Saturday 6 October 2018

आपत्ती निवारण


आपत्ती निवारणात पूर्वतयारी आणि प्रतिसाद महत्वाचा-जिल्हाधिकारी

       नाशिक दि.6- आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी आणि तात्काळ प्रतिसाद महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन म्हणाले, आपत्तीमुळे होणारी आर्थिक आणि जीवीत हानी टाळण्यासाठी आपत्ती निवारणाचा चांगला आराखडा तयार करणे आवश्यक आहे. तसेच आपत्तीला वेळेत प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहिल्यास आणि योग्य संवाद यंत्रणा उभी केल्यास आपत्तीवर मात करता येते. आपत्ती निवारण सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक कार्यालयाने आपला आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

तालुका यंत्रणा सक्षम करण्यासाठी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी  प्रयत्न करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. जिल्हा आपत्तीमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.गिते म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे योगदान मानवी जीवनासाठी महत्वाचे आहे. संकटला तोंड देताना होणाऱ्या कौतुकापेक्षा जीवनात मिळणारे समाधान महत्वाचे आहे. आपत्ती अचानक येत असल्याने त्यासाठीची सज्जता महत्वाची आहे. आपत्ती निवारण सप्ताच्यानिमित्ताने जनजागृतीवर भर देण्यात यावा आणि प्रात्यक्षितातून लक्षात आलेल्या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात श्री.खेडकर यांनी सादरीकरणाद्वारे आपत्ती निवारण सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आपत्तीतून समाजाचे रक्षण करण्यासाठी सर्व स्तरावर मार्गदर्शन आणि जागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रक, कापडी फलक आणि घडीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी आपत्ती निवारण कार्यात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि नागरिकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
----

No comments:

Post a Comment