Tuesday 30 October 2018

फटाका विक्रीवर बंदी


अधिक आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी

          नाशिक, दि.30- फटाका उडविणाऱ्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापरावर जिल्हादंडाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात बंदी घातली आहे.
          संबंधित परवाना प्राधिकारी यांनी फटाका परवाना देताना तो गर्दीच्या, वर्दळीच्या, सार्वजनिक रस्त्यांवर, शाळा व महाविद्यालयाजवळ तसेच धार्मिक स्थळाजवळ न देता इतरत्र मोकळ्या जागेत असेल अशा ठिकाणी देण्याची कार्यवाही करावी.
          साखळी फटाक्यांसाठी 50, 100 आणि त्यावरील फटाके असल्यास आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे  115, 110 व 105 डेसीबल असावी. रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचे आवाज करणारे फटाके उडविण्यास बंदी आहे.
          फटाक्यांची दुकाने जमिनीलगत असावीत. प्रत्येक स्टॉलमध्ये 50 किलोग्रॅम फटाके व 40 कि.ग्रॅ. शोभेच्या फटाक्यांपेक्षा अधिक फटाके असू नयेत. स्टॉलमध्ये सुरक्षित अंतर असावे. कुठल्याही घोषित सीमेपासून 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर स्टॉल्सची जागा नसावी.
          एकापेक्षा जास्त स्टॉल्स असल्यास त्यांची प्रवेशद्वारे समोरासमोर नसावीत. एका ठिकाणी 100 पेक्षा जास्त स्टॉल्स नसावेत. स्टॉल्सच्या ठिकाणी तेलाचा दिवा किंवा मेणबत्ती लावू नये. फटाक्याच्या दुकानाचा आपत्कालीन मार्ग नेहमी खुला असावा. स्टॉल्सच्या ठिकाणी धुम्रपानास मनाई आहे. त्याठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना केलेली असावी.
          खराब स्थितीत असलेल्या फटाक्यांची विक्री करण्यात येऊ नये. तसेच 25 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, 3.8 सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबीचे व ॲटमबॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांची व क्लोरेटचा समावेश असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये.
          तीन इंचापेक्षा जास्त लांबीचा व अर्ध्या इंचापेक्षा जास्त व्यासाचे कागदाचे नळीपासून केलेल्या गनपावडर व नायट्रेट मिश्रीत परंतु क्लोरेट नसेलेल्या चिनी फटाक्यांची विक्री करण्यात येऊ नये.
          फुटफुटी किंवा तडतडी, मल्टीमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लाय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिवळ्या फॉस्फरसयुक्त अत्यंत विषारी फटाक्यांची विक्री करू नये. 18 वर्षाखालील मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असल्याशिवाय फटाक्यांची विक्री करू नये.
  शांतता क्षेत्रात कोणत्याही फटाक्यांचा वापर करू नये. शांतता क्षेत्रात रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय आदींभोवतीचे 100 मीटरपर्यंतचे क्षेत्र येते.
रॉकेटचा डोक्याचा भाग 10 सेमीपेक्षा जास्त नसावा व 2.5 सेमीपेक्षा जास्त जाडीचा व्यास नसावा. मनाई केलेले आपटबार व उखळी दारु उडविण्यास बंदी आहे. फटाक्यांची माळ 10 हजार फटाक्यांपेक्षा जास्त लांबीची असू नये. त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या आवाजाचे फटाक्यांमुळे  निर्माण होणाऱ्या ध्वनी व वायु प्रदूषणाने जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सदरचे मनाई आदेश काढण्यात आले आहेत.
 मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 33 नुसार आदेशाचा भंग केल्यास आठ दिवसापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा रुपये 1250 इतक्या दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील. नागरिकांनी वर्दळ नसलेल्या भागात फटाके उडवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
----

No comments:

Post a Comment