Thursday 31 May 2018

शेतकऱ्यांना आवाहन


खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन
नाशिक, दि. 31:- येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि योग्य किंमतीत बियाणे, रासायनिक खते आणि इतर सामग्री पुरविण्याच्या दृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात आले असून उत्पन्नात वाढ होण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
सोयाबीन पिकाची पेरणी करताना 75 ते 100 मि.मी.पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेमी खोलीपर्यंत करावी. बियाणे, खते, किटकनाशके इत्यादी निविष्ठा अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी कराव्यात. किटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी. संकरीत वाण वगळता सुधारीत वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता 3 वर्षापर्यंत वापरावे. बियाण्यांची बचत होईल अशा लागवड पद्धतीचा अवलंब करावा. उदा.भात पिकासाठी 'श्री' व 'सगुणा भात तंत्र' पद्धत , तेलबिया व कडधान्यासाठी बीबीएफ यंत्राद्वारे लागवड करावी.
 जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा. जमिनीतील स्फुरद मुक्त होण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या जीवणू खतांचा वापर करावा. शुन्य मशागत, पिकांचा फेरपालट , जैविक व सेंद्रिय खतांचा वापर , शेतातील काडी कचरा व पालापाचोळा शेतातच गाडणे आणि पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा वापर या बाबींचा अवलंब केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनी सुपिक बनतात व परिणामी रासायनिक खतांची आवश्यकता कमी भासते.
जमिनीतून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रणासाठी जैविक किंवा रासायनिक किडनाशकांची बीजप्रक्रिया करावी, जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मुलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा तसेच जिराईत पिकांसाठी पावसातील खंडाच्या काळात संरक्षित सिंचन द्यावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार व ठिबक सिंचनसारख्या सुक्ष्म सिंचन पद्धतीचा पिकांसाठी शिफारशीनुसार अवलंब करावा.
 पिकांच्या पुर्वमशागतीपासुन ते काढणी-मळणी पर्यंतच्या प्रत्येक कामासाठी उपलब्ध असलेल्या सुधारित कृषि औजारांचा व यंत्रांचा वापर करावा. जिराईत पिकांच्या पेरणीसाठी फारच मर्यादीत कालावधी मिळत असल्याने एकाच वेळी गादीवाफे तयार करणे, बियाणे पेरणे व बियाण्याच्या ठिकाणी खत देणे ही कामे करण्यासाठी रुंद वाफा सरी यंत्राचा वापर करावा. सोयाबीन, तुर, कापुस, भाजीपाला या पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा.
आंतरपिक पद्धतीचा अवलंब केल्यास टंचाई किंवा आपत्कालिन परिस्थितीत मुख्य पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला तरी आंतरपिकाच्या उत्पादनामुळे जोखिम कमी होण्यात मदत होते. कापुस- सोयाबीन, कापुस-मुग, कापुस-उडीद, सोयाबीन-तूर, ज्वारी - तूर, भाताच्या बांधावर तुर इत्यादी लागवड पद्धती यशस्वी ठरल्याने त्यांचा मोठा प्रमाणावर अवलंब करावा. शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेत सहभागी होण्यासाठी अंतीम मुदत 24 जुलै 2018 ही असून शेतकऱ्यांनी शेवटच्या आठवड्यात बँकामध्ये गर्दी करण्यापेक्षा वेळीच योजनेत सहभाग घ्यावा.
बोंडअळ्यांच्या नियंत्रणासाठी जनुक विरहीत, आश्रीत कापसाची कापुस पिकाभोवती लागवड करावी. रुंद वाफा सरीयंत्राने सोयाबीनची पेरणी केल्यास बियाण्याची गरज 20 ते 30 टक्के कमी होते तसेच खताचे खर्चातही 15 ते 20 टक्के बचत होत असल्यामुळे सोयाबीन पेरणीसाठी बी.बी.एफ. यंत्राचा वापर करावा. सोयाबीन बियाण्यास कार्बेन्डेझीम 2.5ग्रॅम किलो किंवा थायरम+कार्बेन्डेझीम 2:1 प्रमाणे 3 ग्रॅम किलो किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी 5 ग्रॅम किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम व पीएसबी या जिवाणु संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
भात रोपवाटीकेत बियाणे पेरणीपुर्वी बियाण्यास 3 टक्के मिठाच्या पाण्याची, थायरम (3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास) तदनंतर पीएसबी जिवाणु संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. तसेच रोपांचे वय 12 ते 15 दिवसांचे असतानाच पुर्नलागवड पुर्ण करावी, अधिक वयाची रोपे लावल्यास रोपवाटिका व्यवस्थापनाचा खर्च वाढण्याबरोबरच फुटवे कमी आल्याने उत्पादनात घट होते.
 तूर पिकाची सलग किंवा आंतरपीक म्हणुन लागवड करण्यासाठी रुंद वाफा सरी पद्धत अवलंबावी जेणेकरुन जमीनीतील ओलाव्याचा पुरेपुर वापर होण्याबरोबरच बियाणेमध्ये 15 टक्के तसेच खते आणि मजुरीमध्ये 20 टक्के बचत होऊन उत्पादनात वाढ होते तसेच आपत्कालीन परिस्थितीत पीक तग धरुन राहु शकते. याशिवाय स्थानिक परिस्थितीप्रमाणे कृषी विभागातील क्षेत्रिय अधिकारी, कृषी तज्ञ आणि प्रगतीशील शेतकरी यांचे मार्गदर्शन तसेच अनुभवाचा लाभ घ्यावा. तसेच कृषी विभागामार्फत राबवण्यिात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि खरीप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
00000

Monday 28 May 2018

मान्सून पूर्व आढावा


आपत्ती निवारणासाठी नागरीकांचा सहभाग महत्वाचा
                                                          -रामदास खेडकर

नाशिक, दि.28:- आपत्ती निवारणाचे कार्य प्रभावीपणे होण्याच्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी सामाजिक संस्था, परिसरातील संघटना आणि नागरीकांचा सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आयोजित मान्सून पूर्व आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सैन्य दलाच्या 216 मध्य रेजिमेंटचे मेजर राजेश सेनवाल, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निफाडचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसिलदार राजश्री अहिरराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता आर. एस. शिंदे उपस्थित होते.     

          श्री. खेडकर म्हणाले, पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीत जिवीत हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जावे. पावसाळ्यात धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो. अशावेळी पूर परिस्थिती उद्भवल्यास नदी व लगतच्या परिसरातील नागरीकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात यावे. यासाठी प्रशासनातर्फे सहकार्य करण्यात येईल.
          ते म्हणाले, जिवीत हानी होऊ नये यादृष्टीने महानगरपालिका, तालुका प्रशासन, पोलिस आदींनी दरम्यानच्या काळात उपाययोजना कराव्यात. आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी साधन सामुग्रीची सज्जता करणे गरजेचे आहे. लाइफ जॅकेट, बोटी, फ्लड लाइट आदी साहित्याच्या उपलब्धतेकडे लक्ष द्यावे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय राखणे आणि आपत्कालीन स्थितीची माहिती देण्यासाठी विविध विभागांनी, तसेच तालुका प्रशासनाने आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत, असे त्यांनी सांगितले.

          मेजर सेनवाल म्हणाले, पूरग्रस्तांसाठी प्रशासनाच्या समन्वयाने सैन्यदल मदत कार्यासाठी पूरप्रवण भागाची पाहाणी करुन पूर्वतयारी करेल. त्यासाठी आवश्यक कक्ष लष्कराच्या देवळाली छावणी येथे सुरु करण्यात येत आहे.
          याप्रसंगी श्री. खेडकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तपशिलवार सादरीकरण केले. पावसाळ्यामध्ये पूर स्थिती, वीज पडून होणाऱ्या दूर्घटना, दरड कोसळण्याच्या घटना  आदी माहिती त्यांनी दिली.
          बैठकीस सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, आरोग्य, जलसंपदा महसूल, जिल्हा परिषद, पोलिस, अग्निशमन, बीएसएनएल, सेनादल, नागरी संरक्षण दलासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
                                                                    0000 

Thursday 24 May 2018

विधान परिषद निवडणुक


नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक निकाल जाहीर
शिवसेनेचे नरेंद्र दराडे 167 मतांनी विजयी

नाशिक, दि.24:- विधान परिषद द्विवार्षिक निवडणुक 2018 अंतर्गत नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. मतमोजणी अंती निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना विजयी घोषित केले.

एकूण 644 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 631 मते वैध ठरली.  उमेदवाराला विजयासाठी 316 मतांची आवश्यकता होती. नरेंद्र दराडे यांना  399 तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांना 232 मते मिळाली. अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांना एकही मत मिळाले नाही. निवडणूक निरीक्षक म्हणून महावितरणचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांनी काम पाहिले.
----

Tuesday 22 May 2018

भरती मेळावा


आयटीआयच्यावतीने भरती मेळावा



नाशिक, दि.22:- औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) सातपूर नाशिक येथे सोमवार 28 मे 2017 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोकर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मर्सिडीस बेन्झ इंडीया प्रा. लि. चाकण-निघोज, पुणेचे प्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह मेळाव्यास हजर राहावे, असे आवाहन प्राचार्य, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र नाशिक यांनी केले आहे.
                               
                  शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर नाशिक येथे गुरुवार 24 मे 2017 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह मेळाव्यास हजर राहावे असे आवाहन प्राचार्य, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, द्वारा औद्यागिक प्रशिक्षण संस्था, नाशिक यांनी केले आहे. 
----

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी

‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवड्याचे आयोजन
नाशिक, दि. 22 : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने 24 मे ते 7 जून हा रोहिणी नक्षत्राचा कालावधी  ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ पंधरवडा म्हणून राबविण्यात येणार असून शासनाच्या योजना गावस्तरावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
मोहिमेत कृषि पुरस्कार प्राप्त तसेच प्रगतशील शेतकरी यांची निवड करून एकदिवसीय कार्यशाळेचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. पंधरवड्यात यातील सहभागी प्रतिनिधी आपल्या गावातील शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी मोहिमेत सहभाग घेतील.  शेतकऱ्यांना प्रमुख पिकांसाठी आधुनिक व अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना, अभियान, उपक्रमांची माहिती व त्यांच्या कार्यपद्धती, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानी पासून शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले जाईल.
जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, कापसावरील शेंदरी बोंडअळी, सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक यांच्या एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. एकात्मिक शेती पद्धतीसह बहुवार पीक आंतरपीक पद्धतीचीही माहिती दिली जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठी कृषीपूरक व्यवसायात पशुपालन, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, रेशीम उद्योग आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  
प्रगतीशील शेतकऱ्यांचे नाविन्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, एम. किसान पोर्टल नोंदणी करुन मोफत एसएमएस सुविधेचा लाभ घेणे, गट समुहांच्या माध्यमातून शेतीमालावर प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणन करण्यासाठी जागृती करण्यात येईल. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
किडनाशके हाताळणी आणि फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येईल. मोहिमेत शासनाचा कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्रे, राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँका, पिकनिहाय उत्पादक संघ, कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा परिषद कृषि विभाग तसेच महसूल, आदिवासी, वन, सहकार, पणन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन इत्यादी विभागांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाईल. शेतकरी बांधवांनी पंधरवड्यात आयोजित विविध कार्यक्रम, बैठका, चर्चासत्रे आणि कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  कृषी आयुक्त यांनी केले आहे.
000000

अंधशाळेत प्रवेश


शासकीय अंधशाळेत प्रवेश प्रक्रीया सुरू

       नाशिक, दि. 22: जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या अधिनस्थ असलेल्या शासकीय अंध शाळा नाशिक येथे 2018-19 या  वर्षाकरीता दहा रिक्त जागांसाठी अंध विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून शासनातर्फे निवास, भोजन, शालेय गणवेश, शैक्षणिक व वैद्यकिय सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत.
शाळेत  6 ते 14 वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जाईल. जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील अंधत्वाचा दाखला अर्जासोबत जोडावा. विद्यार्थ्यांस कोणताही प्रकारचा संसर्गजन्य व गंभीर आजार व इतर कोणत्याही प्रकारचे अपंगत्व नसावे. प्रवेशासाठी जासत्‍ अर्ज आल्यास कमी वयोगटातील विद्यार्थ्यांना  आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
शाळा प्रवेशासाठीचे अर्ज अधिक्षक, शासकीय अंध शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आवार, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, नाशिक  येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वेळेत मोफत उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी अधिक्षक शासकीय अंध शाळा (दूरध्वनी क्रमांक 0253- 2237568) अथवा जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक येथे संपर्क साधावा, असे शाळेच्या अधिक्षकांनी कळविले आहे.
000000

जन सुनावणी


  मराठा आरक्षणासंदर्भात 28 मे रोजी जन सुनावणी

नाशिक, दि.22:- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व अधिकारी यांच्या उपस्थितीत सोमवार 28 मे 2018 रोजी नाशिक येथे जाहीर जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणा संदर्भात आयोग विभागवार जन सुनावणीद्वारे माहिती घेणार आहे.
 नाशिक महसूल विभागातील ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणा संदर्भात आयोगा समोर निवेदन करावयाचे आहे, त्यांनी लेखी, पुराव्यासह व ऐतिहासिक दस्तऐवज, माहितीसह आपले निवेदन शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब नाशिक येथील सभागृहात सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जन सुनावणीचे वेळी आयोगासमोर सादर करावे, असे आवाहन सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी केले आहे.
00000

Sunday 20 May 2018

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुक


विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

          नाशिक, दि.20 :- विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी  सोमवार 21 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. रविवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री.राधाकृष्णन यांनी मतदान केंद्र अधिकारी आणि सूक्ष्म निरीक्षक यांना आवश्यक सुचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, मालेगाव मनपा आयुक्त संगीता धायगुडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे आदी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी दिले. त्यांनी मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आणि मतदान प्रक्रीयेविषयी अधिकाऱ्यांना माहिती दिली.
नाशिक तालुका व शहरातील सदस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपजिल्हाधिकारी रोहयो यांचे दालन येथे मतदान केंद्र असणार आहेत.  प्रत्येक तालुक्यातील नगर पंचायतीचे सर्व सदस्य, नगर परिषदेचे सर्व सदस्य, तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि महानगर पालिकातील सर्व सदस्य हे संबधित तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालय येथे मतदान करतील.

मतदानासाठी एकूण 105 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  मतदान केंद्रात पेन, मोबाईल, कॅमेरा किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तु नेता येणार नाही. उमेदवारांना मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात बूथ उभारता येणार नाही. मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक केंद्रावर एक अधिकारी आणि तीन कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
 प्रत्येक मतदान केंद्रावर भारत सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्याची सूक्ष्म निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर सूक्ष्म निरीक्षक निवडणूक प्रक्रीयेवर लक्ष देणार असून निवडणूक निरीक्षकांना आपला अहवाल सादर करतील. संपूर्ण मतदान प्रक्रीयेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून वेबकास्टींगही करण्यात येणार आहे.                                              
000000

Thursday 10 May 2018

वार्षिक ऋण योजना


जिल्हा वार्षिक ऋण योजनेचे प्रकाशन

नाशिक, दि.10: जिल्ह्यातील विविध घटकांच्या पत पुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक ऋण योजनेचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले.
 याप्रसंगी लीड बँक तथा बँक ऑफ महाराष्ट्रचे विद्यमान विभागीय व्यवस्थापक दिनेश तांबट, नूतन विभागीय व्यवस्थापक  बाळासाहेब ताव्हरे, मुख्य व्यवस्थापक भरत बर्वे, बँक ऑफ इंडीयाचे तुषार पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे किशोर कदम, सेंट्रल बँक ऑफ इंडीयाच्या ममता सिंग, महिला अर्थिक विकास महामंडळाचे अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

नाशिक कृषी उत्पादनाच्या दृष्टीने राज्यातील महत्वाचा जिल्हा असून निश्चित केलेले उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील  बँकींग क्षेत्राने प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यावेळी म्हणाले.
या पत आराखड्यात जिल्ह्यातील खरीप व रब्बी पीकांसाठी एकूण 3755 कोटी रुपयांचे पत पुरवठ्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून त्यापैकी खरीप हंगामासाठी 2625 कोटी रुपये व रब्बी हंगामासाठी 1130 कोटी रुपये आहे. याचबरोबर कृषी आधारीत घटकांसाठी व मुदत कर्जासाठी 2470 कोटी रुपये योजना निश्चित करण्यात आली आहे. सदर जिल्हा पत योजना बँक ऑफ महाराष्ट्रने तयार केली आहे.

याचबरोबर जिल्ह्यातील बँक क्षेत्राच्या कामाची यावेळी माहिती देण्यात आली. बँक शाखांमध्ये वाढ होऊन 42 बँकाच्या एकूण 782 शाखा जिल्ह्यात कार्यरत आहेत. तसेच विविध स्मॉल फायनान्स बँका व खाजगी बँकांनीदेखील जिल्ह्यात आपला व्यवसाय वाढविला आहे, असे यावेळी सांगण्यात आले. 
                                                       00000