Monday 3 December 2018

जागतिक अपंग दिन

समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी ओळख गरजेची-जिल्हाधिकारी

           नाशिक दि.3- लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील सर्व घटकांसोबत  दिव्यांग व्यक्तिचे स्थानदेखील महत्वाचे आहे. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची ओळख निर्माण करणे हे समाजाचे कर्तव्य असून निवडणूक आयोगाच्यावतीने सुलभ निवडणूकच्या माध्यमातून त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.

पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक भवन येथे भारत निवडणूक आयोगाच्यावतीने तसेच जिल्हा निवडणूक कार्यालय, नाशिक महानगरपालिका आणि  जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक अपंग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार शिवकुमार आवळकंठे, निवडणूक विभागाचे तहसिलदार गणेश राठोड, अभिलाषा देवगुणे, दत्तू बोडके, अनिल भडांगे आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी म्हणाले, दिव्याग व्यक्ती कलाकौशल्यात निपूण असतात. त्यांचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न सर्व स्तरातून होणे आवश्यक आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत दिव्यांग व्यक्तींना मतदानाचा अधिकार अधिक सुलभतेने बजावता यावा यासाठी प्रशासनातर्फे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.मंगरुळे यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ निवडणूक व्यवस्थेची माहिती दिली. दिव्यांग मतदारांसाठी ब्रेल लिपी व विविध तंत्रज्ञानाचा  उपयोग करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी दिव्यांग व्यक्तींचे बॅच लावून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. श्री.राधाकृष्णन यांनी यावेळी दिव्यांग नागरिकांमध्ये बसून त्यांच्याशी संवाद साधला.
                                ----

No comments:

Post a Comment