Thursday 27 December 2018

नाशिक ग्रंथोत्सव


नाशिक ग्रंथोत्सवाचे शानदार उद्घाटन
ग्रामीण भागात ग्रंथालय आणि अभ्यासिका  सुरू करा-रंजना भानसी


नाशिक, दि. 27:- लोकप्रतिनिधी आणि ग्रंथालय चळवळीतील व्यक्तिंनी एकत्र प्रयत्न करून ग्रामीण भागात ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू कराव्यात, असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले.
मु.शं.औरंगाबाद सभागृह येथे राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व   जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्यावतीने आयोजित नाशिक ग्रंथोत्सव - 2018’ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.  कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.राम कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय संघाचे दत्ता पगार, शिक्षणाधिकारी आर.पी.पाटील, श्रीकांत बेणी, उन्मेश गायधनी, वसंत खैरनार, संजय करंजकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, प्राचार्या गिता बाफना आदी उपस्थित होते.

श्रीमती भानसी म्हणाल्या, ग्रंथालयाचा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होतो. वाचन संस्कृतीच्या प्रसारात ग्रंथालयाची मोलाची भूमीका असते. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून ग्रंथालय आणि अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहेत. ग्रंथालयासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, असे त्यांनी सांगितले. ग्रंथोत्सव हा वाचकांसाठी चांगली पर्वणी असल्याचे त्या म्हणाल्या.

डॉ.कुलकर्णी म्हणाले, माहिती तंत्रज्ञान युगात ज्ञान प्राप्त करण्याच्या माध्यमात बदल होत असला तरी ग्रंथांचे महत्व कायम आहे. पूर्वीच्या काळी मनुष्यबळ, वित्तीय बळ यावर निश्चित होणाऱ्या श्रीमंतीचे आकलन आता ज्ञानाच्या आधारे केले जाते आणि ज्ञानप्राप्ती ग्रंथांच्या माध्यमातून होत असल्याने वाचनसंस्कृती समाजात रुजणे आवश्यक आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून यासाठी आवश्यक पोषक वातावरण तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री.बेणी यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून  लवकरच वाचकांना सुविधा देणारे मोबाईल ॲप आणि लायब्ररी ऑन व्हील हे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

यावेळी लक्ष्मण महाडीक यांनी माझे शब्द ही कविता सादर केली. श्री.खैरनार यांनी ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली. तत्पूर्वी शानदार ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरूवात झाली. ढोल पथक तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

ग्रंथोत्सवात दहा संस्थांची ग्रंथ विक्री दालने आहेत. 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ग्रंथप्रदर्शन सुरू राहणार आहे. शासकीय मुद्रणालयाच्या माध्यमातून विविध कोष वाङ्मय, संदर्भ ग्रंथ, प्रशासकीय कामकाजासाठी उपयुक्त ग्रंथ, मराठी विश्वकोष आदी उपयुक्त ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
0000

No comments:

Post a Comment