Monday 31 December 2018

गोवर रुबेला लसीकरण


 प्रत्येक मुल गोवर रुबेलापासून संरक्षित व्हावे- डॉ.दीपक सावंत

          नाशिक, दि.31 : मालेगाव शहरातील प्रत्येक मुल गोवर रुबेलापासून संरक्षित होणे गरजेचे असून त्यादृष्टीने जनप्रबोधन करण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी सहकार्य करावे , असे आवाहन सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.
          मालेगाव येथे मौलवी यांचेसोबत जतेतुर उल्माच्या कार्यालयात आयोजित गोवर रुबेला लसीकरणाबाबत चर्चेदरम्यान ते बोलत होते. यावेळी आरोग्य संचालक डॉ.संजीव कांबळे, उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ.किशोर डांगे, अब्दुल हमीद जमाली, आदी उपस्थित होते.

          डॉ.सावंत म्हणाले, पोलिओप्रमाणे गोवर रुबेलाचे उच्चाटन करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मुस्लीम समाजातील नागरिकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करून मोहिम पुर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागृतीवर विशेष भर देण्यात येईल.
गोवर रुबेला लसीकरण मुस्लीम देशांसह जगातील 149 देशात झाले असून ते पुर्णत: सुरक्षित आहे. लसीकरणाबाबत  नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. शंका असल्यास आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन आपल्या 9 महिने ते 15 वर्षाच्या मुलांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
          मालेगाव शहरातील वैद्यकीय सुविधांची गरज लक्षात घेता आणखी एक रुग्णालय देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही डॉ.सावंत म्हणाले. त्यांनी मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींशी आणि मौलवी यांचेशी लसीसकरणाबाबत चर्चा केली.
                                                  000000

उमराणे ग्रामीण रुग्णालय


ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार-डॉ.दीपक सावंत

नाशिक, दि.31 :  उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिक्षकासह स्त्रीरोग तज्ज्ञ, भुलतज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञाची पदे लवकरच भरण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली.           
उमराणे येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.राहुल आहेर, आरोग्य संचालक डॉ.संजीव कांबळे, उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, सरपंच लताबाई देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंतराव शिरसाठ, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, प्रशांत देवरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.दीपक पवार आदी उपस्थित होते.

डॉ.सावंत म्हणाले, ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्टर तयार होत नाही. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. एनएचएमच्या माध्यमातून 2 लाखापर्यंत पगार देण्याची तसेच कामगिरीवर आधारीत मानधन देण्याचीदेखील तयारी आहे. त्यामुळे डॉक्टरांनी ग्रामीण भागात सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

येत्या काही दिवसात 108 रुग्णवाहिकेचा मार्ग बदलण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. बालमृत्युदर कमी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, बालकाला संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही डॉ.सावंत म्हणाले.
रुग्णालयाच्या रुपाने उमराणे गावाला नववर्षाची चांगली भेट मिळाली असून नव्या इमारतीचा परिसरातील नागरिकांना चांगला उपयोग होईल, असे डॉ.आहेर म्हणाले.

प्रास्ताविकात डॉ.जगदाळे यांनी  ग्रामीण रुग्णालय इमारतीतील सुविधांची माहिती दिली. रुग्णालय 30 बेडचे असून त्यात प्रस्तुतीकक्ष, बालोपचार, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया आदी सुविधा आहेत.
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम माहितीपत्रकाचे अनावरण मंत्रीमहोदयांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
0000

देवपूर आरोग्य केंद्र


 रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा द्यावी- डॉ.दीपक सावंत

          नाशिक, दि.31 : प्राथमिक आरोग्य केंद्रात नुतन इमारत सर्व सुविधांनी युक्त असून या वास्तूच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा द्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.

          सिन्नर तालुक्यात देवपूर येथील आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, आरोग्य संचालक डॉ.संजीव कांबळे, उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, पंचायत समिती सभापती भगवान पथवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, सरपंच योगीता गडाख आदी उपस्थित होते.

          डॉ.सावंत म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती  रुग्णांच्यादृष्टीने सुविधाजनक असाव्यात यासाठी इमारतींचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना इमारतीत आल्यावर चांगला अनुभव यावा असे प्रयत्न आहेत. सिन्नर येथे रुग्णालयाची  सुसज्ज इमारत उभी राहत आहे, रुग्णालयाच्या वास्तू चांगल्या रहाव्यात यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

          प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल, तसेच देवपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निश्चितपणे विचार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तत्पूर्वी मंत्री महोदयांच्या हस्ते सामाजिक सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले.


डुबेरे येथे विकासकामांचे भूमीपूजन

       डॉ.सावंत यांच्या हस्ते डुबेरे येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमीपुजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते सटुआई मंदीर भक्तनिवास, गाव अंतर्गत रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण, एक लाख ‍लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि स्मशानभूमी शेड बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

Sunday 30 December 2018

नाईट रन


तंबाखूमुक्तीचा संदेश देण्यासाठी धावले नाशिककर

नाशिक, दि.30:- नववर्षात तंबाखूमुक्त शहर करण्याचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस, आरोग्य विभाग आणि एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित नाईट रनमध्ये मोठ्या संख्येने नाशिकर आबालवृद्ध सहभागी झाले.
पोलीस कवायत मैदान येथे महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाईट रनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, डॉ.राम नगरकर आदी उपस्थित होते.

उपक्रमास शुभेच्छा देताना श्रीमती भानसी यांनी शहर पोलिसांतर्फे नववर्षाच्या सुरुवातीला चांगला उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. व्यसनापासून दूर राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री.सिंगल यांनी नव्या पिढीला व्यवसनापासून मुक्त ठेवण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. तंबाखू ऐवजी जीवनसत्वयुक्त पदार्थांचे सेवन करावे आणि तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे, असे आवाहन त्यांनी केल. नव्या वर्षात तंबाखूमुक्त शहर करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तालय, गंगापूर रोड, विद्या विकास सर्कल, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड मार्गे पोलीस कवायत मैदान येथे या दौडचा समारोप झाला. नाईट रन पुर्ण करणाऱ्या नागरिकांना मेडल देण्यात आले. तंबाखू सेवन सोडणाऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सहभागी नागरिकांसाठी आरोग्य सुविधा करण्यात आली होती. थंडी असूनही नागरिक उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले. यावेळी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्याची आणि  सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 च्या अंमलबजावणीत सहकार्य करण्याची शपथ घेण्यात आली.     0000

Saturday 29 December 2018

प्रेरणा पुरस्कार


उन्नत शेतीसाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करा-महादेव जानकर

नाशिक, दि. 29:- शेतकऱ्यांनी उन्नत शेतीसाठी जगातील नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि त्यासाठी आवश्यक शिक्षण-प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास  आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
          रावसाहेब थोरात सभागृह येथे आमची माती आमची माणस कृषी मासिकातर्फे आयोजित कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार किशोर दराडे, मंगेश देशमुख, प्रा.संजय जाधव, जयराम पुरकर, सदूभाऊ शेळके आदी उपस्थित होते.

          श्री.जानकर म्हणाले, शेती व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी कौशल्य, संशोधन, सिंचन, बियाणे आणि खते, शीतगृहाची व्यवस्था, विपणन प्रक्रीयेचे ज्ञान आणि नवे तंत्रज्ञान आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शेतीविषयी योग्य माहिती प्राप्त करून आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे वळायला हवे. त्यासाठी मुलांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे.

          शासनाने शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार, चारायुक्त शिवार अशा विविध चांगल्या योजना राबविल्या आहेत. दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचा निर्णय घेतल्यामुळे चार लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. कांदा प्रक्रीयेसाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.

शासनाने विपणन साखळीतील मध्यस्थ टाळण्यासाठी व शेतकऱ्याच्या फायद्यासाठी संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार योजना सुरू केली आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आठवडे बाजाराला जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो आहे.

 पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागासाठीच्या तरतूदीत भरीव वाढ करून ही तरतूद 18 हजार कोटींपर्यंत नेली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.पंजाबराव देशमुखांचे कृषी क्षेत्रातील कार्य पुढे नेण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे श्री.जानकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुलात क्षमता असून त्याला शिक्षणाची जोड देऊन विविध क्षेत्रात यश मिळावावे,असे आवाहन त्यांनी केले.

श्री.जानकर यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले, तसेच आमची माती आमची माणसं मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
-----

Friday 28 December 2018

व्यक्तिमत विकास


नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2018
व्यक्तीमत्व विकासासाठी तणावमुक्त जगणे आवश्यक-विवेक गायकवाड

नाशिक, दि. 28:- सभोवतालच्या पर्यावरणाचा परिणाम मानवी आयुष्यावर होत असून व्यक्तीमत्व विकासासाठी तणामुक्त जगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.
मु.शं. औरंगाबाद सभागृहात नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2018 समारोपप्रसंगी ‘व्यक्तिमत विकास’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाला निवृत्त न्यायाधीश प्रकाश मोरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते.
श्री. गायकवाड, म्हणाले, माणसाला आपल्या व्यक्तिमत्वाचा बाह्य विकासासोबतच आंतरिक विकास आवश्यक आहे. स्वत:ला आहे तसे स्वीकारुन व स्वत:च्या विकासाचा मार्ग निवडा. स्वत:ला घडवत असतांना दुसऱ्याच्या आयुष्याचा अभ्यास करण्याच सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. तसेच आयुष्यात येणारी प्रत्येक संधी शेवटची आहे असे समजून काम करावे असेही ते यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगले ग्रंथांचे व गोष्टींचे जतन करावे . आयुष्यात महत्वाकांक्षी राहून आत्मविश्वासाने कार्य केल्याश यशस्वी होता येते. जीवनावर स्वत:चे नियंत्रण ठेवावे, असेही ते यावेळी म्हणाले.----

ध्वजदिन निधी संकलन


सामाजिक जाणिवेतून ध्वजदिन निधी संकलनासाठी पुढे या-जिल्हाधिकारी

      नाशिक दि.28- देशासाठी अहोरात्र लढणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी समजून व सामाजिक जाणिवेतून ध्वजदिन निधी संकलनासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे आयोजित ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा मुद्रांक अधिकारी अनिल पारखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) कॅप्टन विद्या रत्नपारखी  उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन म्हणाले, देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता आपल्या कुटुंबापासुन दूर रहात  देशाचे संरक्षण करतात. त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी ध्वजनिधी संकलनात प्रत्येकाने सहकार्य करावे.  अधिकारी-कर्मचाऱ्यांनीदेखील माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्याबाबत संवेदनशिलतेने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

भारत-पाक युद्ध, भारत-चीन युद्ध किंवा अन्य खास मोहिमेत वीर मरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने 25 लाख किंवा 5 एकर जमीन देण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. त्याबाबतची माहिती घेवून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशाच्या संरक्षणात आणि एकूण विकासात सैनिकांची महत्वाची भूमीका  असल्याने ध्वजनिधी संकलन उद्देशपुर्तीसाठी न करता सामाजिक जाणिवेतून करावे, असे आवाहन श्री.दराडे यांनी केले.

प्रास्ताविकात श्रीमती रत्नपारखी यांनी गतवर्षी ध्वजनिधी संकलनाचे 94 टक्के काम झाले असल्याचे सांगितले.
यावेळी  माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा दहा हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ध्वजदिन निधी संकलनात चांगली कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचादेखील सत्कार करण्यात आला.
                               ************

ग्रंथयात्रेचे उद्घाटन


नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2018
माणसाला दिला जाणारा चिरकाल विचार म्हणजे म.गांधी
                                                                 -उत्तम कांबळे

नाशिक, दि. 28:- महात्मा गांधी म्हणजे सामाजिक जीवनातील संकुचित विचार बाजूला सारून समाजाला व्यापक अशा बंधुत्वाकडे नेण्यासाठी माणसाला दिला जाणारा चिरकाल विचार आहे. तो नवनिर्माणाचा विषय होता आणि यापुढेही राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.
मु.शं. औरंगाबाद सभागृहात नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2018 अंतर्गत ‘महात्मा गांधी यांचे जीवन व कार्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाला राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश  चौधरी, जिल्हा कोषागर अधिकारी विलास गांगुर्डे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, पंडीतराव आवारे, दत्ता पगार, श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते.

श्री.कांबळे म्हणाले, गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीला व्यापक स्वरुप दिले. त्यांच्या कार्यामुळे साक्षर वर्गापूरती मर्यादीत असलेल्या या चळवळीत लाखोंच्या संख्येने सामान्य माणसे सहभागी झाली व तीला जनआंदोलनाचे रुप प्राप्त झाले. त्यांनी अहिंसा या सामर्थ्यशाली शस्त्राच्या सहाय्याने या चळवळीला पुढे नेले.

माणसातील भेद कमी करण्यासाठी जाती निर्मुलन आणि हरीजन उद्धाराची चळवळ महात्मा गांधीनी सुरू केली. त्यांनी स्वावलंबी माणूस घडविण्यासाठी शिक्षणाचा विचार केला. राष्ट्रीय शाळांची निर्मिती केली. त्यांनी विज्ञानाला विरोध केला नसला तरी माणसाचा चरितार्थ हिरावणारे विज्ञान त्यांना नको होते. त्यांचे सत्याचे प्रयोग सुंदर होते, तर त्यांचे व्यक्तिगत जीवन चिकीत्सा आणि चिंतनातून आले असल्याने गांधी विचार जगणे आज कठीण आहे, असे त्यांनी सांगितले.

माणसाच्या जीवनाला तात्वीक आणि मूल्याधिष्ठीत दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे गांधी असे नमूद करून ते म्हणाले, गांधीजींनी अंतरमन व पर्यावरण अशा दोन्ही बाजूंनी स्वच्छतेचा विचार केला. स्वच्छतेचा संबंध मुल्यांशी जोडत अहंकारमुक्त समाजासाठी स्वच्छता हे तत्व रुजविण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

जगात जे साधे आहे ते सामर्थ्यशाली, जे सामर्थ्यशाली तेच सुंदर आणि जे सुंदर आहे तेच जग जिंकू शकते हे महात्मा गांधींनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. आपल्या आयुष्याचे रुपांतर देशात आणि जीवनाचे रुपांतर समाजात करून त्यांनी स्वत:साठी काहीच ठेवले नाही. म्हणून त्यांना बिहारमधील साध्या शेतकऱ्याने ‘महात्मा’ तर सुभाषचंद्र बोस यांनी 1944 मध्ये सिंगापूर रेडीओवरील भाषणात ‘राष्ट्रपीता’ ही उपाधी दिली, असे मत त्यांनी व्यक्त केले. शस्त्र विरुद्ध सत्य आणि अहिंसा हे गांधीजींचे जीवनतत्व असल्याचे श्री.कांबळे म्हणाले.
ग्रंथयात्रेचे उद्घाटन

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालातर्फे आयोजित ग्रंथजत्रा उपक्रमाचे उद्घाटन श्री.कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री.वाघ म्हणाले, देशातील 46 हजार 761 सार्वजनिक ग्रंथालयापैकी 12 हजार 191 ग्रंथालये महाराष्ट्रात आहेत. राज्यात ही चळवळ चांगली रुजली आहे. ग्रंथजत्रेतून ग्रंथ खरेदी करून ग्रंथालयांनी वाचकांना लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रंथालय चालक, सेवक, कार्यकर्ता यांन वाचन चळवळ पुढे नेण्यात मोलाचे योगदान दिले असल्याचे श्री.गांगुर्डे म्हणाले. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना या चळवळीमुळे लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
----

Thursday 27 December 2018

जिल्हा ग्रंथोत्सव 2018

नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2018
नाशिककर रसिकरंगले काव्यात

नाशिक, दि. 27:- अडगुळं मडगुळंपासून गीत रामायणापर्यंतच्या विविध काव्यप्रकाराच्या वर्षावात नाशिककर रसिक रंगले आणि चिंब झाले. विसूभाऊ बापट यांच्याकुटुंब रंगलंय काव्यातया एकपात्री नाट्यानुभाद्वारे श्रोत्यांनी खरा काव्यानंद लुटला.

कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती वंदनेने झाली. उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण अविष्कार अशी काव्याची सुंदर व्याख्या मांडत विसूभाऊंनी मराठी कवितेतील भावना, उत्कटता आणि सौंदर्य विविध कवितांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवले. प्रा. मो.. देशमुख यांच्याउन उन खिचडीसारख्या कवितेद्वारे कवितेचे नाजूक पैलू मांडले.

बाबा आमटे, . दि. माडगूळकर, बहिणाबाई चौधरी, यशवंत देव, गोविंदस्वामी आफळे, प्र. के. अत्रे, मंगेश पाडगावकर, जगदीश खेबूडकर यांच्यासारख्या कवी-गीतकारांपासून अलिकडच्या काळातील नवकवींच्या कविता त्यांनी सादर केल्या.
आज मरूनिया जीव झाला मोकळाअशा कवितेतून शेतकऱ्यांच्या वेदना प्रकट झाल्या, तरजा बाई आई सांगू नको बाई, मला पावसाच्या धारांशी खेळायची घाईया गीतातून बालसुलभ भावना अलगतपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या. ‘सखी स्वस्त झाल्या खारका' सारख्या विडंबन गितांनी श्रोत्यांना खळखळून हसविले, तरविसरून गेला का सत्तावनअशा ओळींनी देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले.

मराठी श्रेष्ठतम भाषा असून हे वैभव टिकविण्याचे आणि आपली संस्कृती जपण्याचे आवाहन विसूभाऊंनी कार्यक्रमातून केले. मातृभाषा समृद्ध असून या भाषेत बोलण्याचा अभिमान बाळगा, असे आवाहन त्यांनी केले.

विसूभाऊंनी वात्रटीका, लोचटीका, मुक्तछंद, बालगीते, विडंबन, लावणी, देशभक्तीपर गीते, अभंग, भक्तीगीते, भावगीते असे विविध प्रकार सादर केले. बालगीतांचे बारा प्रकार आणि लावणीच्या विविध प्रकारांची माहिती त्यांनी दिली. त्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. ओंकार वैरागकर यांनी त्यांना तबल्याची साथ केली. कार्यक्रमाची सांगता साने गुरुजींच्याबल सागर भारत होवोया गीताने झाली.
0000