Friday 28 December 2018

ग्रंथयात्रेचे उद्घाटन


नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2018
माणसाला दिला जाणारा चिरकाल विचार म्हणजे म.गांधी
                                                                 -उत्तम कांबळे

नाशिक, दि. 28:- महात्मा गांधी म्हणजे सामाजिक जीवनातील संकुचित विचार बाजूला सारून समाजाला व्यापक अशा बंधुत्वाकडे नेण्यासाठी माणसाला दिला जाणारा चिरकाल विचार आहे. तो नवनिर्माणाचा विषय होता आणि यापुढेही राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.
मु.शं. औरंगाबाद सभागृहात नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2018 अंतर्गत ‘महात्मा गांधी यांचे जीवन व कार्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाला राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश  चौधरी, जिल्हा कोषागर अधिकारी विलास गांगुर्डे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, पंडीतराव आवारे, दत्ता पगार, श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते.

श्री.कांबळे म्हणाले, गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीला व्यापक स्वरुप दिले. त्यांच्या कार्यामुळे साक्षर वर्गापूरती मर्यादीत असलेल्या या चळवळीत लाखोंच्या संख्येने सामान्य माणसे सहभागी झाली व तीला जनआंदोलनाचे रुप प्राप्त झाले. त्यांनी अहिंसा या सामर्थ्यशाली शस्त्राच्या सहाय्याने या चळवळीला पुढे नेले.

माणसातील भेद कमी करण्यासाठी जाती निर्मुलन आणि हरीजन उद्धाराची चळवळ महात्मा गांधीनी सुरू केली. त्यांनी स्वावलंबी माणूस घडविण्यासाठी शिक्षणाचा विचार केला. राष्ट्रीय शाळांची निर्मिती केली. त्यांनी विज्ञानाला विरोध केला नसला तरी माणसाचा चरितार्थ हिरावणारे विज्ञान त्यांना नको होते. त्यांचे सत्याचे प्रयोग सुंदर होते, तर त्यांचे व्यक्तिगत जीवन चिकीत्सा आणि चिंतनातून आले असल्याने गांधी विचार जगणे आज कठीण आहे, असे त्यांनी सांगितले.

माणसाच्या जीवनाला तात्वीक आणि मूल्याधिष्ठीत दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे गांधी असे नमूद करून ते म्हणाले, गांधीजींनी अंतरमन व पर्यावरण अशा दोन्ही बाजूंनी स्वच्छतेचा विचार केला. स्वच्छतेचा संबंध मुल्यांशी जोडत अहंकारमुक्त समाजासाठी स्वच्छता हे तत्व रुजविण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

जगात जे साधे आहे ते सामर्थ्यशाली, जे सामर्थ्यशाली तेच सुंदर आणि जे सुंदर आहे तेच जग जिंकू शकते हे महात्मा गांधींनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. आपल्या आयुष्याचे रुपांतर देशात आणि जीवनाचे रुपांतर समाजात करून त्यांनी स्वत:साठी काहीच ठेवले नाही. म्हणून त्यांना बिहारमधील साध्या शेतकऱ्याने ‘महात्मा’ तर सुभाषचंद्र बोस यांनी 1944 मध्ये सिंगापूर रेडीओवरील भाषणात ‘राष्ट्रपीता’ ही उपाधी दिली, असे मत त्यांनी व्यक्त केले. शस्त्र विरुद्ध सत्य आणि अहिंसा हे गांधीजींचे जीवनतत्व असल्याचे श्री.कांबळे म्हणाले.
ग्रंथयात्रेचे उद्घाटन

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालातर्फे आयोजित ग्रंथजत्रा उपक्रमाचे उद्घाटन श्री.कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री.वाघ म्हणाले, देशातील 46 हजार 761 सार्वजनिक ग्रंथालयापैकी 12 हजार 191 ग्रंथालये महाराष्ट्रात आहेत. राज्यात ही चळवळ चांगली रुजली आहे. ग्रंथजत्रेतून ग्रंथ खरेदी करून ग्रंथालयांनी वाचकांना लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रंथालय चालक, सेवक, कार्यकर्ता यांन वाचन चळवळ पुढे नेण्यात मोलाचे योगदान दिले असल्याचे श्री.गांगुर्डे म्हणाले. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना या चळवळीमुळे लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
----

No comments:

Post a Comment