Tuesday 13 June 2017

चावडी वाचन

गावाच्या विकासाचे योग्य नियोजन करा-महेश झगडे


       नाशिक दि. 13- ग्रामीण अर्थकारणाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गावाच्या विकासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
             दिंडारी तालुक्यातील जानोरी येथे आयोजित चावडी वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उपविभागीय अधिकारी उदय किसवे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, सरपंच हिराताई भोई, तलाठी गिरीश कुलकर्णी आदि उपस्थित होते.

            श्री. झगडे म्हणाले, नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर जमीन धारण करणाऱ्याचे वर्चस्व रहावे असा शासनाचा प्रयत्न आहे. या दिशेने संगणीकृत सातबारा हा पहिला टप्पा असून जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुलभ व्हावी आणि त्यात कोणताही फेरफार करता येऊ नये असा यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहे.
          चावडी वाचनाच्या माध्यमातून विविध कायद्यांची माहिती नागरिकांनी करुन घ्यावी. शेतमाल विक्री, बाजारपेठ शोधणे, आणि विपणन प्रक्रिया विषयी  या उपक्रमाच्या माध्यमातून माहिती घेता येईल. नागरिकांना शासनाच्या कायद्याचा अभ्यास नसल्यामुळे विविध विकास योजनांचा लाभ घेता येत नाही. चावडी वाचनाच्या माध्यमातून महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून कायदे आणि शासन निर्णय समजावून घेतल्यास नागरिकांना त्याचा निश्चितपणे लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

             जिल्हाधिकारी म्हणाले, सातबारा संगणकीकृत झाल्यामुळे नागरिकांचा त्रास वाचणार आहे. मोबाईलवर देखील सातबारा उपलब्ध होऊ शकेल. सातबारा अचूक व्हावा यासाठी चावडी वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमानंतर 15 ते 20 दिवसात सातबारा मध्ये आवश्यक दुरुस्त्या करुन संबंधितांना दिला जाईल. शेतकऱ्यांचे समाधान महत्वाचे असून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या अशा उपक्रमांच्या माध्यमातून सोडवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्णन यांनी केले. एक मॉडेल’  गाव म्हणून जानोरीचा विकास करणे शक्य असून त्यासाठी प्रशासनाशी समन्वय राखत ग्रामस्थांनी विकासाचे उपक्रम राबवावे, असेही ते म्हणाले.

              प्रास्ताविकात श्री. किसवे म्हणाले, नव्या महसूली वर्षापासून संगणीकृत सातबारा उपलब्ध होणार असून तो अचूक करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी चावडी वाचन उपक्रम राबविण्यात येत आहे. जानोरी गावातील 1200 सातबाराचे चावडी वाचन दोन टप्प्यात करण्यात येत आहे. संगणकीकृत सातबारा ई - सेवा केंद्र आणि सेतू केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
              यावेळी श्री. झगडे यांनी सातबारा उताऱ्यातील त्रुटींची ग्रामस्थांकडून माहिती घेतली, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले.

----

No comments:

Post a Comment