Friday 30 June 2017

चार कोटी वृक्ष लागवड

चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम
जिल्ह्यात 44 लाख वृक्ष लागवड होणार

          नाशिक 30 – राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान आयोजित चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात 44 लाख 13 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
वन विभागाने वृक्ष लागवडीसाठी तयारी पूर्ण केली असून खड्डे खोदण्याचे कामदेखील पुर्ण झाले आहे. एकूण वृक्ष लागवडीपैकी वन विभाग 194 ठिकाणी 34 लाख 89 हजार, ग्राम पंचायत 1314 ठिकाणी 5 लाख आणि इतर शासकीय यंत्रणा 3101 ठिकाणी 4 लाख 18 हजार वृक्ष लागवड करणार आहे. वृक्ष लागवडीसाठी वन विभागाच्या 86 रोपवाटीकेत 1 कोटी 12 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. वृक्ष लागवड कार्यक्रमानंतर उरणारी रोपे पुढील वर्षाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात उपयोगात आणली जाणार आहेत.

नागरिकांना वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ‘My Plants’ या मोबाईल ॲप्लिकेशनवर तसेचरोपे आपल्या दारीउपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, मनमाड आणि चांदवड येथील 12 ठिकाणी कक्ष उभारून नागरिकांना रोपे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 1926 क्रमांकावरदेखील नागरिकांना नोंदणी करता येईल.

वृक्ष लागवडीसाठी हरितसेना सदस्य नोंदणी सुरू असून वनविभागाच्या mahaforest.gov.in या संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 99 हजार 764 नोंदणी करण्यात आली आहे. विभागातील ही सर्वाधिक नोंदणी आहे.
गतवर्षी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण 29 लाख 29 हजार रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी वन विभागाने लावलेली 90 टक्के तर इतर यंत्रणांनी लावलेली 75 टक्के जिवंत रोपांची टक्केवारी आहे. नागरिकांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील वृक्ष लागवड कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पर्यावरण रक्षणात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी केले आहे.
-----

Monday 26 June 2017

ग्रामीण रुग्णालय भेट

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढविणार-डॉ.दिपक सावंत


नाशिक दि.26 -  आदिवासी भागातील रुग्णांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन तज्ज्ञ डॉक्टर्स नियुक्त करण्यात येतील, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी केले.
डॉ.सावंत यांनी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालय आणि बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी आमदार जीवा पांडू गावीत, आरोग्य उपसंचालक डॉ.लोचना घोडके, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशिल वाकचौरे आदी उपस्थित होते.
डॉ.सावंत म्हणाले, रुग्णांच्या समस्या दूर करण्यासाठी सुरगाणा येथे 50 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र सुसज्ज इमारत उभी करण्यात येईल. रुग्णालयात फिजीशीअन, सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात येईल. आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टर्स काम करण्यास तयार व्हावेत यासाठी दीड ते दोन लाखापर्यंत पगार वाढवून त्यांना शासनातर्फे विशेष प्रोत्साहन  देण्यात येईल.  रुग्णालयात एक्स-रे यंत्र कार्यरत करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.सावंत यांनी ग्रामस्थ आणि रुग्णांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आदिवासी भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत  शुक्रवारी स्थानिक स्तरावर बैठक घेऊन त्याचा अहवाल त्वरीत शासनास पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणेस दक्ष राहण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. आदिवासी भागात सॅम आणि मॅमचे प्रमाण कमी करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

-------

Saturday 24 June 2017

प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

नाशिक दि.24 -  खरीप हंगाम 2017 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2017 आहे.
अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत पिके घेणारे सर्व शेतकरी योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. योजनेंतर्गत भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 39 हजार रुपये प्रति हेक्टर असून शेतकऱ्यांनी रुपये 780 पीक विमा हप्ता भरावयाचा आहे. खरीप ज्वारीसाठी  विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार  तर पीक विमा हप्ता रुपये 480,  बाजरी, कारळे आणि नाचणीसाठी रुपये 20 हजार  आणि विमा हप्ता रुपये  400, मका रुपये 25 हजार आणि 500, मूग  आणि उडीदसाठी रुपये 18 हजार आणि 360, भुईमूग रुपये 30 हजार आणि 600, सोयाबीन रुपये 40 हजार आणि 800, कापूस रुपये 40 हजार आणि  पीक विमा हप्ता रुपये 2000, तर कांदा पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम रुपये 55 हजार प्रति हेक्टर असून  शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रुपये 2750 आहे.
पीक पेरणी पासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती यापासून विमा संरक्षण मिळणार आहे.
खरीप 2017 पासून सहभागी होण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले छायाचित्र, बँक खातेपुस्तकाची प्रत आणि आधारकार्डाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.  आधारकार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसह फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा. तसेच आधार क्रमांक जोडलेले बँक खातेच अर्जावर नमूद करावे. अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी गावतपातळीवर अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी आणि बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी टी.एन.जगताप यांनी केले आहे.

-------

Friday 23 June 2017

आदिवासी आश्रमशाळा उद्घाटन

दिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत शासन संवेदनशील -विष्णू सवरा        

नाशिक दि.23:- शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत संवेदनशील असून त्यांना स्पर्धेच्या युगात टिकता यावे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी  केले.
          दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथील शासकिय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, आदिवासी आयुक्त  आर.जी. कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी अमोल येडगे, प्रभारी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, मनिषा पवार आदी उपस्थित होते.

श्री.सवरा म्हणाले,चांगल्या वातावरणात चांगले शिक्षण देता यावे यासाठी राज्यात सुविधासंपन्न अशा 206 शासकिय आदिवासी आश्रमशाळा उभारण्यात येणार असून  86 बांधून पूर्ण झाल्या आहेत. मुला-मुलींची वसतीगृहे, वर्गखोल्या, मैदान, बहुउद्देशिय सभागृह, शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी निवासव्यवस्था, भोजनकक्ष आदी सर्व सुविधा या आश्रमशाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बोपेगावचे संकुल त्याचप्रकारचे आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गरजेच्या 17 अत्यावश्यक वस्तू त्यांना वेळेवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी खर्चाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर वसतीगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवासखर्च आणि पुस्तकांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे,  असे श्री.सवरा यांनी सांगीतले.
खा.चव्हाण यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळाल्यास मोठी झेप घेण्याची त्यांची क्षमता आहे, असे सांगितले.  यावेळी आ. झिरवाळ यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रकल्प अधिकारी श्री.येडगे यांनी आदिवासी विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली.

बोपेगाव येथील आश्रमशाळा 4 एकर परिसरात उभारण्यात आली आहे. 387 विद्यार्थी असलेल्या या शाळेची 20 वर्ग खोल्यांची इमारत, 40 मुलांचे व 40 मुलींची स्वतंत्र वसतीगृहे, 12 शिक्षक व 12 कर्मचाऱ्यांची , एक मुख्याध्यापकाची निवासस्थाने,  बहुउद्देशीय सभागृह आदी इमारती नव्याने बांधण्यात आल्या आहेत. 

निवृत्ती वेतन कार्यशाळा

पगाराप्रमाणेच निवृत्ती वेतन नियमितपणे देण्यासाठी प्रयत्न करावे
                                                              - एस.एस. सरफरे

नाशिक दि. 23: कर्मचाऱ्यास नियमित पगाराप्रमाणेच निवृत्तीवेतन नियमित मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उप महालेखापाल एस.एस. सरफरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात  निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधीविषयी आयोजित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सह संचालक बाळासाहेब घोरपडे, वरिष्ठ लेखाधिकारी जी. बी. खुलगे, सहायक लेखाधिकारी डी. एन. पुजारी, एस.एस. शिंदे, वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे, वरिष्ठ लेखापाल संदीप डोळस, अप्पर कोषागार अधिकारी शितल महाले आदी उपस्थित होते.

 श्री. सरफरे म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यास त्याचे निवृत्तीवेतन नियमितपणे चालु झाल्यास त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. कर्मचाऱ्याने केलेल्या सेवेचा लाभ त्याला वेळेवर मिळण्यासाठी निवृत्तीवेतनासाठीची प्रक्रीया सहा महिने अगोदर पासून सुरू करणे गरजेचे आहे.
 सदर कार्यशाळेच्या पहिल्यासत्रात वरिष्ठ लेखाधिकारी जी. बी. खुलगे यांनी नियत वयोमानानुसार, कुटुंब निवृत्ती वेतन, एकाकी कुटुंब निवृत्ती वेतन, स्वेच्छा निवृत्तीवेतन  आदी निवृत्ती वेतनाच्या विविध पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच निवृत्ती वेतनाची प्रक्रीया राबवित असतांना येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणीविषयी माहिती दिली.
भविष्य निर्वाह निधीबाबतही सहायक लेखाधिकारी डी. एन. पुजारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक विलास गांगुर्डे यांनी केले.
00000



आश्रमशाळा आढावा बैठक

आश्रमशाळेत 31 जुलैपर्यंत शिक्षकांच्या नेमणूका करा-विष्णू सवरा       


नाशिक दि.23- आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी 31 जुलैपर्यंत आश्रमशाळेतील अधीक्षक, शिक्षक आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करा, असे निर्देश  आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी  दिले.
          आदिवासी आयुक्त कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आदिवासी आयुक्त  आर.जी. कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक आदिवासी विकास महामंडळ दिकर जगदाळे, प्रभारी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्यासह जिल्ह्यातील नाशिक विभागातील प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
          श्री.सवरा म्हणाले, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात यावे. आश्रमशाळेत भोजन कक्ष तयार करण्यात यावा. पाणी आणि स्वच्छतागृहाचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत. मुलींच्या शाळेत सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत. मैदानासाठी किमान पाच एकर जागा उपलब्ध नसल्यास भाडेतत्वावर जागा शोधण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. आश्रमशाळे संदर्भात विविध सुविधांचा श्री.सवरा यांनी आढावा घेतला.

-----

Tuesday 13 June 2017

फळपीक विमा योजना

हवामान आधारीत फळपीक विमा योजना जाहीर

    नाशिक, दि. 13 :-  प्रतिकुल हवामान घटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी हवामान आधारीत फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली असून योजनेत सहभागी होण्यासाठी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी तसेच कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालकांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील डाळींब व पेरु फळपीकांसाठी इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे. डाळींबसाठी प्रति हेक्टर 1 लाख 10 हजार रुपये एकूण विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 5500रु. आहे. हप्ता भरण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2017 आहे. जास्त पास फळ पक्वता ते काढणी अवस्थेसाठी कमाल नुकसान भरपाई मर्यादा 60 हजार प्रति हेक्टर असून विमा संरक्षण कालावधी 16 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2017 आहे. विमासंरक्षण कालावधी 15 जुलै ते 30 डिसेंबर 2017 पर्यंत असून पावसाचे कमी अधिक प्रमाण, फळवाढीची अवस्था व फळपक्वतेच्या टप्प्यातील धोक्यानुसार नुकसान भरपाई देय रक्कम राहील. पेरु पीकासाठी प्रति हेक्टर 50 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 2500रु आहे. हप्ता भरण्याची अंतिम मुदत 14 जून 2017 आहे.
यंदा विभागातील 24 तालुक्यातील 154 मंडळात राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांनी एप्रिल ते जुलै या कालावधीत कर्ज मंजुर असेल अशा कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही ऐच्छीक स्वरूपाची  आहे.
डाळींब फळपीक विमा संरक्षण योजनेसाठी धुळे जिल्ह्यात रिलायन्स जनरल इंन्शुरन्स जळगाव जिल्ह्यात डाळींब, चिकु, मोसंबी व पेरु या फळपीकासाठी एचडीएफसी ईगो जनरल इंन्शुरन्स ही कंपनी आहे.  चिकु या फळासाठी विमा संरक्षित रक्कम 50 हजार रु.पर्यंत विमा हप्ता 2500 रु, मोसंबीसाठी 70 हजार रु. असुन त्यासाठी विमा हप्ता 3500 रु. विमा भरण्याची अंतिम मुदत 30 जून पर्यंत आहे. मोसंबी फळासाठी  विमा संरक्षीत रक्कम 70 हजार रु. प्रति हेक्टर आणि  विमा हप्ता 3500 रु. आहे.

00000

चावडी वाचन

गावाच्या विकासाचे योग्य नियोजन करा-महेश झगडे


       नाशिक दि. 13- ग्रामीण अर्थकारणाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गावाच्या विकासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
             दिंडारी तालुक्यातील जानोरी येथे आयोजित चावडी वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उपविभागीय अधिकारी उदय किसवे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, सरपंच हिराताई भोई, तलाठी गिरीश कुलकर्णी आदि उपस्थित होते.

            श्री. झगडे म्हणाले, नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर जमीन धारण करणाऱ्याचे वर्चस्व रहावे असा शासनाचा प्रयत्न आहे. या दिशेने संगणीकृत सातबारा हा पहिला टप्पा असून जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुलभ व्हावी आणि त्यात कोणताही फेरफार करता येऊ नये असा यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहे.
          चावडी वाचनाच्या माध्यमातून विविध कायद्यांची माहिती नागरिकांनी करुन घ्यावी. शेतमाल विक्री, बाजारपेठ शोधणे, आणि विपणन प्रक्रिया विषयी  या उपक्रमाच्या माध्यमातून माहिती घेता येईल. नागरिकांना शासनाच्या कायद्याचा अभ्यास नसल्यामुळे विविध विकास योजनांचा लाभ घेता येत नाही. चावडी वाचनाच्या माध्यमातून महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून कायदे आणि शासन निर्णय समजावून घेतल्यास नागरिकांना त्याचा निश्चितपणे लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

             जिल्हाधिकारी म्हणाले, सातबारा संगणकीकृत झाल्यामुळे नागरिकांचा त्रास वाचणार आहे. मोबाईलवर देखील सातबारा उपलब्ध होऊ शकेल. सातबारा अचूक व्हावा यासाठी चावडी वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमानंतर 15 ते 20 दिवसात सातबारा मध्ये आवश्यक दुरुस्त्या करुन संबंधितांना दिला जाईल. शेतकऱ्यांचे समाधान महत्वाचे असून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या अशा उपक्रमांच्या माध्यमातून सोडवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्णन यांनी केले. एक मॉडेल’  गाव म्हणून जानोरीचा विकास करणे शक्य असून त्यासाठी प्रशासनाशी समन्वय राखत ग्रामस्थांनी विकासाचे उपक्रम राबवावे, असेही ते म्हणाले.

              प्रास्ताविकात श्री. किसवे म्हणाले, नव्या महसूली वर्षापासून संगणीकृत सातबारा उपलब्ध होणार असून तो अचूक करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी चावडी वाचन उपक्रम राबविण्यात येत आहे. जानोरी गावातील 1200 सातबाराचे चावडी वाचन दोन टप्प्यात करण्यात येत आहे. संगणकीकृत सातबारा ई - सेवा केंद्र आणि सेतू केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
              यावेळी श्री. झगडे यांनी सातबारा उताऱ्यातील त्रुटींची ग्रामस्थांकडून माहिती घेतली, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले.

----

Saturday 10 June 2017

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वर्धापन दिन

वैद्यकीय क्षेत्रातील अध्ययनासोबत सेवाभावनेने काम करा-ई.वायुनंदन

ना‍शिक दि. 10-वैद्यकीय क्षेत्रासंबंधीत जनतेच्या मनात असणारा आदर आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी अध्ययनासोबत सेवाभावनेने कार्य करा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांनी केले.
          महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एकाणिसाव्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, आमदार डॉ.राहुल आहेर, प्रतिकुलगुरू डॉ.मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण, अधीष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, डॉ.सतीश डुंबरे, डॉ.विरेंद्र कविश्वर आदी उपस्थित होते.

          श्री.वायुनंदन म्हणाले, महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात ग्रामीण भागात आरोग्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्राकडे आदर्श सेवाकार्य म्हणून पाहिले जाते. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना वैद्यकीय शिक्षणाचा लाभ देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात चांगली सेवा देणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          डॉ.म्हैसेकर म्हणाले, विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला प्राधान्य दिले आहे. संशोधन प्रकाशन करणे सुलभ व्हावे यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी एकूण दोन कोटींची  तरतूद करण्यात आली आहे.  याचा लाभ घेऊन संशोधन प्रकल्प विद्यापीठाकडे सादर करावा, असे आवहान त्यांनी केले.

          विद्यापीठाने पदव्युत्तर संस्था सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याचबरोबर आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, फिजीओथेरेपी अभ्यासक्रमाची पदवी महाविद्यालये सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी आवश्यक सुचना पाठवून प्राध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

          यावेळी मान्यवरांच्या हस्ते वैद्य राजपाल शंकरराव पाटील आणि वैद्य मीरा मधुकर परांजपे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परीक्षा विभाग सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थी कल्याण विभागाची पारितोषिके प्रदान करण्यात आली.
          कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.खामगावकर यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी डॉ.देशमुख, श्री.पाटील आणि श्रीमती परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले.

------

Tuesday 6 June 2017

‘स्वच्छ भारत’

प्लास्टिकमुक्त नाशिकसाठी एकत्रित प्रयत्न करावे
                                                                   -प्रकाश जावडेकर

नाशिक, दि. 6:- नाशिक शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आणि देशातील सर्वात स्वच्छ शहर  व्हावे यासाठी  लोकप्रतिनिधी  स्वयंसेवी संस्था विद्यार्थी  आणि नागरीकांनी  एकत्रित प्रयत्न  करावे, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
जेलरोड येथील  वॉर्ड  क्रमांक 18 येथे आयोजित  स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी  ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक विशाल संगमनेरे , लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

श्री. जावडेकर म्हणाले, शहर आणि ग्रामीण भागात दररोज 15 हजार टन प्लास्टिक कचरा फेकला जातो त्यापैकी सहा हजार टन कचरा उचलला जात नाही. देशात वर्षाला 20 लाख टन प्लास्टिक कचरा विखुरलेल्या स्वरुपात पडून असल्याने आणि तो विघटनशील नसल्याने पर्यावरणाची  हानी  होते. त्यामुळे प्लास्टिक  कचरा कचराकुंडीत  टाकण्याची सवय लागणे आवश्यक आहे. महापालिकेने  शहरात प्लास्टिक कचऱ्यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 ‘स्वच्छ भारत’ जनतेने स्वीकारलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात साडे तीन कोटी शौचालय बांधण्यात आले आणि एक लाख 70 हजार  गावे हागणदारी  मुक्त  झाली. शौचालय  वापरण्याकडेदेखील ग्रामीण भागातील जनतेचा कल वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याला प्लास्टिक कचरा स्वच्छतेचा आढावा घेणार असल्याचे ते म्हणाले.

श्री. जावडेकर यांनी जेलरोड परिसरातील प्लास्टिक कचरा स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांना दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवण्याचे आवाहन केले. नगरसेवकांनी  महिन्यातील एक दिवस आपल्या वार्डात प्लास्टिक कचरा संकलनाची मोहिम आयोजित केल्यास शहर स्वच्छ होईल, असे ते म्हणाले. जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

-----