Thursday 27 December 2018

अल्पसंख्याक आयोग


              अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार -हाजी अरफात शेख

नाशिक, दि.27- आयोगाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवून अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे आयोजित अल्पसंख्याक आयोगाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त भागवत सोनवणे, स्वीय सहाय्यक गणेश सुरवसे आदी उपस्थित होते.
          श्री. शेख म्हणाले, आयोगाची भुमिका सर्वांना न्याय देण्याची असून आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना समाजापर्यंत पोहचविण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्याचे लवकरच प्रस्तावित करण्यात येणार आहे. मालेगांव येथे अल्पसंख्याकांसाठी मंजूर झालेल्या तंत्रनिकेतन संस्थेबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येणार  असल्याचे त्यांनी नमूद केले.
          प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमात मालेगांवचा समावेश करण्यासासाठी प्रस्ताव तयार करणे तसेच वक्फबोर्ड व मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळ योजनेच्या माहितीचा फलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर लावण्याची सुचना त्यांनी केली. कौशल्य विकास, पोलिस प्रशिक्षण, पायाभुत योजना, शिक्षण विभागाच्या कामाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
          श्री. शेख यांनी बैठकीपूर्वी जैन, बौध्द, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेवून चर्चा केली.
          बैठकीस सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद व इतर सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*********

No comments:

Post a Comment