Friday 7 December 2018

प्रधानमंत्री पीक विमा योजना


               
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
                
           नाशिक दि.7 :- शासनाने रबी हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2018 अशी आहे.


अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी 1.5 टक्के तर नगदी पिकांसाठी 5 टक्के विमा हप्ता भरावयाचा आहे.
योजनेअंतर्गत गहू बागायतसाठी विमा संरक्षित रक्कम 34 हजार 600 रुपये, गहू जिरायतसाठी 30 हजार रुपये, हरभरासाठी 23 हजार 100 रुपये, ज्वारी बागायतसाठी 27 हजार 300 रुपये, ज्वारी जिरायतसाठी 25 हजार 200, उन्हाळी भूईमूगसाठी 36 हजार 500 रुपये, आणि रबी कांदासाठी विमा संरक्षित रक्कम 72 हजार 600 रुपये आहे.
पीक विमा संरक्षण बाबीअंतर्गत पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपुर्व किंवा लावणीपुर्व नुकसान, काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती आदींचा समावेश आहे.
           कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँकेमध्ये सादर करावा. तसेच छायाचित्र असलेले बँक खातेपुस्तकाची प्रत आणि आधार कार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिटकार्ड, नरेगा जॉबकार्ड किंवा वाहनचालक परवाना यापेकी कोणतीही एक छायाचित्र ओळपत्र सादर करणे आवश्यक आहे.
रब्बी हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी  बँकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क करावा त्याप्रमाणे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमुद करावे लागणार आहे.
          नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि, बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कं.लि. कॅमरझोन, पहिला मजला, टॉवर 1, समर्थ अशोक मार्ग, येरवडा पुणे 411006 या कंपनीची नेमणुक करण्यात आली आहे.  अधिक  माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 18002095959 आहे.          
शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी हेाण्यासाठी नजीकच्या कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांचे कार्यालय, जवळील बँक  तसेच संबंधीत जनसुविधा केंद्र किंवा ई-गर्व्हरनन्स केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक आर.एस.भताणे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment