Thursday 31 May 2018

शेतकऱ्यांना आवाहन


खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन
नाशिक, दि. 31:- येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि योग्य किंमतीत बियाणे, रासायनिक खते आणि इतर सामग्री पुरविण्याच्या दृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात आले असून उत्पन्नात वाढ होण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
सोयाबीन पिकाची पेरणी करताना 75 ते 100 मि.मी.पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेमी खोलीपर्यंत करावी. बियाणे, खते, किटकनाशके इत्यादी निविष्ठा अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी कराव्यात. किटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी. संकरीत वाण वगळता सुधारीत वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता 3 वर्षापर्यंत वापरावे. बियाण्यांची बचत होईल अशा लागवड पद्धतीचा अवलंब करावा. उदा.भात पिकासाठी 'श्री' व 'सगुणा भात तंत्र' पद्धत , तेलबिया व कडधान्यासाठी बीबीएफ यंत्राद्वारे लागवड करावी.
 जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा. जमिनीतील स्फुरद मुक्त होण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या जीवणू खतांचा वापर करावा. शुन्य मशागत, पिकांचा फेरपालट , जैविक व सेंद्रिय खतांचा वापर , शेतातील काडी कचरा व पालापाचोळा शेतातच गाडणे आणि पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा वापर या बाबींचा अवलंब केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनी सुपिक बनतात व परिणामी रासायनिक खतांची आवश्यकता कमी भासते.
जमिनीतून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रणासाठी जैविक किंवा रासायनिक किडनाशकांची बीजप्रक्रिया करावी, जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मुलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा तसेच जिराईत पिकांसाठी पावसातील खंडाच्या काळात संरक्षित सिंचन द्यावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार व ठिबक सिंचनसारख्या सुक्ष्म सिंचन पद्धतीचा पिकांसाठी शिफारशीनुसार अवलंब करावा.
 पिकांच्या पुर्वमशागतीपासुन ते काढणी-मळणी पर्यंतच्या प्रत्येक कामासाठी उपलब्ध असलेल्या सुधारित कृषि औजारांचा व यंत्रांचा वापर करावा. जिराईत पिकांच्या पेरणीसाठी फारच मर्यादीत कालावधी मिळत असल्याने एकाच वेळी गादीवाफे तयार करणे, बियाणे पेरणे व बियाण्याच्या ठिकाणी खत देणे ही कामे करण्यासाठी रुंद वाफा सरी यंत्राचा वापर करावा. सोयाबीन, तुर, कापुस, भाजीपाला या पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा.
आंतरपिक पद्धतीचा अवलंब केल्यास टंचाई किंवा आपत्कालिन परिस्थितीत मुख्य पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला तरी आंतरपिकाच्या उत्पादनामुळे जोखिम कमी होण्यात मदत होते. कापुस- सोयाबीन, कापुस-मुग, कापुस-उडीद, सोयाबीन-तूर, ज्वारी - तूर, भाताच्या बांधावर तुर इत्यादी लागवड पद्धती यशस्वी ठरल्याने त्यांचा मोठा प्रमाणावर अवलंब करावा. शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेत सहभागी होण्यासाठी अंतीम मुदत 24 जुलै 2018 ही असून शेतकऱ्यांनी शेवटच्या आठवड्यात बँकामध्ये गर्दी करण्यापेक्षा वेळीच योजनेत सहभाग घ्यावा.
बोंडअळ्यांच्या नियंत्रणासाठी जनुक विरहीत, आश्रीत कापसाची कापुस पिकाभोवती लागवड करावी. रुंद वाफा सरीयंत्राने सोयाबीनची पेरणी केल्यास बियाण्याची गरज 20 ते 30 टक्के कमी होते तसेच खताचे खर्चातही 15 ते 20 टक्के बचत होत असल्यामुळे सोयाबीन पेरणीसाठी बी.बी.एफ. यंत्राचा वापर करावा. सोयाबीन बियाण्यास कार्बेन्डेझीम 2.5ग्रॅम किलो किंवा थायरम+कार्बेन्डेझीम 2:1 प्रमाणे 3 ग्रॅम किलो किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी 5 ग्रॅम किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम व पीएसबी या जिवाणु संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
भात रोपवाटीकेत बियाणे पेरणीपुर्वी बियाण्यास 3 टक्के मिठाच्या पाण्याची, थायरम (3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास) तदनंतर पीएसबी जिवाणु संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. तसेच रोपांचे वय 12 ते 15 दिवसांचे असतानाच पुर्नलागवड पुर्ण करावी, अधिक वयाची रोपे लावल्यास रोपवाटिका व्यवस्थापनाचा खर्च वाढण्याबरोबरच फुटवे कमी आल्याने उत्पादनात घट होते.
 तूर पिकाची सलग किंवा आंतरपीक म्हणुन लागवड करण्यासाठी रुंद वाफा सरी पद्धत अवलंबावी जेणेकरुन जमीनीतील ओलाव्याचा पुरेपुर वापर होण्याबरोबरच बियाणेमध्ये 15 टक्के तसेच खते आणि मजुरीमध्ये 20 टक्के बचत होऊन उत्पादनात वाढ होते तसेच आपत्कालीन परिस्थितीत पीक तग धरुन राहु शकते. याशिवाय स्थानिक परिस्थितीप्रमाणे कृषी विभागातील क्षेत्रिय अधिकारी, कृषी तज्ञ आणि प्रगतीशील शेतकरी यांचे मार्गदर्शन तसेच अनुभवाचा लाभ घ्यावा. तसेच कृषी विभागामार्फत राबवण्यिात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि खरीप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment