Saturday 8 December 2018

गोधनपानी डोंगर यात्रा


तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाचे सहकार्य-दादाजी भुसे

नाशिक दि.8- आदिवासी समाजाचे  श्रद्धास्थान असणाऱ्या कन्सरा माऊली आणि उन्हादेव यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देत या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

कळवण तालुक्यातील मौजे जामले (दळवट) गोधनपानी डोंगर येथे सभामंडप उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार जीवा पांडु गावीत, काशिनाथ बहिरम, नगराध्यक्ष मयुर बहिरम, पं.स.सभापती काशिनाथ गायकवाड, सरपंच एकनाथ बागुल आदी उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले, उत्सवाच्या निमित्ताने संस्कृती जोपासली जाते आणि विचारांची देवाणघेवाण होत असते. चांगल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासोबत मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढीचा विकास होईल, असे त्यांनी सांगितले. आदिवासी भागात काही ठिकाणी टंचाईसदृश्य परिस्थिती असल्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असेही श्री.भुसे म्हणाले.
संस्कृतीची जोपासना करताना विद्यार्थांनी शासनाच्या सुविधा आणि योजनांचा लाभ घेऊन शैक्षणिक प्रगती करावी, असे आवाहन आमदार गावीत यांनी केले.
यावेळी भायांचे आणि पावरी नृत्य सादर करण्यात आले.
----

No comments:

Post a Comment