Thursday 1 June 2017

चार कोटी वृक्ष लागवड

'वनयुक्त शिवार'साठी शास्त्रशुद्ध नियोजन करा- सुधीर मुनगंटीवार

नाशिक दि. 01 -  'वनयुक्त शिवार' करण्यासाठी शासनाने यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून  वृक्षरोपणासाठी शास्त्रशुद्ध नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शासनातर्फे 1 ते 7 जुलै या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवड संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात  आयोजित विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त महेश झगडे, नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामराव,अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक प्रविण श्रीवास्तव,  अपर आयुक्त ज्योतिबा पाटील आदी उपस्थित होते.

श्री मुनगंटीवार म्हणाले, ग्रामपंचायतींना वृक्षरोपणाचा लाभ व्हावा यासाठी 156 प्रकारच्या प्रजातींची  माहिती त्यांना देण्यात आली आहे आणि रोपेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत 3 कोटी 18 लक्ष वृक्ष लागवडीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी वसुंधरा रक्षणाचे कार्य म्हणून या उपक्रमाकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, वृक्षारोपण उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाची भावना जनतेच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. वृक्ष तोडणाऱ्या हातांपेक्षा वृक्ष लावणारे हात वाढवायचे आहेत. मानवी अस्तित्वासाठी वसुंधरेचे शोषण थांबविण्याची  अत्यंत गरज असून  त्यासाठी वृक्षवेड्या नागरिकांची  संख्या वाढविण्याची गरज आहे. वनाकडे केवळ पर्यावरण  रक्षणाच्या दृष्टीने  न पहाता  रोजगार आणि उत्पन्नाचे साधन म्हणून देखील  पहावयास हवे,  असे मत त्यांनी व्यक्त केले.


वनविभागाने 448 पुस्तिकांच्या माध्यमातून वनाचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. 80 प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून  वनसंवर्धन आणि संरक्षण करण्यात येत आहे. शासनाच्या या प्रयत्नात नागरिक  आणि सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे आणि कल्पकतेने उपक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
'फॉरेस्ट' या शब्दातच फुड, ऑक्सिजन, रेन, एनर्जी, सॉईल आणि टिक असे जीवनाशी  संबधीत सर्व घटक समाविष्ट असल्याने पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर वनाचे महत्व ओळखण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त कले. पुढील वर्षी 1 जुलैपर्यंत हरितसेनेच्या माध्यामातून वृक्षारोपणात सहभाग घेणाऱ्या एक कोटी स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

श्री. खारगे म्हणाले, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वन आवश्यक आहे. राज्यात हे प्रमाण 20 टक्के आहे. पर्यावरण संतुलनासाठी हे प्रमाण वाढणे आवश्यक असून सर्व घटकांना यात सहभागी करून घेतल्यास ते शक्य होईल. म्हणूनच शासनाने या कामाला  जनआंदोलनाचे स्वरूप देवून 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी 2 कोटीचे उद्दीष्ट असतांना 2 कोटी 82 लक्ष वृक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे चांगली वातवरण निर्मिती झाल्याने यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. अधिक वृक्षलागवडीसाठीलँन्ड बँकतयार करण्याचा विविध यंत्रणांनी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त झगडे म्हणाले, गतवर्षी विभागात उद्दीष्टापेक्षा जास्त वृक्ष लावण्यात आले आहेत. यावर्षीदेखील अशाच प्रकारची कामगिरी सर्व विभाग करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वृक्षाच्या उपयुक्त प्रकारांची लागवड, वृक्षारोपणाचा पर्यावरणावर होणाऱ्या बदलांचा अभ्यास आणि नागरिकांसाठी हा प्राधान्याचा उपक्रम व्हावा यासाठी प्रयत्न अशा विविध स्तरावर या उपक्रमाचा विचार करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
प्रास्ताविकात रामराव यांनी नाशिक विभागाचे उद्दीष्ट 76 लाख वृक्ष लागवडीचे असतांना एक कोटीपेक्षा जास्त लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत 79 लाख खड्डे खोदण्यात आले आहे. विभागातील 340 रोपवाटीकांमध्ये 4 कोटी 22 लक्ष रोपे उपलब्ध आहेत. हरितसेनेच्या माध्यमातून वृक्षारोपणला चालना देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी विभागातील जिल्हाधिकारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी केलेल्या तयारीची माहिती दिली . गतवर्षी राज्यात सर्वाधिक वृक्षलागवड  नाशिक जिल्ह्यात 29 लक्ष 29 हजार एवढी झाली असून बहुतांशी झाडे जगविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी दिली. उद्योग संस्थांच्या सहाय्याने मोकळ्या डोंगरांवर वृक्षारोपण करण्यात येणार  असल्याचे ते म्हणाले.

वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्याने तयार केलेल्या वृक्षलागवड कार्यक्रम पुस्तिकेचे आणि नाशिक जिल्हा वन विभागाने केलेल्या वृक्षारोपण नियेाजन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
बैठकीला जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षा उल्वला पाटील, आमदार सुरेश भोये, उदयसिंह पाडवी, राजाभाऊ वाजे, डॉ.राहुल आहेर, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात वनाचे  आच्छादन वाढविण्यासाठी सन 2016 च्या पावसाळ्यात दिनांक 1 जुलै  2016 रोजी वनविभाग, ग्रामपंचायत, इतर शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था व सर्व नागरिकांच्या माध्यमातून वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करून 2 कोटी 82 लक्ष वृक्ष लागवड एकाच दिवशी करण्यात आली होती. त्यापैकी नाशिक महसूल विभागात एकूण 80 लक्ष 28 हजार रोपे लागवड करण्यात आली होती. वनविभागामार्फत लागवड करण्यात आलेल्या 67 लक्ष 42 हजार रोपांपैकी  90 टक्के हून अधिक जिवंत रोपांची टक्केवारी आहे. तसेच ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणेमार्फत लागवड करण्यात आलेल्या 12 लक्ष 86 हजार रोपांपैकी 75 टक्के हून अधिक जिवंत रोपांची टक्केवारी आहे.
यापुढील 3 वर्षात सन 2017, 2018 व 2019 या पावसाळ्यात एकूण 50 कोटी वृक्षलागवड करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने नियोजन केले आहे. यामध्ये सन 2017 च्या पावसाळ्यात 4 कोटी,  सन 2018 च्या पावसाळ्यात 13 कोटी व सन 2019 च्या पावसाळ्यात 33 कोटी असे एकूण 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केलेले आहे. एकूण 50 कोटीपैकी 28 कोटी 50 लक्ष वनविभागामार्फत, 12 कोटी ग्रामपंचायतमार्फत व 9 कोटी 50  लक्ष इतर शासकीय यंत्रणेमार्फत वृक्ष लागवड करण्याचे ठरविले आहे.
सन 2017 च्या पावसाळ्यात दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2017 पर्यंत महाराष्ट्र राज्यात करावयाच्या एकूण 4 कोटी वृक्ष लागवडीपैकी नाशिक महसूल विभागातील एकूण 5 जिल्ह्यात  80 लक्ष 34 हजार  वनविभागामार्फत, 19 लक्ष 16 हजार  ग्रामपंचायतमार्फत व 9 लक्ष 50 हजार  इतर शासकीय यंत्रणेमार्फत असे एकूण एक  कोटी 9 लक्ष  वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
रोपे लागवडीसाठी एकूण 16 हजार 41 स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने 94 लक्ष  खड्डे खोदून तयार आहेत व उर्वरित खड्डे खोदण्याचे काम प्रगती पथावर आहे.

-----

No comments:

Post a Comment