Saturday 24 June 2017

प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

नाशिक दि.24 -  खरीप हंगाम 2017 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2017 आहे.
अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत पिके घेणारे सर्व शेतकरी योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. योजनेंतर्गत भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 39 हजार रुपये प्रति हेक्टर असून शेतकऱ्यांनी रुपये 780 पीक विमा हप्ता भरावयाचा आहे. खरीप ज्वारीसाठी  विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार  तर पीक विमा हप्ता रुपये 480,  बाजरी, कारळे आणि नाचणीसाठी रुपये 20 हजार  आणि विमा हप्ता रुपये  400, मका रुपये 25 हजार आणि 500, मूग  आणि उडीदसाठी रुपये 18 हजार आणि 360, भुईमूग रुपये 30 हजार आणि 600, सोयाबीन रुपये 40 हजार आणि 800, कापूस रुपये 40 हजार आणि  पीक विमा हप्ता रुपये 2000, तर कांदा पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम रुपये 55 हजार प्रति हेक्टर असून  शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रुपये 2750 आहे.
पीक पेरणी पासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती यापासून विमा संरक्षण मिळणार आहे.
खरीप 2017 पासून सहभागी होण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले छायाचित्र, बँक खातेपुस्तकाची प्रत आणि आधारकार्डाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.  आधारकार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसह फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा. तसेच आधार क्रमांक जोडलेले बँक खातेच अर्जावर नमूद करावे. अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी गावतपातळीवर अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी आणि बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी टी.एन.जगताप यांनी केले आहे.

-------

No comments:

Post a Comment