Monday 3 December 2018

भदरचे भाग्य उजळले


सौभाग्य आणि सोलरमुळे भदर गावाचे भाग्य उजळले

नाशिक दि.3- सुरगाणा तालुक्यातील  दुर्गम आदिवासी भदर गावात सौभाग्य योजनेअंतर्गत 60 घरात वीज जोडणी दिल्याने  आणि ग्रामपंचायतीने सौर ऊर्जेचा उपयोग सुरू केल्याने गावाच्या एकूणच विकासावर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
या गावात असलेल्या 145 कुटुंबापैकी पन्नास टक्के कुटुंबांकडे वीज जोडणी नव्हती. काही ठिकाणी धोकादायकरितीने वीज वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरीचे प्रकार घडत. उप कार्यकारी अभियंता अनंत झोले यांनी वरिष्ठ कार्यालाच्या अनुमतीने 200 रुपयात वीज कनेक्शन देण्याचा उपक्रम राबवून काही घरात वीज पोहोचवली. मात्र विद्युतीकरणाला खरी गती सौभाग्य योजना सुरू झाल्यानंतर आली.

वायरमन भगवान हडस यांनी ग्रामसभांमध्ये जावून ग्रामस्थांना योजनेची माहिती दिली आणि त्यांचे प्रबोधन केले. त्याला गावाने चांगला प्रतिसाद दिला. अगदी झोपडीवजा घरातदेखील वीज जोडणी मोफत देण्यात आली.
वीजेअभावी विंचु आणि सर्पदंशाचे प्रकार अनेकदा घडत असल्याचे वयोवृद्ध सारी पवार यांचे म्हणणे आहे. ‘सौभाग्य’मुळे घरात प्रकाश आल्याने आता मात्र रात्रीचे व्यवहार सुरूळीत होऊ लागले आहेत. उर्वरीत 10 ते 15 घरांनादेखील लवकर वीज जोडणी देण्याचा प्रयत्न असल्याचे सरपंच झंपाबाई थोरात यांनी सांगितले.

गावात वीजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आदिवासी विकास योजनेतून विहिरीवर गतवर्षी सोलर पंप बसविण्यात आला आहे. ग्रामपंचायतीला केवळ 10 टक्के निधी द्यावा लागला. त्यामुळे दिवसभरात केव्हाही पाणी देता येते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर सोलर युनिट बसविल्याने  कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतदेखील  वीज उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांना वीजेच्या उपलब्धतेमुळे डिजीटल शिक्षण देणे शक्य झाले आहे.

गावातील पथदिवेदेखील सौर प्रकाशावर चालतात. सौभाग्य योजना आणि सौर ऊर्जेमुळे गावाचे व्यवहार गतीमान झाल्याचे गावाला भेट दिल्यानंतर लक्षात येते. वीजेच्या उपलब्धतेमुळे पुढच्या पिढीचे भविष्य उज्वल बनेल असा विश्वास ग्रामस्थांना आहे.
विमल वाघमारे- इतर गावात फिरताना आपल्याकडे वीज नाही याची खंत वाटायची. रात्रीच्यावेळी  व्यवहार करणे कठीण होते. आता वीज आल्याने वीजेअभावी आम्हाला अभ्यास करताना  आलेली अडचण पुढच्या पिढीला येणार नाही याचा आनंद आहे.
         
00000


No comments:

Post a Comment