Friday 28 December 2018

ध्वजदिन निधी संकलन


सामाजिक जाणिवेतून ध्वजदिन निधी संकलनासाठी पुढे या-जिल्हाधिकारी

      नाशिक दि.28- देशासाठी अहोरात्र लढणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी समजून व सामाजिक जाणिवेतून ध्वजदिन निधी संकलनासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे आयोजित ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा मुद्रांक अधिकारी अनिल पारखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) कॅप्टन विद्या रत्नपारखी  उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन म्हणाले, देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता आपल्या कुटुंबापासुन दूर रहात  देशाचे संरक्षण करतात. त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी ध्वजनिधी संकलनात प्रत्येकाने सहकार्य करावे.  अधिकारी-कर्मचाऱ्यांनीदेखील माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्याबाबत संवेदनशिलतेने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

भारत-पाक युद्ध, भारत-चीन युद्ध किंवा अन्य खास मोहिमेत वीर मरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने 25 लाख किंवा 5 एकर जमीन देण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. त्याबाबतची माहिती घेवून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशाच्या संरक्षणात आणि एकूण विकासात सैनिकांची महत्वाची भूमीका  असल्याने ध्वजनिधी संकलन उद्देशपुर्तीसाठी न करता सामाजिक जाणिवेतून करावे, असे आवाहन श्री.दराडे यांनी केले.

प्रास्ताविकात श्रीमती रत्नपारखी यांनी गतवर्षी ध्वजनिधी संकलनाचे 94 टक्के काम झाले असल्याचे सांगितले.
यावेळी  माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा दहा हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ध्वजदिन निधी संकलनात चांगली कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचादेखील सत्कार करण्यात आला.
                               ************

No comments:

Post a Comment