Sunday 30 December 2018

नाईट रन


तंबाखूमुक्तीचा संदेश देण्यासाठी धावले नाशिककर

नाशिक, दि.30:- नववर्षात तंबाखूमुक्त शहर करण्याचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस, आरोग्य विभाग आणि एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित नाईट रनमध्ये मोठ्या संख्येने नाशिकर आबालवृद्ध सहभागी झाले.
पोलीस कवायत मैदान येथे महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाईट रनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, डॉ.राम नगरकर आदी उपस्थित होते.

उपक्रमास शुभेच्छा देताना श्रीमती भानसी यांनी शहर पोलिसांतर्फे नववर्षाच्या सुरुवातीला चांगला उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. व्यसनापासून दूर राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री.सिंगल यांनी नव्या पिढीला व्यवसनापासून मुक्त ठेवण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. तंबाखू ऐवजी जीवनसत्वयुक्त पदार्थांचे सेवन करावे आणि तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे, असे आवाहन त्यांनी केल. नव्या वर्षात तंबाखूमुक्त शहर करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तालय, गंगापूर रोड, विद्या विकास सर्कल, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड मार्गे पोलीस कवायत मैदान येथे या दौडचा समारोप झाला. नाईट रन पुर्ण करणाऱ्या नागरिकांना मेडल देण्यात आले. तंबाखू सेवन सोडणाऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सहभागी नागरिकांसाठी आरोग्य सुविधा करण्यात आली होती. थंडी असूनही नागरिक उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले. यावेळी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्याची आणि  सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 च्या अंमलबजावणीत सहकार्य करण्याची शपथ घेण्यात आली.     0000

No comments:

Post a Comment