत:ची इमारत नसल्याने कामकाजावर परिणाम होतो. पंचायत समितीच्या इमारती पुर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेची इमारत उभारण्याबाबत उच्चस्तरीय समितीत निर्णय होणार असून प्रशस्त आणि सर्व सुविधांनी युक्त इमारत उभारण्यात येईल.
ग्रामविकासासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावातील पाण्याची समस्या दूर होत आहे. योजनेचे यश लक्षात घेऊन या योजनेचा स्विकार अन्य राज्यांनी केला आहे.  माझी कन्या भाग्यश्री  योजनेद्वारे मुलींचे पालनपोषण आणि शिक्षणासाठी सहकार्य करण्यात येत आहे. मनोधैर्य  योजनेद्वारे पिडीतांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. बचतगटांना प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीमती मुंडे यांच्या हस्ते नांदुर शिंगोटे-चास या दहा किमी लांबीच्या 4 कोटी खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. त्याचबरोबर 1 कोटी 17 लाख रुपयाची पाणी पुरवठा योजना, रेणुकादेवी मंदीर व तलाव परिसर सुशोभिकरणाच्या 3 कोटी 70 लाखांच्या कामांसह इतर कामांचे भूमीपुजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
-----


No comments:

Post a Comment