Saturday 8 December 2018

सोलर पंपमुळे स्थलांतर थांबले


सोलर पंपमुळे दुर्गम भागातील शेतकऱ्याचे स्थलांतर थांबले

नाशिक दि.8- सुरगाणा तालुक्यात  पोहाळी या आदीवासी गावातील  भास्कर गावीत यांना सौर कृषी पंपाच्या माध्यमातून रब्बीचे पीक घेणे शक्य झाल्याने मजूरीसाठी पिंपळगावला होणारे स्थलांतर थांबले असून उत्पन्नातही वाढ झाली आहे.
भास्कर यांच्या दीड एकर क्षेत्रात पूर्वी केवळ भातपीक होत असे. चार-पाच पोते भात विकून हातात येईल तेवढ्या रकमेवर कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नव्हता. त्यामुळे खरीप हंगामानंतर पिंपळगाव येथे मजूरीसाठी दरवर्षी जाणे होत असे.

शेतात विंधन विहीरीची सुविधा केल्यानंतरही वीज कनेक्शन मिळणे कठीण असल्याने सिंचनासाठी त्याचा उपयोग होत नव्हता. एक किलोमीटर अंतरावर असलेल्या 11 केव्ही उच्च विद्युत दाब वाहिनीला कमी दाबाच्या वाहिनीत बदलण्यासाठी ट्रान्सफार्मर बसविणे आवश्यक होते. केवळ एका जोडणीसाठी नवी वाहिनी टाकणे शक्य नव्हते. भविष्यात वीज जोडणी मिळणे शक्य नसल्याने खरीपावर अवलंबून असल्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता.
अशात शासनाच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 3 हॉर्सपॉवरचा पंपासाठी त्यांना अनुदान मिळाले. केवळ प्रस्तावासाठी 16 हजार 200 रुपये खर्च करावे लागले. सौर पंप मंजूर झाल्याने त्यांनी विंधन विहीरीच्या सहाय्याने  शेतात सिंचन सुविधा करून घेतली.
पाणी उपलब्ध झाल्याने खरीपानंतरही दुसरे पीक घेणे भास्कर यांना शक्य झाले. टमाटे, गहू, हरभरा अशी पिके ते  घेऊ लागले. वर्षाला एक लाख उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आता शेतकाम सांभाळून जवळच्या गावात मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते सांभाळू शकतात. मुलांच्या गरजा  चांगल्यारितीने पुर्ण करताय येत असल्याचे समाधान त्यांना आहे.                    
00000

No comments:

Post a Comment