Monday 10 December 2018

दीक्षांत समारंभ


वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करा-राजेश कोटेचा


       नाशिक दि.10 :वैद्यकीय क्षेत्राचा संबंध सामान्य माणसाच्या  आरोग्याशी असल्याने या क्षेत्रातील उच्च गुणवत्तेसाठी विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यापीठ व्यवस्थापनाने एकत्रित प्रयत्न करावे, असे प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 18 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला भारतीय दंत परिषदेचे अध्यक्ष दिबेंदु मुजुमदार, भारतीय केंद्रीय चिकीत्सा परिषदेचे अध्यक्ष जयंत देवपुजारी, आरोग्य संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ.मोहन खामगावर, वैद्य श्रीराम सावरीकर, कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक अजित पाठक आदी उपस्थित होते.

श्री.कोटेचा म्हणाले, सामाजिक आरोग्याचा विचार चिकीत्सा पद्धतीच्या वर जावून करणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यवस्थापनासोबत पूर्वकाळजी, आरोग्य विषयक जागृती, संशोधन या बाबींवरदेखील लक्ष देणे आवश्यक आहे. स्नातकांनी रुग्णांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून संशोधनाचा उपयोग त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी  करावा. केंद्र सरकारने ‘आयुष्यमान भारत’च्या रुपाने जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना सुरू केली असून ती यशस्वी करण्यासाठी स्नातकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पारदर्शक परीक्षा पद्धतीत उच्च मानके स्थापीत केले असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ देशातील उत्तम विद्यापीठापैकी एक असल्याचे नमूद करून श्री.मुजुमदार म्हणाले, विद्यापीठासारखी पारदर्शक परीक्षा पद्धत देशातील कोणत्याच विद्यापीठात नाही. हे विद्यापीठ भविष्यात आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून ओळख प्रस्थापित करीत आंतरराष्ट्रीय विद्यापीठ म्हणून ख्याती मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील 70 टक्के जनतेला आधुनिक चिकीत्सा पद्धतीची माहिती नसून अशा व्यक्तींना सेवा देण्याचे कार्य स्नातकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दीक्षांत समारंभ स्नातकांच्या जीवनातील महत्वाचा पैलू असल्याचे नमूद करीत श्री.देवपुजारी म्हणाले, या  क्षणापासून समाजाला वैद्यकीय सेवा देण्याची संधी प्राप्त होते. वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना ती टिकविण्यासाठी डॉक्टरांना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. सेवा हा वैद्यकीय क्षेत्राचा महत्वाचा कणा असून स्नातकांनी सेवाभावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कुलगुरू डॉ.म्हैसेकर म्हणाले, पदवी ही स्वप्नपूर्तीचे साधन आहे.  देशात जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार अधिक डॉक्टरांची आवश्यकता आहे. समाजाची ही गरज गरज पूर्ण करण्याची जबाबदारी स्नातकांवर आहे. वैयक्तिक यश परिपूर्ण नसून त्याला नाविन्यपूर्ण दृष्टीकोन ठेवून समाजासाठी योगदान देण्याची गरज आहे. ज्ञान बदलासाठी शक्तीशाली साधन असून समाजात अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी स्नातकांनी त्याचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.

प्रति-कुलगुरू डॉ.खामगावर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाचे कार्य आणि उपक्रमांची माहिती दिली. गुणवत्ता वाढ आणि कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्नातकांना पदवी आणि पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. मिरजच्या गुलाबराव पाटील होमिओपॅथी महाविद्यालयाची विद्यार्थीनी अनुजा तुकाराम बंडगर हिने सर्वाधिक 6 तर जेआयआययुचे इंडिअन इन्स्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्सेसच्या खान शिरीन नबीमोहम्मद हिने 4 पारितोषिके मिळविली. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 59 सुवर्णपदके आणि संशाधन पुर्ण केलेल्या 16 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये घेतलेल्या पदवीका/पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण 8 हजार 466 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
दीक्षांत मिरवणूकीने समारंभाची सुरूवात झाली.
         
         
0 0 0


No comments:

Post a Comment