Sunday 9 December 2018

सोलर ड्रायर उद्घाटन


कांदा सोलर ड्रायरचे माविम अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक दि.9- महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या हस्ते लासलगाव येथे कांदा व भाजीपाला सोलर ड्रायर उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माविमचे विभागीय संनियंत्रण  व मूल्यमापन अधिकारी संदीप मराठे, जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना श्रीमती ठाकरे म्हणाल्या, सोलर ड्रायरसाठी आवश्यक भाजी बचत गटातील शेतकरी  महिलांकडून घेण्यात यावी. सोलर ड्रायरच्या माध्यमातून बचत गटांनी भाज्यांची पावडर तयार करण्यास प्राधान्य द्यावे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महामंडळामार्फत उत्पादनाला बाजार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सोलर ड्रायरची माहिती बचत गटांना देऊन अधिकाधीक क्षमतेचे सोलर ड्रायर बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

 महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत गौलमी लोक संचलित साधन केंद्र निफाड आणि तनिष्का ग्रुप लासलगावच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रामचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी श्रीमती ठाकरे यांच्या हस्ते निफाड तालुक्यातील रानवड येथे पशुखाद्य निर्मिती व विक्री युनिटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांनी शेळीपालन करणाऱ्या गटाच्या सदस्यांशी चर्चा केली.

गौतमी लोकसंचलित साधन केंद्र येथे त्यांनी केंद्राचे सदस्य आणि गावप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. बैठकीत बचत गटाच्या महिलांनी आपले अनुभव मांडले. माविम अंतर्गत बचत गटांची कर्ज परतफेड 98 टक्क्यापर्यंत असल्याबद्दल यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले. श्रीमती ठाकरे यांच्या हस्ते महिलांना परसबाग बियाणांचे वाटप करण्यात आले व उद्योग व्यवसायाची माहिती यावेळी देण्यात आली.
----

No comments:

Post a Comment