Monday 31 December 2018

उमराणे ग्रामीण रुग्णालय


ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार-डॉ.दीपक सावंत

नाशिक, दि.31 :  उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिक्षकासह स्त्रीरोग तज्ज्ञ, भुलतज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञाची पदे लवकरच भरण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली.           
उमराणे येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.राहुल आहेर, आरोग्य संचालक डॉ.संजीव कांबळे, उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, सरपंच लताबाई देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंतराव शिरसाठ, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, प्रशांत देवरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.दीपक पवार आदी उपस्थित होते.

डॉ.सावंत म्हणाले, ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्टर तयार होत नाही. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. एनएचएमच्या माध्यमातून 2 लाखापर्यंत पगार देण्याची तसेच कामगिरीवर आधारीत मानधन देण्याचीदेखील तयारी आहे. त्यामुळे डॉक्टरांनी ग्रामीण भागात सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

येत्या काही दिवसात 108 रुग्णवाहिकेचा मार्ग बदलण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. बालमृत्युदर कमी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, बालकाला संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही डॉ.सावंत म्हणाले.
रुग्णालयाच्या रुपाने उमराणे गावाला नववर्षाची चांगली भेट मिळाली असून नव्या इमारतीचा परिसरातील नागरिकांना चांगला उपयोग होईल, असे डॉ.आहेर म्हणाले.

प्रास्ताविकात डॉ.जगदाळे यांनी  ग्रामीण रुग्णालय इमारतीतील सुविधांची माहिती दिली. रुग्णालय 30 बेडचे असून त्यात प्रस्तुतीकक्ष, बालोपचार, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया आदी सुविधा आहेत.
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम माहितीपत्रकाचे अनावरण मंत्रीमहोदयांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
0000

No comments:

Post a Comment