Monday 31 December 2018

देवपूर आरोग्य केंद्र


 रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा द्यावी- डॉ.दीपक सावंत

          नाशिक, दि.31 : प्राथमिक आरोग्य केंद्रात नुतन इमारत सर्व सुविधांनी युक्त असून या वास्तूच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा द्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.

          सिन्नर तालुक्यात देवपूर येथील आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, आरोग्य संचालक डॉ.संजीव कांबळे, उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, पंचायत समिती सभापती भगवान पथवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, सरपंच योगीता गडाख आदी उपस्थित होते.

          डॉ.सावंत म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती  रुग्णांच्यादृष्टीने सुविधाजनक असाव्यात यासाठी इमारतींचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना इमारतीत आल्यावर चांगला अनुभव यावा असे प्रयत्न आहेत. सिन्नर येथे रुग्णालयाची  सुसज्ज इमारत उभी राहत आहे, रुग्णालयाच्या वास्तू चांगल्या रहाव्यात यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

          प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल, तसेच देवपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निश्चितपणे विचार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तत्पूर्वी मंत्री महोदयांच्या हस्ते सामाजिक सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले.


डुबेरे येथे विकासकामांचे भूमीपूजन

       डॉ.सावंत यांच्या हस्ते डुबेरे येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमीपुजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते सटुआई मंदीर भक्तनिवास, गाव अंतर्गत रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण, एक लाख ‍लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि स्मशानभूमी शेड बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment