Wednesday 31 October 2018

गोदावरीकाठच्या नागरिकांना आवाहन


दारणा, गोदावरीकाठच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन
          नाशिक, दि. 31:-  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवार 1 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता दारणा, गंगापुर आणि मुकणे धरणातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने दारणा व गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
          दारणा व मुकणे धरणातून 2.04 टीएमसी आणि गंगापुर धरणातून 0.60 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. दारणा धरणातून 11 हजार क्युसेक्स, मुकणे धरणातून 1 हजार क्युसेक्स आणि गंगापुर धरणातून 3 हजार 500 क्युसेक्सने पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कोणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये. तसेच प्रवाह जास्त असल्याने नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात विद्युत पंप असल्यास ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे. कुठल्याही प्रकारची मालमत्ता अथवा जीवित हानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता रा.शा.शिंदे यांनी केले आहे.
----

राज्य अजिंक्यपद कबड्डी


आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करा-रामराजे नाईक निंबाळकर

          नाशिक, दि. 31:- राज्यातील कबड्डी खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरीसाठी चांगली तयारी करावी आणि खेळातील कौशल्य आत्मसात करावे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
          सिन्नर येथे 66 व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार व नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष जयंत जाधव, नगराध्यक्ष किरण डगले, महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, जि.प.च्या समाज कल्याण सभापती सुनिता चारोस्कर आदी उपस्थित होते.

          श्री.निंबाळकर म्हणाले, कबड्डी खेळाची वाढती लोकप्रियता  लक्षात घेता कबड्डीकडे करिअर म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी शारिरीक क्षमतेचा विकासही महत्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले.
          जिल्ह्यातून कबड्डीचे चांगले स्पर्धक तयार व्हावेत यासाठी स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येईल, असे श्रीमती सांगळे यांनी सांगितले.

          आमदार वाजे आणि श्री.पाटील यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेत पुरुष व महिलांचे प्रत्येकी 25 संघ सहभागी झाले असून 600 खेळाडु आपले कौशल्य दाखविणार आहेत. पुरुषांचे 51 व महिलांचे 41 सामने 5 दिवस रंगणार आहेत.
-----

Tuesday 30 October 2018

एकता दौड


राष्ट्रीय एकात्मतेसाठी नाशिककर धावले


          नाशिक, दि.31- .  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त  राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘एकता दौड’मध्ये नाशिककर जनतेने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
          पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल आणि पोलीस विशेष महानिरीक्षक चेरींग दोरजे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला.

 राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वांनी एकत्रीत प्रयत्न करावे आणि देशाला तसेच जगाला आपण एक असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहन श्री.सिंगल यांनी शुभारंभ प्रसंगी केले. त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली

 यावेळी महाराष्ट्र पोलीस  प्रशिक्षण अकॅडमीच्या संचालक अश्वती दोरजे, उपायुक्त रघुनाथ गावडे, सुखदेव बनकर, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मिकांत पाटील, माधुरी कांगणे, विजयकुमार मगर आदी उपस्थित होते.

          एकता दौडच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेसोबत व्यसनमुक्ती, नो हॉर्न, महिला सक्षमीकरण आदी संदेश देण्यात आले. शाळकरी विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व गटातील नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते. पाच किलोमीटरच्या या दौडचा समारोप गंगापूर रोड, कॉलेजरोड, कॅनडा कार्नरमार्गे पोलीस कवायत मैदान येथेच झाला.
          मालेगावी एकता दौडचे आयोजन

                     
        नाशिक ग्रामीण पोलीस व मालेगाव पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव येथील पोलीस परेड मैदान येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले. एकता दौडचा शुभारंभ पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून  करण्यात आला.
पोलीस परेड ग्राऊंड येथून एकात्मा चौक, फुले पुतळा, मोसम पुल, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, आंबेडकर पुल, दत्तमंदीर संगमेश्वर गांधी पुतळा मार्गे पोलीस परेड ग्राऊंड मैदान येथे दौडचा समारोप झाला.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलीस अधिक्षक निलोत्पल, माजी आमदार मौलाना मुफती इस्माईल, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसिलदार ज्योती देवरे, पोलीस उपअधिक्षक रत्नाकर नवले ,अजित हगवणे, मनपा उपआयुक्त कापडणीस आदी उपस्थित होते.
 एकता दौडमध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नाशिक, क्रिडा शिक्षक संघटना मालेगाव, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक   यांनी सहभाग घेतला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते 6 जानेवारी 2019 रविवार रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मालेगाव मॅरेथॉन 2019-पर्व दुसरे’ या फलकाचे अनावरण करण्यात आले. एकता दौडमध्ये सर्व सहभागी नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
----


फटाका विक्रीवर बंदी


अधिक आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी

          नाशिक, दि.30- फटाका उडविणाऱ्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापरावर जिल्हादंडाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात बंदी घातली आहे.
          संबंधित परवाना प्राधिकारी यांनी फटाका परवाना देताना तो गर्दीच्या, वर्दळीच्या, सार्वजनिक रस्त्यांवर, शाळा व महाविद्यालयाजवळ तसेच धार्मिक स्थळाजवळ न देता इतरत्र मोकळ्या जागेत असेल अशा ठिकाणी देण्याची कार्यवाही करावी.
          साखळी फटाक्यांसाठी 50, 100 आणि त्यावरील फटाके असल्यास आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे  115, 110 व 105 डेसीबल असावी. रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचे आवाज करणारे फटाके उडविण्यास बंदी आहे.
          फटाक्यांची दुकाने जमिनीलगत असावीत. प्रत्येक स्टॉलमध्ये 50 किलोग्रॅम फटाके व 40 कि.ग्रॅ. शोभेच्या फटाक्यांपेक्षा अधिक फटाके असू नयेत. स्टॉलमध्ये सुरक्षित अंतर असावे. कुठल्याही घोषित सीमेपासून 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर स्टॉल्सची जागा नसावी.
          एकापेक्षा जास्त स्टॉल्स असल्यास त्यांची प्रवेशद्वारे समोरासमोर नसावीत. एका ठिकाणी 100 पेक्षा जास्त स्टॉल्स नसावेत. स्टॉल्सच्या ठिकाणी तेलाचा दिवा किंवा मेणबत्ती लावू नये. फटाक्याच्या दुकानाचा आपत्कालीन मार्ग नेहमी खुला असावा. स्टॉल्सच्या ठिकाणी धुम्रपानास मनाई आहे. त्याठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना केलेली असावी.
          खराब स्थितीत असलेल्या फटाक्यांची विक्री करण्यात येऊ नये. तसेच 25 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, 3.8 सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबीचे व ॲटमबॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांची व क्लोरेटचा समावेश असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये.
          तीन इंचापेक्षा जास्त लांबीचा व अर्ध्या इंचापेक्षा जास्त व्यासाचे कागदाचे नळीपासून केलेल्या गनपावडर व नायट्रेट मिश्रीत परंतु क्लोरेट नसेलेल्या चिनी फटाक्यांची विक्री करण्यात येऊ नये.
          फुटफुटी किंवा तडतडी, मल्टीमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लाय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिवळ्या फॉस्फरसयुक्त अत्यंत विषारी फटाक्यांची विक्री करू नये. 18 वर्षाखालील मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असल्याशिवाय फटाक्यांची विक्री करू नये.
  शांतता क्षेत्रात कोणत्याही फटाक्यांचा वापर करू नये. शांतता क्षेत्रात रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय आदींभोवतीचे 100 मीटरपर्यंतचे क्षेत्र येते.
रॉकेटचा डोक्याचा भाग 10 सेमीपेक्षा जास्त नसावा व 2.5 सेमीपेक्षा जास्त जाडीचा व्यास नसावा. मनाई केलेले आपटबार व उखळी दारु उडविण्यास बंदी आहे. फटाक्यांची माळ 10 हजार फटाक्यांपेक्षा जास्त लांबीची असू नये. त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या आवाजाचे फटाक्यांमुळे  निर्माण होणाऱ्या ध्वनी व वायु प्रदूषणाने जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सदरचे मनाई आदेश काढण्यात आले आहेत.
 मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 33 नुसार आदेशाचा भंग केल्यास आठ दिवसापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा रुपये 1250 इतक्या दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील. नागरिकांनी वर्दळ नसलेल्या भागात फटाके उडवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
----

Friday 26 October 2018

शेततळ्यामुळे नुकसान टळले


शेततळ्यामुळे डाळींबाचे नुकसान टळले

          नाशिक दि. 26-सिन्नर तालुक्यात दापूर गावच्या दत्तू आव्हाड यांनीमागेल त्याला  शेततळेयोजनेअंतर्गत शेततळे तयार केल्याने डाळींबाच्या बागेसाठी शाश्वत सिंचन सुविधा  उपब्ध होऊन संभाव्य आर्थिक नुकसान टळले आहे.
          आव्हाड यांची अडीच एकरात डाळींबाची बाग आहे. इतर क्षेत्रात कांदा पीक आहे. यावर्षी परिसरात केवळ दीडशे मिलीमीटर पाऊस पडल्याने परिसरातील शेती संकटात सापडली आहे. मात्र आव्हाड यांची बाग फळधारणेच्या अवस्थेत उभी आहे.

          आपल्या तीन एकर क्षेत्रात गहू, बाजरी, कांदा अशी पिके घ्यायची आणि निसर्गावर अवलंबून रहायचे असे सत्र सातत्याने सुरू होते. विहिरींना पाणीही पुरेसे नसल्याने सिंचनाची समस्या होतीच. मात्र शेततळ्याची योजना आल्यावर आव्हाड यांनी 25 x 45 मीटर आकाराचे शेततळे तयार केले. त्यासाठी त्यांना 50 हजार अनुदान मिळाले. प्लास्टिक आच्छादनासाठी राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमातून 75 हजार रुपये अनुदान मिळाले.

          शेततळे तयार झाल्यावर गतवर्षी आव्हाड यांनी प्रथमच डाळींब बाग लावली. गतवर्षी दर कमी मिळूनही त्यांना दीड लाख उत्पन्न मिळाले. शिवाय वाल, कांदा अशी पिके जोडीला घेता आली. भोजापूर कालव्याच्या पूरपाण्यातून पाईपलाईनद्वारे त्यांनी शेततळे भरून घेतले असल्याने पिकांचे नुकसान  त्यांना टाळता आले.
                   आज शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाल्याने ठिबकद्वारे पिके घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. सोबत भाजीपाला उत्पादनाकडे वळण्याचादेखील त्यांचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
दत्तू आव्हाड-यावर्षी पाऊस नसल्याने शेती संकटात आली आहे. शेततळ्यामुळे पाणीसाठा उपलब्ध झाल्याने डाळींबाचे पीक चांगले येण्याची आशा आहे. कांदा आणि भाजीपालादेखील घेण्याचा विचार आहे.

                 ----

दुष्काळ आढावा


पीक विमा भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा- प्रा.राम शिंदे


          नाशिक, दि.26-  शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी त्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा हप्ता भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.
          पंचायत समिती सिन्नर येथे दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. , उपविभागीय अधिकारी महेश पाटील, पंचायत समिती सभापती भगवान पसवे, उपसभापती जगन्नाथ पाटील-भाबड,तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदी उपस्थित होते.

          प्रा.शिंदे म्हणाले, पीक परिस्थितीचा अहवाल सादर करतांना विविध विभागांनी परस्पर समन्वयाने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची दक्षता घ्यावी. जनतेला गरजेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टंचाईग्रस्त गावात टँकरचे योग्य नियेाजन करावे.
          महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत  गावनिहाय कामे शेल्फवर ठेऊन त्याची माहिती जनतेला द्यावी. मागणी झाल्यानंतर तीन दिवसात काम उपलब्ध करुन द्यावे त्यासाठी कामाच्या मान्यता वेळेवर घ्याव्यात. रोहयोतून तलावातील गाळ काढण्याचे आणि शेतरस्त्याची कामे घेण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले.

          ते म्हणाले, दृष्काळसदृश्य परिस्थिती घोषीत केलेल्या गावातील पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्यात विलंब करु नये. पशुधन वाचविण्यासाठी पाणी आणि चाऱ्याचे नियोजन आतापासून करण्यात यावे.
          जिल्हाधिकारी  म्हणाले, शेतकऱ्यांनी पीक पेऱ्याची नोंद केली नसेल तर त्यांना माहिती देऊन नोंद अद्ययावत करुन घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना टँकरबाबत दररोज आढावा घ्यावा. पीक परिस्थितीचा आढावा घेतांना विमा प्रतिनिधींना उपस्थित रहाण्याविषयी सूचित केल्याची माहिती त्यांनी दिली. शासनाने दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषीत केलेल्या गावात आठ प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. त्या अंतर्गत शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये, असे त्यांनी सांगितले.

          यावेळी कृषी , लघुपाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती, तहसील कार्यालय, वन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
          तत्पूर्वी प्रा.शिंदे यांनी वावी आणि मुसळगाव शिवारातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी या भागात पीकाच्या नुकसानीची पाहणी केली. संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
0000

Monday 22 October 2018

विश्वशांती अहिंसा संमेलन


भगवान ऋषभदेवांचा अहिंसेचा संदेश आजही अनुकरणीय
                           -राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविन्द

          नाशिक, 22 : अहिंसेच्या माध्यमातून शांती आणि शांततेच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश भगवान ऋषभदेव यांनी दिला आहे. जगातील सद्यस्थिती पाहता त्यांचा अहिंसेचा संदेश आजही प्रासंगिक आणि अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांनी केले.
          सटाणा तालुक्यातील भिलवाड (मांगीतुंगी) येथे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सविता कोविन्द,केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, आमदार राजेंद्र पाटणी, गणिनी प्रमुख आर्यिकाज्ञानमती माताजी, आर्यिकारत्न चंदनामती माताजी,  मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष रविंद्रकिर्ती स्वामी आदी उपस्थित होते.
          राष्ट्रपती म्हणाले,मानवी कल्याणासाठी कार्य करणाऱ्या जैन धर्माचे अधिष्ठान‘अहिंसा परमो धर्मा:’ हा संदेश आहे. तीर्थंकरांनी सम्यक  ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक आचरणाचा संदेश दिलेला आहे. अहिंसा केवळ मानवाप्रती अभिप्रत नसून मन, वचन आणि आचरणाने अहिंसा तत्वाचे पालन करणे गरजेचे आहे. केवळ मानवाप्रती संवेदनशील आणि सहिष्णू न राहता पशुपक्ष्यांप्रती, प्रकृतीच्याप्रती सहिष्णुता बाळगण्याचा ऋषभदेवांनी दिलेला अहिंसेचा संदेश आजही तेवढाच उपयुक्त आहे, असे ते म्हणाले.

          भगवान ऋषभदेव यांची या परिसरात साकारण्यात आलेली भव्य अशी मूर्ती आपल्यासाठी निश्चितच अहिंसा धर्माचे महत्त्व प्रतिपादीत करणारी आहे. त्यामुळे आपणही अहिंसेच्या तत्वाचं पालन करीत आपले आचरण उंचवावे, असे सांगून राष्ट्रपती कोविन्द म्हणाले, नदी, सरोवर अस्वच्छ करणे म्हणजे हिंसेचे प्रतीक मानले जाते.त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छता पाळली पाहिजे.
भगवान महावीरांनी अपरिग्रह तत्वाला महत्त्व दिले आहे. आज निसर्गाचे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. हे तत्व आचरताना प्रकृती प्रती सम्यक व्यवहार करावा लागेल.निसर्गनिर्मित साधनस्रोतांचासंतुलितपणे वापर केला पाहिजे. या साधनांचा अतिवापर केल्यास प्रकृतीचा आणि परिणामत: मानवी जीवनाचाऱ्हास होईल. अहिंसा आणि करुणेचा संदेश यासाठी उपयुक्त ठरेल. केंद्र सरकारनेदेखील या तत्वाला अनुसरून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र संतांची आणि महापुरुषांची भूमी असून राज्याने सामाजिक समरसतेचा संदेश देशाला दिला आहे. राज्य शासनाने जनकल्याणाच्या भूमीकेतून गेल्या चार वर्षात चांगली कामगिरी केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. नाशिक ही पावन भूमी असून धार्मिक पर्यटनासाठी महत्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

          यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,भगवान ऋषभदेव हे आदर्श शासक होते. करुणा आणि अहिंसेचा मंत्र त्यांनी दिला. जगाला कल्याणकारी मुल्यांना समर्पित करण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून झाले. मानवी कल्याण, शांतता, बंधूभाव आदींची मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या 108 फुटाच्या अतिभव्य मूर्तीच्या दर्शनाने  मूल्यविचारांची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
          तीर्थंकरांनी केवळ मानवाप्रती हिंसेचा विचार मांडला नाही तर यात प्रकृतीचादेखील समावेश होता. आज पर्यावरण बदलाचे आव्हान समोर असताना त्यांची ही शिकवण पुढे नेण्याची गरज आहे. ‘तेन तक्तेन भुंजित:’ हा विचार आपण विसरत आहोत.  प्रकृतीचा ऱ्हास थांबविला नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. निसर्गाशी सहचर्य राखत जगण्याचा तीर्थंकरांचा संदेश विश्वशांती संमेलनाच्या निमित्ताने जगभर पोहोचावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मांगीतुंगी परिसर विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देताना ते म्हणाले, या परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने नियोजन केले असून विविध कामांना मंजूरी देण्यात आली आहे. आतापर्यंत 55 कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत.उर्वरित कामे लवकरच मार्गी लागतील.
दुष्काळसदृष परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विविध उपाययोजना कऱण्यात येत आहेत. यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राज्यातील परिस्थितीचा मुकाबला कऱण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केंद्र शासन करेल, असे सांगितले आहे. यासंदर्भातील 179 तालुक्यातील टंचाईसदृश्य जाहीर करण्याबाबत शासन आदेश लवकरच काढण्यात येईल.  त्यानुसार 9 प्रकारच्या सवलती दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना देण्यात येतील, असे ते म्हणाले.

          केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले की, प्रेम, दया, करुणा, सहकार्य, बंधुभावाची शिकवण भगवान ऋषभदेवांच्या विचारातून मिळते. भगवान ऋषभदेवांची मूर्ती या परिसरातील महत्वपूर्ण वारसा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
          विश्वशांतीसाठी जैनधर्मियांचा अहिंसेचा विचार आवश्यक आहे. विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या माध्यमातून अहिंसा आणि शांततेचा संदेश  सर्वत्र पोहोचेल, असा विश्वास गणिनी श्री ज्ञानमतीजी यांनी व्यक्त केला. सर्व जगाच्या कल्याणाची भावना मनामनांत निर्माण व्हावी, हे ऋषभदेवांचे विचार जगभर पोहोचावेत म्हणून ऋषभदेव मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.

          मूर्ति निर्माण समितीचे अध्यक्ष रविंद्रकिर्ती स्वामी यांनी मांगीतुंगी परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाने मोलाचे सहकार्य केल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मुरादाबादच्या तीर्थंकर महावीर विद्यापीठाला भगवान ऋषभदेव आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुलगुरू सुरेश जैन यांनी हा पुरस्कार स्विकारला.राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमाया ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रपती महोदयांना ग्रंथाची पहिली प्रत भेट देण्यात आली.

प्रास्ताविकात श्री चंदनामतीजी यांनी, अहिंसा जगाला संदेश देण्यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. लोकशाही मूल्य, अहिंसा, दया, करुणा, आध्यात्म हा भारताने जगाला दिलेला ठेवा आहे, असे त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी राष्ट्रपती श्री. कोविन्द यांचे ओझर विमानतळ येथे राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळीकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन,जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे आदी उपस्थित होते.
----

Monday 15 October 2018

टंचाईसदृश परिस्थिती आढावा


पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य- गिरीष महाजन

       नाशिक दि. 15- देवळा आणि बागलाण तालुक्यातील बहुतेक भागात कमी पावसामुळे परिस्थिती गंभीर असून या भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभाक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          बागलाण तहसिल कार्यालय येथे देवळा व बागलाण तालुक्यातील टंचाईसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार डॉ.राहुल आहेर, दिपीका चव्हाण, पंचायत समिती सभापती विमलताई सोनवणे, उपसभापती शितल खोर, उपविभागीय अधिकारी प्रविण महाजन, तहसिलदार प्रमोद हिले, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, केदा आहेर आदी उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले,भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी केळझर डावा कालव्यासाठी 4 कोटी 80 लाखाची आणि केळझर चारी क्र.8 ला 4 कोटी 95 लाखाची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  ही चारी भाक्षी-मूळाणेपर्यंत मंजूर असून चौगाव, कऱ्हे, अजमीर सौंदाणे, वायगाव असा कालवा वाढविण्यात येणार आहे.

          मापदंडात बसत नाही म्हणून पूर्वी नामंजूर करण्यात आलेला हरणबारी उजवा कालवा मापदंडात बसविण्यात आला असून पारनेरपासून वायगाव-सातमानेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या कालव्यामुळे 21 दुष्काळी गावांना लाभ होणार आहे. हरणबारी डाव्या कालव्याचे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तळवाडे-भामेर एक्स्प्रेस कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

          ते म्हणाले, या भागातील मका, कांदा, भुईमूग पिकाचे बऱ्याचअंशी नुकसान झाले आहे. तर उडीद आणि मुगाचेही काही प्रमाणात नुकसान दिसून येत आहे. पेरणीनंतर पाऊस न आल्याने नुकसानाची तीव्रता अधिक आहे. शासनाने नव्याने पाहणी करण्याच्या सुचना दिल्या असून सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल. दुष्काळ सदृश परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन आढावा घेण्याच्या सुचना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

          तत्पूर्वी श्री.महाजन यांनी दोन्ही तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या चेहळी, मेशी, कुंभार्डे, हरीपाडा,अजमीर सौंदाणे, देवळाणे गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पिकांची पाहणी केली. त्यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
----
         


Sunday 14 October 2018

विकासकामांचे भूमिपूजन


शेतकऱ्यांच्या विकासाकरीता मुलभूत विकासाला प्राधान्य-चंद्रकांत पाटील

          नाशिक, 14 : शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी रस्ते, पाणी आणि वीज या मूलभुत गोष्टी पुरविण्यास शासन प्राधान्य देत आहे,  असे प्रतिपादन राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
          अवनखेड येथील शेतकरी मेळावा व विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरीश्चंद्र चव्हाण, आमदार जीवा पांडु गावीत, नरहरी झिरवाळ, मुख्य अभियंता हेमंत पगारे, अधीक्षक अभियंता रणजित हांडे, कार्यकारी अभियंता सुर्यकांत आहिरे, सरपंच नरेंद्र जाधव, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

          श्री. पाटील म्हणाले, राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने चांगल्या दर्जाची कामे होत आहे. रस्त्यांच्या कामासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे.  केंद्र शासनानेदेखील रस्ते विकासाकरीता एक लाख 6 हजार कोटीचा  निधी उपलब्ध करून दिला आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परीस्थिती असल्याने 172 तालुक्यात पंचनामा करण्यात येत आहे. लवकरच दुष्काळ घोषित करुन मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
          श्री. पाटील यांनी प्रधानमंत्री दत्तक ग्राम योजनेअंतर्गत अवनखेड गावात चांगली विकासकामे झाल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले.  त्यांनी ग्रामपंचायत इमारतीची पहाणी करुन राज्यात अशा ग्रामपंचायत इमारती उभ्या रहाव्यात,असे कौतुगोद्गार काढले.

          खासदार चव्हाण यांनी दिंडोरी मतदार संघाच्या विकासकामांबद्दल माहिती देवुन प्रधानमंत्री दत्तक ग्राम योजनेअंतर्गत अवनखेड गावाने देशपातळीवर चांगली कामगिरी केल्याचे सांगितले. नाशिक-पेठ रस्त्याकरीता केंद्राने निधी मंजुर केला असून  लवकरच तो रस्ता पुर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.
          यावेळी श्री.पाटील यांच्या हस्ते हायब्रीड ॲन्युईटी  कार्यक्रमांतर्गत पॅकेज क्र.54 नामपूर-सटाणा-कळवण-वणी तसेच नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन आणि अवनखेड येथील स्वामी पद्मानंद सरस्वती सभागृह आणि कादवा पर्यटन रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
00000