Friday 12 October 2018

आपत्ती निवारण दिन


जागतिक आपत्ती निवारण दिन


          नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीत बऱ्याचदा जिवीत आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते. आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी असली तर ही हानी कमी करता येते. शिवाय योग्य खबरदारी आणि जनजागृतीच्या माध्यमातून मानवनिर्मित आपत्ती टाळतादेखील येते. जागतिक आपत्ती निवारण दिनाच्या निमित्ताने आपत्तीत होणारी हानी टाळण्याबाबत जागतिक स्तरावर विचारमंथन होणार आहे.


          जागतिक स्तरावर आपत्ती विषय जागृती निर्माण करण्यासाठी आणि ती टाळण्याच्या कार्यात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1989 पासून जागतिक आपत्ती निवारण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी 13 ऑक्टोबरला आपत्ती विषयक विविध पैलूंवर चर्चा करण्यात येते.



          आपत्ती निवारणासंदर्भात जपानमधील सेंदाई येथे आयोजित 18 मार्च 2015 रोजी आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. हा कार्यक्रम सेंदाई फ्रेमवर्क म्हणून प्रसिद्ध आहे. या नियोजनानुसार सात उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आणि ते सेंदाई सेव्हन म्हणून प्रसिद्ध आहे. 2016 मध्ये आपत्तीतील मनुष्यहानी 2030 पर्यंत कमी करणे आणि 2017 मध्ये आपत्ती बाधितांची संख्या कमी करणे या दोन विषयांवर आपत्ती निवारण दिनाच्या निमित्ताने चर्चा करण्यात आली. यावर्षी आपत्तीच्यावेळी होणारी आर्थिक हानी कमी करण्यावर विचारमंधन होणार आहे.


          आपत्ती निवारणाच्यादृष्टीने चार प्रमुख मुद्दे  प्राधान्यक्रमाने स्पष्ट करण्यात आले आहेत. यात आपत्तीचे धोके लक्षात घेणे, आपत्ती विषयक योग्य नियोजन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करणे, आपत्ती निवारणासाठी उपाययोजना शोधणे आणि प्रभावी प्रतिसाद तसेच पुनर्वसन आणि पुर्नबांधणीसाठी आपत्ती विषयक पूर्वतयारी या बाबींचा समावेश आहे. कोणत्याही आपत्तील सक्षमणे तोंड देण्यासाठी याबाबींवर विचार आवश्यक आहे.
        आपत्ती निवारणात महिलांची भूमीका महत्वाची आहे. त्यांना प्रशिक्षीत केल्यास संभाव्य हानी कमी करणे शक्य होते. युवावर्ग बदलांचा दूत असल्याने त्याच्या क्षमतेचा जनजागृतीसाठी चांगला उपयोग होऊ शकेल. वयोवृद्धांकडे अनुभव असल्याने या अनुभवाचा आपत्ती निवारण आराखडा तयार करताना उपयोग होऊ शकेल. माध्यमे आपत्तीपूर्वी आणि आपत्तीच्यावेळी लोकशिक्षण आणि जनजागृतीसाठी महत्वाची ठरतात. असे सर्व घटक एकत्र येऊन आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम झाल्यास होणारी हानी टाळता येते किंवा कमी करता येते.

          आपत्तीचे प्रकार आणि त्याबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत समाजातील प्रत्येक स्तरावर माहितीचा प्रसार यासाठी महत्वाचा ठरतो. त्याचबरोबर मानवी चुकांमुळे होणारी आपत्ती कशी टाळावी याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण प्रत्येक संस्थेत दिले गेल्यास ते अधिक प्रभावी ठरू शकेल. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत संदेश पेाहोचविण्याचे प्रयत्नदेखील उपयुक्त ठरू शकतील. या दिवसाच्या निमित्ताने अधिकाधीक सहभागातून आपत्ती निवारण व्यवस्थापन मजबूत झाल्यास ते सामान्य नागरिकांसाठी फायद्याचे ठरू शकेल.

     आपत्ती सांगून येत नाही असे म्हणतात. साधारण सवयी किंवा चुकादेखील आपत्तीला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे मानवनिर्मिती आपत्ती टाळण्यासाठी पहिली अट आहे. नैसर्गिक आपत्ती अचानक समोर उभी रहात असल्याने प्रत्येक प्रकारच्या आपत्तीचा विचार करून त्यावेळच्या नियोजनाची आधीच कल्पना केल्यास प्रतिसाद चटकन देता येतो आणि हानी कमी होते.

      जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून यावर्षीचा संदेश समाजातील सर्व स्तरात देण्यासाठी आपत्ती निवारण दिनाच्या निमित्ताने जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शासन, स्थानिक प्रशासन,  स्वयंसेवी संस्था, नागरिक, खाजगी क्षेत्र, आंतरराष्ट्रीय संस्था आदी सर्वांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न केल्यास आपत्तीविषयी चांगली जनजागृती होऊन या वर्षाच्या संकल्पनेनुसार आपत्तीत होणारी हानी कमी करणे शक्य आहे.
 -----

No comments:

Post a Comment